‘भिडू’ शब्द वापरल्यास भरावा लागेल दोन कोटींचा दंड; जॅकी श्रॉफ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

    14-May-2024
Total Views |

jacky 
 
मुंबई : अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) विविध कारणांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचा भिडू हा शब्द उच्चारला की त्यांच्याच चेहरा समोर येतो. पण आता भिडू हा शब्द सहजासहजी कुणालाच वापरता येणार नाही आहे. या शब्दामुळे आता जॅकी श्रॉफ यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लोक विनापरवानगी त्यांचं नाव कामासाठी वापरतात, त्यामुळे नाराज असलेल्या जॅकी यांनी आता थेट दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
 
जॅकी श्रॉफ यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाकडून त्यांचे नाव व भिडू शब्दाच्या वापराबाबत अधिकार हवे आहेत. त्यांनी आज १४ मे रोजी ही याचिका दाखल केली असून विना परवानगी त्यांचे नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्द वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांवा २ कोटी १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे.
 
दरम्यान, उच्च न्यायालयाने जॅकी श्रॉफ यांच्या परवानगीशिवाय त्यांचं नाव, फोटो, आवाज व भिडू शब्द वापरणाऱ्यांविरुद्ध समन्स जारी केले असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना जॅकी यांच्या वैयक्तिक सर्व लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
 
जॅकी श्रॉफ यांचे वकील प्रवीण आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकं त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो, आवाज, शब्द व नाव वापरून त्यांची प्रतिमा मलीन करत आहेत. याशिवाय अश्लील मीम्समध्ये त्यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. त्यांच्या आवाजाचा देखील गैरवापर केला जात आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन थांबविण्यात यावे, ही मागणी त्यांनी या याचिकेतून केली आहे.