"संगीत खुर्चीमध्ये जो पहिला बसला तो..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

    14-May-2024
Total Views |
 
Fadanvis
 
पालघर : विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही. त्यामुळे ते संगीत खुर्चीचा खेळ खेळतील आणि संगीत खुर्चीमध्ये जो पहिला बसला तो पहिला पंतप्रधान बनेल, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. मंगळवारी पालघरमधील डहाणू येथे महायूतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाभारतातील युद्धामध्ये दोन सेना एकमेकांसमोर होत्या. एकीकडे कौरवांची तर दुसरीकडे पांडवांची सेना होती. दोन्ही सेनेच्या पाठीशी मोठमोठे राजे होते. अशीच अवस्था आज आपल्या देशात आहे. एकीकडे विकासपुरुष आपले नेते नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई अशी एक मोठी पांडवांची फळी आपण तयार केलेली आहे. दुसरीकडे, राहुल गांधी आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षांची एक खिचडी आहे."
 
हे वाचलंत का? -  होर्डिंग कंपनीचा मालक फरार!
 
"त्यांना मी एकच सवाल विचारला की, आमचं सरकार आल्यावर आमचा प्रधानमंत्री ठरलेला आहे तुमचं काय? तर ते काही सांगूच शकत नाही. रोज सकाळी ९ वाजता एक पोपटलाल टीव्हीवर दिसतात. त्यांना वारंवार आमच्या पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, आम्ही ५ वर्षांत ५ पंतप्रधान बनवू. मग माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की, पहिला पंतप्रधान कसा निवडणार. तर ज्याप्रमाणे आपण लहानपणी संगीत खुर्ची खेळायचो तशी संगीत खुर्ची ते खेळणार आहेत. संगीत बंद झाल्यावर जो खुर्चीवर पहिला बसला तो पहिला पंतप्रधान बनेल. पण या वेड्यांना सांगा की, हा संगीत खुर्चीचा खेळ नाही, तुमची खाजगी मालमत्ता नाही तर या देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे. पण ज्यांना नेता, नीती आणि नियत नाही अशी आघाडी आपल्या देशात तयार झाली आहे," असा घणाघात त्यांनी केला.