दिल्लीमध्ये पारंपरिक प्रचारही जोरात!

    13-May-2024
Total Views |
Traditional Campaign in Delhi

नवी दिल्ली:
देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या हायटेक प्रचारासह पारंपरिक अर्थात पोस्टर, बॅनर आणि रिक्षेवर भोंगा लावून केला जाणार प्रचारही रंग धरत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि समाजमाध्यमांचा बोलबाला आहे. अनेक पक्ष विविध हायटेक तंत्रांचाही वापर करतात. परंतु निवडणूक प्रचाराची जुनी सूत्रे अजूनही वापरली जात आहेत. पोस्टर्स आणि बॅनरसह अनेक प्रकारचे प्रचार साहित्य दिल्लीतील प्रत्येक गल्लीत दिसत आहे. निवडणुका तोंडावर आल्याने ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रचारालाही वेग आला आहे.

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रत्येक माध्यमाचा वापर करत आहेत. त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. ज्यावर पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ प्रकाशित केले जात आहेत. यादरम्यान ऑफलाइन प्रचारालाही वेग आला आहे. उमेदवारही जनसंपर्काच्या जुन्या सूत्रावर काम करत आहेत.

दिल्लीतील सदर बाजारात निवडणूक प्रचार साहित्य तयार करण्याची हंगामी बाजारपेठ लागली आहे. सर्वच पक्षांचे प्रचारसाहित्य सदर बाजारात मिळते. येथील एका विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवार टी-शर्ट आणि टोप्यांवर आपापाल्या पक्षाचा झेंडा लावून त्याचे तरुणांमध्ये वाटप करत आहेत. याचा वापर प्रामुख्याने रोड शोसाठी करण्यात येतो. कमी खर्चात तयार केलेले साहित्य परिधान करून कार्यकर्ते रॅलीला जातात तेव्हा वातावरण पक्षाच्या रंगात रंगलेले दिसते. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या साहित्यासाठी खर्चदेखील तुलनेने कमी येतो आणि त्याचा प्रभावही अधिक असतो. परिणामी सर्वच पक्षांचे उमेदवार या प्रचाराला प्राधान्य देत असल्याचे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
 
ई रिक्षा आणि भोंग्यांनाही पसंती 

प्रचारासाठी उमेदवारांकडून ई-रिक्षा, ऑटो रिक्षा भाड्याने घेतल्या जात आहेत. त्यावर लाऊडस्पीकर अर्थात भोंगे लावून पक्षाचा प्रचार करण्यात येत आहे. पक्षांचे प्रचारगीत आणि उमेदवाराचा परिचय त्यावर वाजवण्यात येत आहे. त्यासाठी प्रामुख्याने ई रिक्षांना प्राधान्य देण्यात येत आहे. साधारणपणे ऑटो रिक्षापेक्षा कमी किमतीत ई-रिक्षा बुक केल्या जातात, त्यामुळे कमी किमतीच्या जाहिरातीसाठी ई-रिक्षांची मागणी वाढली आहे.