"देशाची चावी योग्य हातात द्या अन्यथा..."; अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहन

    13-May-2024
Total Views |
 
Anna Hajare
 
अहमदनगर : देशाची चावी योग्य हातात द्या अन्यथा देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मतदारांना केले आहे. सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु असून अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
अण्णा हजारे म्हणाले की, "वास्तविक पाहता या देशासाठी लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते स्वातंत्र्य अभाधित ठेवण्यासाठी मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. ज्या दिवशी मतदार जागरूक होईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने देशात जागरूक लोकशाही येईल. त्यामुळे मतदान करताना तीन ते चार गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्यांना मतदान करायचं आहे त्यांनी मागच्या काळात समाजासाठी काय केलं हे पाहणं गरजेचं आहे. तो किती झिजला आणि किती दिव्यासारखा जळला हे पाहून मतदान करायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्याला मत द्यायचं आहे त्याचं चारित्र्य, आचार, विचार, जीवन कसं आहे या सगळ्या गोष्टी मतदाराने पाहायला हव्या, त्यामुळे खरी लोकशाही आणायची असल्यास मतदाराची जबाबदारी फार महत्वाची आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "ज्या बाईने बाळासाहेबांचा म्हातारा म्हटलं तिला..."; भरसभेत व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंचा घणाघात
 
ते पुढे म्हणाले की, "मी पक्ष आणि पार्टी पाहात नाही. हा देश संविधानाच्या आधारावर चालला आहे. संविधान सांगतं की, पक्ष आणि पार्टी नाही तर ज्याचं चारित्र्य आणि आचार-विचार चांगले आहे अशा लोकांना ज्याला मतदान केलं पाहिजे. आपण मतदान करुन कुणाच्यातरी हातात या देशाची चावी देणार असलो तरी पहिली चावी ही आपल्या हातात आहे. ती चावी योग्यप्रकारे लावली पाहिजे. ही चावी चुकीच्या हातात गेली तर देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही," असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुजय विखे पाटील हे उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके हे उमेदवार आहेत. याठिकाणी अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजावला आहे.