बांगलादेशी घुसखोर निघाले अल कायदाचे दहशतवादी; बनावट आधार आणि पॅनकार्डच्या आधारे राहत होते भारतात

    14-May-2024
Total Views |
 terrorists
 
दिसपूर : अल कायदाशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना सोमवार, दि. १३ मे २०२४ आसाममधील गुवाहाटी येथील रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली आहे. हे लोक भारतीय उपखंडातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. बहार मिया (३०) आणि विरल मिया (४०) अशी त्यांची नावे आहेत.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दोन्ही दहशतवादी बांगलादेशचे असून ते कोणत्याही पासपोर्टशिवाय भारतात अवैधरित्या राहत होते. त्यांच्याकडून काही भारतीय दस्तऐवजही सापडले आहेत ज्यांचा वापर या लोकांनी आसाममध्ये दहशतवादी नेटवर्क पसरवण्यासाठी केला होता.
 
एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे की, हे दोघे तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होते. ते पुढे म्हणाले, “हे दोघेही दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहत होते. त्यांच्याकडून आधार आणि पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
 
याआधीही बांगलादेशी दहशतवादी संघटना अन्सारुल बांगला टीम (ABT) च्या अब्दुस सुकूर अलीला आसाममध्ये अटक करण्यात आली होती. या संदर्भात माहिती देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः सांगितले होते की, “दहशतवादी अब्दुस सुकूर अलीला भारत-बांगलादेश सीमेजवळ पकडण्यात आले आहे.”
 
मुख्यमंत्री बिस्वा म्हणाले होते की, आसाममधील दहशतवादी मॉड्यूल वेळोवेळी नष्ट करण्यात आले आहेत आणि भविष्यातही हे सुरूच राहणार आहे. एप्रिल २०२३ मध्ये एबीटीशी संबंधित तीन लोकांना धुबरी येथून अटक करण्यात आली होती. उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी आसाम पोलिसांनी ABT आणि Al Qaeda in the Indian Subcontinent (AQLS) च्या नऊ मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता आणि त्याच्याशी संबंधित ५३ लोकांना अटक केली होती. या अटकेनंतर असे खाजगी मदरसे उद्ध्वस्त करण्यात आले जेथे दहशतवादी संघटनांशी संबंधित शिक्षक तरुणांना कट्टरवादी शिकवण देत होते.