योगाने धैर्यप्राप्ती (लेखांक-५)

    13-May-2024
Total Views |
 yoga
 
अष्टांग योगातील पहिल्या यम या अंगाचे वर्तणुकीय विवेचन आपण आधीच्या चार भागांमध्ये पाहिले. त्याच्याच प्रात्यक्षिक स्वरूपात या लेखात आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या अंगी सद्गुण आपोआप निर्माण होण्यासाठी याचा उपयोग होतो. आपण गुणक्रमाने त्यांची उजळणी करत असता दैनंदिन जीवनात आपण आपले मनसुबे सांभाळत हे सद्गुण कसे प्राप्त करावेत, हे बघूयात.

हे सद्गुण का प्राप्त करावे? कारण, आपले जीवन हे अमूल्य आहे, दुर्र्मीळ आहे. आपल्या जीवनाचा उपयोग योगशास्त्राने ठरवून दिल्याप्रमाने जीवनाचे उच्चतम ध्येय साध्य करण्यासाठी करायचा आहे. ते उच्चतम ध्येय म्हणजे योग साधने किंवा जोडणे असा होतो. काय कशाला जोडायचे? तर, शरीर -मनाला, मन-आत्म्याला व शेवटी आत्मा परमात्म्याला. हे उच्चतम ध्येय साधण्यासाठी शरीर हे आपले साधन आहे. ते स्वस्थ ठेवणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी आपण योगातील तिसरे अंग आसन याचा अभ्यास क्रमाने करणारच आहोत. सध्या यमपालन करून सद्गुण प्राप्तीचा क्रमाने अभ्यास करू.

१. धैर्य : हा सद्गुण मनाचा आहे. मन हे शक्तिशाली आहे. त्याची शक्ती म्हणजे मनोधैर्य. ते प्राप्त होण्यासाठी पहिला यम म्हणजे सत्य. सत्य पालन करावे लागते.कसे? तर विचार, उच्चार (म्हणजे बोलणे), आचार (आपली वर्तणूक) व व्यवहार सत्य करावे लागतात.
 
२. विचार : सत्य विचार म्हणजे आपला देह हा नश्वर आहे व आत्मा अमर आहे. हा सत्य विचार कायम जागृत ठेवून ऐहिक गोष्टींबद्दल अनासक्ती बाळगून आत्मिक विचारावर आसक्त होणे आवश्यक आहे.आपण म्हणाल, हे आजकालच्या काळात फार कठीण आहे, तर, कठीण गोष्टी करण्यातच पुरुषार्थ आहे. तो प्रत्येकाने करावा म्हणजे मनाचे समाधान टिकेल.
 
३. उच्चार : म्हणजे बोलणे. आपले शास्त्र त्यासाठी ‘सत्यं वद धर्मं चर...’ म्हणजे सत्य बोल, धर्म कर असे सांगते. या ठिकाणी धर्माचा अर्थ आपले कर्तव्य असा घ्यायचा. त्याने धैर्यप्राप्ती होते.
 
 
कारण, असत्य बोलण्याने वाणीची शक्ती कमी होते. आपल्या वाणीचा प्रभाव कमी होतो. म्हणून, आधी करावे मग सांगावे, हे त्यासाठीच म्हणतात. ‘मुले माझं ऐकत नाही,’ असे म्हणणार्‍यांनी स्वतःला तपासावे. सत्य बोलण्यातील अपवाद सोडून, असत्य बोलणार्‍याच्या वाणीतून उच्चारलेल्या मंत्रांचा व नामजपाचाही प्रभाव पडत नाही. पाहिजे तसा लाभ होत नाही. कारण, असत्य बोलणार्‍याला ते मंत्र/ते नाम उच्चारण्याचा अधिकारच नसतो. म्हणून, नारदमुनींनी वाल्या कोळी याला ‘राम-राम’ऐवजी ‘मरा-मरा’ म्हणायला सांगितले, हे सर्वश्रुत आहे. आपण जर मंत्रजप / नामजप करत असाल, तर वाणीचे हे सत्य बोलण्याचे तप पाळणे आवश्यक आहे.
 
आचार म्हणजे आपली वागणूक, ती करताना संयुक्तिक असावी. इतरांचा आदर ठेवून केलेली असावी. उदाहरणार्थ समजा, आपण चालत असताना कोण्या व्यक्तीला आपला पाय (लाथ) लागला, तर त्याला मनोमन किंवा प्रत्यक्ष नमस्कार करावा. वाहन चालवताना समोरच्याला कमी लेखून आपले वाहन चालवू नये. ओव्हरटेक करताना डावीकडून ओव्हरटेक करू नये. कारण, सर्वांभूती परमेश्वर ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे प्रत्येकाचा, लहान-मोठे सर्वांचाच मनोमन सन्मान करणे, त्याला मान देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याकडून गुन्हा/ अपराध घडणार नाही व समाजातून अपराध / गुन्हा घडण्याचे कमी होईल.

 
४. व्यवहार : व्यवहार करताना तो संयुक्तिक असणेच गरजेचे आहे.
उदाहरणार्थ समजा, आपण खरेदीदाराच्या भूमिकेत असताना, आपले कर्तव्य रास्त मूल्य चुकवणे हे असतं. समोरच्याने ते मूल्य कसं घ्यावं, यावर आपला ताबा नाही. त्यामुळे तो चुकीच्या मार्गाने घेत असल्यास, त्यात स्वतःला दोषी मानू नये. मात्र, आपण विक्रेते असल्यास मूल्य स्वीकारताना सत्याच्या संयुक्तिक मार्गाचाच अवलंब करावा, म्हणजे आपले धैर्य कमी होणार नाही. समाजातून भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल.तसेच समोरची व्यक्ती खरं बोलते आहे की खोटे, हे जाणण्यासाठी आपण त्याच्या डोळ्यांत बघतो. बेडरांचे अपवाद सोडता, खोटे बोलणार्‍या अप्रामाणिक व्यक्ती डोळ्यांस डोळा देऊ शकत नाहीत. ही साधारण व्यक्तीची नैसर्गिक वृत्ती आहे. व्यक्ती परीक्षेस या इतका प्रभावी उपाय नाही.जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा सामना करण्यासाठी लागणारे धैर्य प्राप्त करण्यासाठी वरीलप्रमाणे सत्य पालन अनिवार्य आहे.

 
(क्रमशः)

डॉ. गजानन जोग