राम मंदिराचे शुद्धीकरण करू पाहणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा! : गोविंददेव गिरी महाराज

    13-May-2024
Total Views |

Govinddev Giri Maharaj
(Govinddev Giri Maharaj)

ठाणे (प्रतिनिधी) :
"श्रीराम मंदिराकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना, मंदिराचे शुद्धीकरण करू पाहणाऱ्यांना मतदान करून धडा शिकवावाच लागेल. रामराज्य आणायचे असेल तर अशा लोकांची मढी उतरवावीच लागेल.", असे प्रतिपादन श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.

अखंड भारत व्यासपीठ व परममित्र प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद' हा ग्रंथ रविवार, दि. १२ मे रोजी ठाणे येथे प्रकाशित झाला. डॉ. अशोकराव मोडक आणि डॉ. प्रशांत धर्माधिकारी लिखित ग्रंथाचे प्रकाशन स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.


Ayodhya Andolanacha Taleband

काँग्रेसवर निशाणा साधत गोविंददेव गिरी महाराज पुढे म्हणाले, "भारतावर मुघल, इंग्रज, ब्रिटिश अशा अनेक आक्रांतांनी राज्य केलं. त्यानंतर गेली ७० वर्ष एका परिवाराने देशावर राज्य केलं. या काळात हिंदूंना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. भारत हा एखाद्या परिवाराची मक्तेदारी नाही. या घराणेशाहीला येत्या निवडणुकीत धडा शिकवायचाच आहे."

पुढे ते म्हणाले, "हिंदू म्हणून कोणीही सिंहासनावर बसू शकत नाही अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनावर बसावं हा खऱ्या अर्थाने क्रांतीचा विषय होता. तो क्षण म्हणजे हिंदू साम्राज्य दिन. भारत हे अनादी सिद्ध हिंदू राष्ट्र आहे. हिंदु राष्ट्रासाठी राम राज्याची स्थापना होणे आवश्यक होते. श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेने रामराज्याचा शुभारंभ झाला आहे. देशाच्या बदलाचे हे शुभसंकेत आहेत."

Ayodhya Andolanacha Taleband

राम मंदिर हेच राष्ट्र मंदिर आहे यांचा संबंध सांगताना स्वामीजी पुढे म्हणाले, "अडीच एकराच्या भूमीकरिता ५०० वर्ष संघर्ष झाला. ते केवळ सामान्य मंदिर नाही. राष्ट्राचा मूळ गाभा हा धर्मात आहे, राष्ट्राचा डीएनए हिंदू धर्म आहे, प्रभू श्रीराम या धर्माचे प्रतीक आहेत. रामाच्या भरोशावरच राष्ट्राची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे रामापेक्षा मोठा आदर्श होऊ शकत नाही."

कार्यक्रमादरम्यान मंचावर अखंड भारत व्यासपीठाचे अध्यक्ष संजय ढवळीकर, परममित्र प्रकाशनचे माधव जोशी आदी मान्यवरही उपस्थित होते.

पहिली अट 'समर्थ भारत'!
रामराज्य म्हणजे एखाद्या गादीवर बसून राज्य करणे नव्हे. अखंड भारत होण्याआधी समर्थ भारत होणे ही पहिली अट आहे. त्यासाठी संपूर्ण समाजाने संघटित होऊन समर्थ भारत करण्याकडे लक्षकेंद्रित केले पाहिजे. समाज जोपर्यंत उभा राहत नाही, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने उभा राहू शकत नाही. ताळेबंद अजून पुष्कळ बाकी आहे. हा पुस्तकरूपी ताळेबंद वाचून पुढचा ताळेबंद लिहायला सर्वांनी मिळून सुरुवात करू.
- भैय्याजी जोशी, अ.भा. कार्यकारिणी सदस्य, रा.स्व.संघ

भारतीय भूत्वा भारतम् भवेत
श्रीराम मंदिराचे शिल्पकार स्वामी गोविंददेव गिरी महाराज व भैय्याजी जोशी यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणे हे आमच्यासाठी सौभाग्याचेच. भारताचा बदललेला काळ म्हणजे अनेक मुसलमान हिंदू धर्माचा गौरव करू लागलेत. अनेक हिंदू ताठ मानेने जगू लागले आहेत. भारताला शंभर वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्वांच्या मनात 'भारतीय भूत्वा भारतम् भवेत' हा मंत्र रुजवावा लागेल.
- डॉ. अशोकराव मोडक, ग्रंथाचे लेखक