पीयूष गोयल यांचा विजय निश्चित, ते मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    14-May-2024
Total Views |
pg
 
मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त मताधिक्य मोजायचे आहे. केंद्रीय मंत्री असताना त्यांनी मुंबईला खूप काही दिले. यापुढेही ते मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
 
पीयूष गोयल यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी दहिसर (पुर्व ) येथे अशोकवन येथे झालेल्या भव्य जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईकर असलेल्या पीयूष गोयल यांनी नेहमीच मुंबईची बाजू उचलून धरली. रेल्वेमंत्री असताना त्यांनी मुंबईसाठी अनेक कामे केली. त्यांच्याचमुळे एसी लोकल आली. ज्या ज्या खात्यात काम करायची संधी त्यांना मिळाली तेथे मुंबई आणि महाराष्ट्राला खूप काही मिळवून दिले. ते पुन्हा केंद्रीय मंत्री होणार आणि मंत्रीपदाचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रासाठी करणार. लोकप्रतिनिधी कसा असावा तर पीयूष गोयल यांच्यासारखा असावा. दिल्लीत गोयल बोले आणि दिल्ली डोले, अशी स्थिती आहे. मुंबईची माहिती असलेले पीयूष गोयल अभ्यासूपणे विषय मांडतात.
 
विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ते काँग्रेसने ५० वर्षांत केलेले नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे. ही निवडणूक देशाची प्रगती करणारी, देशाला महासत्तेकडे नेणारी आहे. राम मंदिर वही बनाएंगे, लेकीन तारीख नाही बताएंगे, असे विरोधक म्हणत होते, पण मोदींनी तारीखही सांगितली, राम मंदिरही उभारले आणि उद्घाटनही केले. ३७० कलम हटवले. पाकिस्तान त्यांना चळचळा कापतो. म्हणूनच अबकी बार चार सौ पार. पीयूष गोयल यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत.
 
नवे संसद भवन बांधल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला निर्णय घेतला तो महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा. म्हणून २० मे रोजी प्रत्येक महिलेने आपल्या परिवारासह सकाळी सात वाजता मतदान पार पाडायचे आहे. त्यामुळे पीयूष गोयल यांना जास्तीतजास्त लीड मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
यावेळी पीयूष गोयल म्हणाले, नारी शक्तीचा सन्मान, शेतकर्‍यांचे कल्याण आणि भारताचा विकास ही मोदींची आणि महायुतीची गॅरंटी आहे. जाती, भाषा, वर्ण यांचा भेदभाव आम्हाला मान्य नाही. भ्रष्टाचार आम्हाला मान्य नाही. विकास आणि वारसा हा आमचा अजेंडा आहे. म्हणून देशाचे उज्वल भवितव्य घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत द्या, असे आवाहन पीयूष गोयल यांनी केले.
 
या सभेला माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, खा.गोपाळ शेट्टी, आ.प्रवीण दरेकर, आ.प्रकाश सुर्वे,आ.मनीषा चौधरी, नयन कदम आदि उपस्थित होते. या सभेआधी मागाठाणे विभागात हॉटेल गोकुळ आनंद ते अशोकवन अशी भव्य रॅली काढण्यात आली.