"...तेव्हा जैन देखील हिंदूच आहेत"; आचार्य सुनील सागर महाराज यांचे सूचक विधान

    13-May-2024
Total Views |

Sunil Sagar Maharaj

मुंबई (प्रतिनिधी) :
"जैन पंथातील २० तीर्थंकर इक्ष्वाकू घराण्यातील आहेत. आपले श्रीराम हे देखील इक्ष्वाकु वंशातीलच आहेत. त्यामुळे आपण कोणाचेही अनुसरण करत असलो तरी प्रत्येकाचा डीएनए सारखाच असतो. जर आपण जैन पंथाच्या तत्त्वांबद्दल बोललो तर जैन हे जैन आहेत, परंतु जेव्हा आपण सांस्कृतिक स्वरूपाबद्दल बोलतो तेव्हा जैन देखील हिंदूच आहेत.", असे प्रतिपादन जैन भिक्षू आचार्य सुनील सागर महाराज (Sunil Sagar Maharaj) यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अजमेर महानगर तर्फे आयोजित कौटुंबिक मेळाव्याच्या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधत होते.

जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांच्या तपोभूमी, छत्री योजना, अंतेड रोड, वैशालीनगर येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ स्वयंसेवकांनी वेणू वादन करून सर्वांचे लक्ष्य वेधले. यावेळी संघ स्वयंसेवक, मातृशक्तीसह जैन समाजातील अनेक प्रज्ञावंत उपस्थित होते.


आचार्य सुनील सागर महाराज पुढे म्हणाले, "संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे. जगा आणि जगू द्या या भावनेने चालणारे भारतीय प्रत्येक जीवाचा आणि प्रत्येक आत्म्याचा आदर करतो. प्राण्यांवर अत्याचार करणे हेही आपण पाप मानतो. आपल्यासाठी राष्ट्र प्रथम आहे कारण राष्ट्र असेल तर आपण आहोत. एकात्मतेची निष्ठा प्रत्येक नागरिकाच्या नसानसांत प्रवाहित झाली पाहिजे, तरच भारताची ओळख विश्वगुरुच्या श्रेणीत होईल."

सध्याच्या भारताच्या सीमा विघटनाबाबत चिंता व्यक्त करून आचार्यजींनी सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांच्या काळातील देशाची परिस्थिती आणि प्राचीन काळातील श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या काळातील परिस्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले, आपली वैदिक संस्कृती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. जातीव्यवस्था कर्मावर आधारित होती, त्यात अस्पृश्यतेला स्थान नव्हते. पण आज समाजात एक विचित्र असंतुलन निर्माण होत आहे."