ड्रोनद्वारे पँगोलिनचे संरक्षण

    13-May-2024   
Total Views |
Save Vietnam's Wildlife rehabilitate pangolins in Vietnam

दक्षिणपूर्व आशियातील व्हिएतनाममध्ये ‘Save Vietnam's Wildlife' ही वन्यजीव संरक्षण संस्था बेकायदेशीर वन्यजीव व्यापारातून पँगोलिन वाचवत आहे. या पँगोलिनचा अभ्यास करण्यासाठी रेडिओ ट्रॅकिंगचा वापर केला जात आहे. रेडिओ टेलिमेट्री ड्रोन वापरल्यामुळे संस्थेला सोडलेल्या पँगोलिनच्या अस्तित्वाचे मूल्यांकन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर पँगोलिनच्या वर्तणुकीबद्दल आणि अधिवासाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. जेव्हा ’Save Vietnam's Wildlife’ या संस्थेला वन्यजीव व्यापारातून वाचवलेले एखादे पँगोलिन मिळते, तेव्हा त्याचा बचाव करून उपचार करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी काही महिने लागू शकतात. या प्राण्याला झालेल्या रोगावर आणि दुखापतींवर उपचार केल्यानंतर, या पँगोलिनला एका लहान, अर्ध जंगली आवारात ठेवले जाते.

या आवारात पँगोलिनचे निरीक्षण केले जाते. पँगोलिन जंगलात जसे वागत आहेत, तसे वागतात का? ते मुंग्यांनी भरलेल्या बांबूच्या नळ्या तपासत आहेत का? ते झाडांवर चढत आहेत का? आणि जर ते मऊ भागात बुरूज खोदत आहेत का? या प्राण्यांना पुन्हा जंगली पँगोलिनसारखे वागण्यास एक वर्ष लागू शकते. त्याचबरोबर तस्करीचा पुरावा म्हणून ठेवल्यामुळेसुद्धा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात विलंब होऊ शकतो. एकदा पँगोलिन सोडण्यासाठी मंजुरी मिळाल्यावर, ’SVW’चे पशुवैद्य पँगोलिनच्या नखासारख्या खवल्यांना एक छिद्र पाडून लहान रेडिओ ट्रान्समीटर त्यावर बांधण्यात येते. मगच, पँगोलिनची सुटका व्हिएतनामच्या जंगलात आणि दलदलीत करण्यात येते. हे सस्तन प्राणी लाजाळू आणि निशाचर आहेत. ते घनदाट जंगलात राहतात आणि त्यांच्या बर्‍याच सवयी अजूनही अज्ञात आहेत. पँगोलिन संशोधनासाठी ‘रेडिओ ट्रॅकिंग’ एक जबरदस्त वरदान आहे. परंतु, अनेक संवर्धन संस्थांप्रमाणे, त्यांचे कार्यदेखील निधी आव्हानांमुळे मर्यादित आहे.

जागतिक स्तरावर, पँगोलिनच्या आठ प्रजाती आहेत. त्यापैकी चार आफ्रिकेत आणि चार आशियामध्ये सापडतात. परंतु, जादूटोणा, खवल्यांचा औषधी वापर आणि त्यासाठी होणार्‍या अवैध वन्यजीव व्यापारामुळे हे प्राणी गंभीरपणे धोक्यात आले आहेत. पारंपरिक चिनी आणि आफ्रिकन औषधांमध्ये पँगोलिन स्केलचा वापर विविध परिस्थितींवर उपचार करण्यासाठी केला जातो; त्यांचे रक्त बरे करणारे टॉनिक मानले जाते आणि त्यांचे मांस संपूर्ण आशियातील स्वादिष्ट पदार्थ मानले जाते. अधिवासातील बदल हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. विशेषत: आशियामध्ये, विकास आणि शहरीकरण विस्तारत गेल्यामुळे पँगोलिन संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, तीन आशियाई पँगोलिन ‘गंभीरपणे धोकाग्रस्त’ म्हणून सूचीबद्ध आहेत. यापैकी दोन प्रजाती मूळ व्हिएतनामच्या आहेत. सुंदा पँगोलिन (मॅनिस जावानिका) आणि चिनी पँगोलिन (मॅनिस पेंटाडॅक्टिला). ’SVW’ने २०१५ मध्ये पँगोलिनसाठी रेडिओ ट्रॅकिंग वापरण्यास सुरुवात केली.

सुरुवातीपासूनच, हॅण्डहेल्ड रेडिओ रिसीव्हर वापरून या पँगोलिनचा यशस्वीपणे मागोवा घेता येऊ शकतो, हे संशोधन समूहाच्या लक्षात आले. यामुळे सरासरी सुमारे ६६०-९८० फुटांवरून पँगोलिनचे अस्तित्व शोधता येते. टॅग केलेले हे पँगोलिन किती दूर जात आहेत आणि त्यांच्या वर्तनावर अधिवासाचा कसा प्रभाव पडत आहे, याविषयी डेटा गोळा करण्यास आला. यापूर्वी सिंगापूरमधील एका लहानशा अभ्यासाव्यतिरिक्त, सुंडा पँगोलिनच्या हालचालींबद्दल दुसरे कोणतेही संशोधन उपलब्ध नव्हते. पण, आता रेडिओ ट्रॅकिंगमुळे ’SVW’ टीमला पँगोलिन थेट दिवसा जिथे झोपले होते, तिथे जाता येऊन डेटा गोळा करणे शक्य झाले आहे. २०२३ मध्ये, ’SVW’च्या टीमने व्हिएतनामच्या तीन राष्ट्रीय उद्यानांमधील २०१८-२०२१ चा डेटा वापरून त्यांचा पहिला पेपर प्रकाशित केला. पावसाळ्यात, पँगोलिन दिवसा झाडांवर झोपतात, त्यामुळे ते संशोधकांना पायी चालताना सहज सापडू शकतात. परंतु, कोरड्या हंगामात, जेव्हा दिवसा पंगोलिन जमिनीखाली विसावा घेतात, तेव्हा त्यांना शोधताना पँगोलिनच्या फक्त दहा मीटर (३३ फूट) अंतरावर असणे आवश्यक असते. पण, ऑस्ट्रेलियामधील कंपनीच्या ड्रोनमुळे हे लांबून शोधणे शक्य झाले आहे. परंतु, ड्रोन हे परिपूर्ण साधन नाही. याबरोबर पायी चालणारे संशोधक हवेच. ड्रोनमुळे सोडलेले पँगोलिन जीवंत आहेत की नाही, याचे उत्तर मात्र मिळू शकते, हे निश्चित!
 
 
उमंग काळे

 

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.