"लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया", अभिनेता सुबोध भावेने पत्नीसह निभावला मतदानाचा अधिकार

    13-May-2024
Total Views |
लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीचा चौथा टप्पा सुरु
 
subodh  
 
पुणे : देशभरात लोकसभा निडणूकीचा रणसंग्राम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत असून आज महाराष्ट्रीतील पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही जागांसाठी मतदान होत आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला असून लोकांनाही मतदान करण्याचे आवाहन त्याने केले आहे.
 
सुबोध भावे याने मतदान केल्यानंतर म्हटले की, “मला लोकशाहीने जो हक्क दिलाय, त्यानुसार माझ्या एका मताची किंमत खूप मोठी आहे याची जाणीव मला आहे. म्हणून मी मुंबईतून प्रवास करून पुण्यात मतदानासाठी येतो, मग परत मुंबईत जाऊन काम करतो. मी आणि माझी पत्नी मतदान करतो, लवकरच माझा मुलगा १८ वर्षांचा होईल, तोही मतदान करेल. हा लोकशाहीचा उत्सव आहे, निवडणुकांचा उत्सव आहे, आपण दिलेल्या मतांच्या आधारे आमदार, खासदार निवडून येतात. आपण मत न दिल्याने काय फरक पडणार आहे, असा निराशावादी विचार करून तुम्ही घरात बसून राहिलात तर त्याने कोणताही बदल घडणार नाही. तुम्ही कुठल्याही उमेदवाराला मत द्या, जो तुम्हाला योग्य वाटतो, त्याला मत द्या, पण मत द्या. मत वाया घालवू नका.”
 

subodh  
 
तसेच, सुबोधने यावेळी बोगस मतदानाचा उल्लेख करत म्हटले की, “अनेकदा बोगस मतदानाचे प्रकार घडतात. तुमच्याऐवजी दुसरं कोणीतरी मतदान करू शकतं. तुमचं नाव आलं नसेल यादीत तर संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारा. मतदान हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे जे आपण पार पाडायला पाहिजे. कोणतीही आस्थापना, कोणतीही संघटना, कुठलीही कंपनी तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही. मतदानापासून तुम्हाला कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. मतदान राष्ट्रीय कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, आपल्याला योग्य वाटणारा उमेदवारा आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम करू शकतो.”
 
मतदानाच्या टक्केवारीवर आपले मत मांडताना सुबोध म्हणाला, “मत द्या, मतदानाचा कंटाळा करू नका. ५-१० मिनिटांचं काम असतं, जाऊन बटण दाबून तुम्हाला मत द्यायचं असतं. टक्केवारी कमी झाल्यास जो उमेदवार तुम्हाला अपेक्षित नाही तो कदाचित निवडून येऊ शकतो. तुम्हाला जर वाटत असेल की बदल घडायला पाहिजे तर बाहेर पडा आणि मत द्या,” असे आवाहन यावेळी सुबोध भावेने केले.