सुहितासाठी सुहित जीवन ट्रस्ट

    14-May-2024
Total Views |
Suhit Jeevan Trust
डॉ. सुरेखा पाटील यांनी २००४ मध्ये रायगड जिल्ह्यात पेण येथे सुहित जीवन ट्रस्टची स्थापना केली. पेण तालुक्यात विशेष मुलांसाठी काम करणारी ही पहिली संस्था आहे. विशेष मुलांच्या माणूसपणाच्या जीवनासाठी काम करणार्‍या या संस्थेच्या कार्याचा इथे मागोवा घेण्यात आला आहे.
 
गोष्ट आहे एका संवेदनाशील, सुरेख मनाची, सुहित जीवन ट्रस्ट आणि डॉक्टर सुरेखा पाटील यांची, सुरेखाताई या मुंबईत मध्यमवर्गीय कुटुंबात सर्वसामान्य आयुष्य जगत होत्या. लहानपणापासून महात्मा गांधी, बाबा आमटे यांच्या विचाराने आणि कार्याने त्या प्रेरित झाल्या होत्या.रोजच एकसुरी आयुष्य त्यांना नको होतं. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, हे त्यांना जाणवत होतं. पण, मार्ग दिसत नव्हता. अशातच त्यांच्या एका मैत्रिणीने बौद्धिक अक्षमता असणार्‍या मुलांच्या क्षेत्राविषयी त्यांना माहिती दिली. त्यामुळे त्यांनी मैत्रिणीच्या संस्थेस भेट दिली. तेथील विशेष मुलांना व प्रौढ व्यक्तींना पाहून त्यांचे मन हेलावले. कोणताही दोष नसताना केवळ नियतीने केलेल्या अन्यायामुळे मुलांच्या नशिबी हे दिव्यांगत्व आले होते. एक आई असलेल्या सुरेखाताईं या मुलांच्या पालकांचा विचार करून अस्वस्थता झाल्या. त्यांची झोप उडाली. या मुलांनी स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे? त्यांचे भविष्य काय? या प्रश्नांनी त्यांना भंडावून सोडलं.
 
ते प्रश्न अनुत्तरीत न ठेवता, सुरेखाताईंनी त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे ठरवलं. आपण या मुलांसाठी काय करू शकतो? याचा त्यांनी मागोवा घेतला. अभ्यासच केला. मग, बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुरेखाताईंनी विशेष बीएड (मतिमंदत्व), विशेष एमएड आणि विद्यावाचस्पती कला, (विशेष मतिमंदत्व) यामध्ये शिक्षण घेतले. शिक्षण घेताना अनेक कौटुंबिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. परंतु न डगमगता, चिकाटीने त्यांनी त्यांचे ध्येय गाठले. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी पेण येथे सुहित जीवन ट्रस्टची स्थापना केली.

हीच आमुची प्रार्थना
अन् हेच आमचे मागणे,
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे.
 
या विचारांनी सुरेखाताई काम करू लागल्या. त्यांनी संपूर्ण पेण तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये जाऊन सर्व्हे केला, त्यानंतर १० विद्यार्थ्यांना घेऊन संस्था चालू केली. या विशेष मुलांना व प्रौढ व्यक्तींना त्यांच्या गरजानुरूप अभ्यासक्रम तयार करून विशेष शिक्षण देणे, त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव देणे, पालकांना प्रशिक्षित करणे, सकारात्मक प्रेरणा देणे, विशेष शिक्षकांचे आत्मबल वाढवून, त्यांना योग्य प्रशिक्षणाबरोबरच, विद्यार्थ्यांना शिकवताना लागणारी सहनशीलता, व सकारात्मकतेत वाढ करणे, अशी अनेक उद्दिष्टे ठेवून, संस्था कार्य करत आहे. या मुलांसाठी संस्थेत अनेक उपक्रम चालवले जातात. त्यातला एक उपक्रम म्हणजे -

व्हाईट हाऊस

बौद्धिक अक्षम मुलांच्या क्षेत्रातील विशेष प्रशिक्षणासाठी, म्हणजेच डीएड व बीएड प्रशिक्षण केंद्राची सुरुवात २०११ मध्ये करण्यात आली. संपूर्ण रायगड जिल्ह्यात हे पहिले व एकमात्र विशेष शिक्षक प्रशिक्षण केंद्र आहे.वरील उपक्रमांबरोबरच भारतात विद्यार्थ्यांना, स्पेशल ऑलिम्पिकसाठी तयार करता यावे, म्हणून स्केटिंग जुडो, बास्केटबॉल, हँडबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स, अशा विविध खेळांचे प्रशिक्षण देण्याची सुविधा संस्थेने केली आहे. त्यासाठी सातत्याने पालकांना समुपदेशन केले जाते. २०२१-२२ या वर्षांत संस्थेमधील आठ विद्यार्थ्यांनी ट्रायथलॉन, पॉवर लिफ्टिंग, बॅडमिंटन, हँडबॉल, टेबल टेनिस या खेळांसाठी कोल्हापूर, हरियाणा, गुजरात, पाँडिचेरी या ठिकाणी जाऊन स्पर्धेत सहभाग घेतला होता. यानिमित्ताने मुलांचा विमानप्रवासही झाला होता. आज संस्थेमधील अनेक विद्यार्थी मुक्त रोजगार स्वयंरोजगार (पालकांच्या मदतीने) व आश्रित कारखान्यांद्वारे अर्थार्जन करून काही अंशी आपल्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करीत आहेत. एवढेच नव्हे तर या विशेष मुलींवर रायगड जिल्ह्यात होणार्‍या अतिप्रसंग व विनयभंगांच्या विविध घटनांमध्ये, आरोपीला शासन करण्यासाठी संस्था पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे कार्य करीत आहे.
 
वीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या संस्थेमध्ये सध्या १६० पेक्षा अधिक बौद्धिक अक्षम, बहू विकलांग मेंदूच्या पक्षघात, ऑटिझमची लक्षणे असणारे विद्यार्थी हे विशेष शिक्षण, मेडिकल सुविधा, मूल्य व संस्कार शिक्षण, कौशल्य व्यावसायिक प्रशिक्षण, या सेवांचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे संगीत, योगा, शारीरिक शिक्षण, शालेय शिक्षणाचा लाभ घेत आहेत. पेण, अलिबाग, उरण, खालापूर या चार तालुक्यांच्या गावांमधून, बौद्धिक अक्षम विद्यार्थी निःशुल्क शिक्षण घेत आहेत. आजवर अनेक समस्यांना तोंड देऊन, सुरेखाताई हे कार्य निष्ठेने करत आहेत. स्वतःच्या घरात अशी कुठलीही समस्या नसतानादेखील सुरेखाताई हे कार्य करत आहेत. एक मातृत्वाची उदात्त भावना त्यांच्या कार्यात दिसून येते. म्हणूनच, त्यांची दुसरी पिढी, त्यांचा धाकटा मुलगा या कार्यात त्यांच्याबरोबर त्यांना साथ देतो आहे. हीच त्यांच्या कार्याची, मेहनतीची पोचपावती आहे. पेणमध्ये दिव्यांग पाल्यांच्या पालकांचे सुहित साधणार्‍या त्यांच्याा कार्यास असेच बळ मिळो. त्यांचे कार्य निरंतर चालू राहो, हीच सदिच्छा
 
सुमंगल बौद्धिक अक्षम मुलांची शाळा
 
या उपक्रमांतर्गत विशेष मुलांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन त्यांच्या विकासासाठी अभ्यासक्रम राबवला जातो. मुलांचे गुण ओळखून, त्यांना विविध स्पर्धा, खेळ, सहली, गायन, वादन, नृत्य, नाटक यांची मदत घेऊन शिक्षण दिले जाते. या सर्व उपक्रमांमुळे हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शाळेमध्ये त्यांना दैनंदिन जीवनातील कार्ये, म्हणजे खाणे, शौचालय प्रशिक्षण, सामाजिक वर्तन, शिस्त याबाबत शिक्षण, तसेच संख्यात्मक ज्ञान, लेखन कौशल्य, संवाद कौशल्य, विनिमय कौशल्य, वाचन कौशल्य, संगणकाचा वापर, याविषयी शिक्षण देण्यात येते.

पालवी शीघ्र हस्तक्षेप केंद्र

संस्थेने शून्य ते तीन या वयोगटांतील बाळाच्या विकासात्मक टप्प्यांमध्ये आरोग्य, वाढ, वर्तन इत्यादी समस्यांचे निराकरण करण्यासाठी शक्य तितक्या लवकर त्यांचे निदान व उपचार करणे. त्यांच्यामधील अक्षमतेचे प्रमाण कमी करणे किंवा नाहीसे करणे, यासाठी पालवी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामध्ये विशेष शिक्षिका, मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ऑक्युपेशनल फिजिओ व स्पीच थेरपिस्ट इत्यादी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पालकांना दिले जाते.


एकलव्य शिक्षण केंद्र

या उपक्रमात व्यावसायिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनावर देखरेखीखाली बौद्धिक अक्षम व्यक्ती विविध कलात्मक व आकर्षक वस्तूंचे उत्पादन करीत असतात. या वस्तूंना समाजातील विविध स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळतो. या विक्रीतून आलेल्या पैशांतून काही पैसे मुलांना दिले जातात, जेणेकरून हे विद्यार्थी आत्मनिर्भर होऊन आपल्या कुटुंबात व समाजात आदराने राहू शकतील.

 
-कल्याणी काळे