घाटकोपरमधील दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू,६६ जखमी!

मान्सूनपूर्व पावसाने मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत दाणादाण

    13-May-2024
Total Views |
8 Dead, 64 Injured As Billboard Collapses

सोसाट्याचा वारा, वादळ, झाडांची सळसळ, ढगांचा गडगडात आणि बेभान होऊन कोसळणारा मान्सूनपूर्व पाऊस...हे दृश्य सोमवार, दि. १३ मे रोजी मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांनी अनुवले. अचानक पडलेल्या या पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, पालघर, रायगड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. जागोजागी झाड पडणे, वीजेचे थांब प्रभावित होणे, पाणी साचणे, बॅनर-होर्डिंग पडणे या घटना घडल्या. ऐन सायंकाळी अचानकपणे पडलेल्या पावसामुळे कार्यालयातून घरी परतणार्‍या चाकरमान्यांना वाहतूक व्यवस्थेतील अडचणींना सामोरे जावे लागले. मान्सूनपूर्व पावसाचा रेल्वे, मेट्रो, रस्ते वाहतूक, बससेवा या सर्वांवरच परिणाम झाल्याचे दिसून आले. तर घाटकोपरमधील दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळले

घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर महाकाय असे अनधिकृत १२० स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळून तब्बल ८० हून गाड्या आणि १०० हून अधिकजण बॅनरखाली अडकले. या दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिली. या घटनेतील जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
वडाळ्यात टॉवर कोसळला

वादळी वार्‍याच्या जोरामुळे वडाळा पूर्व परिसरात बरकत आली नाका या ठिकाणी श्रीजीवी टॉवर कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या दोन ते तीन जणांना अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. येथील टॉवरखाली अडकलेल्या ४ ते ५ चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे.

जोगेश्वरीत झाड कोसळले

सोसाटच्या वारा आणि पडलेल्या मुसळधार पावसात जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी नाका शाखेजवळील मोठे माडाचे झाड कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
 
ठाण्यातील पावसात झाडांची पडझड

सोमवारी दुपारी ठाण्यात वादळी वार्‍यासह कोसळलेल्या पहिल्याच अवकाळी पावसात मोठी पडझड झाली. अचानक वादळी वार्‍यासह धुळ उडवत कोसळलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे ठाणेकरांची त्रेधातिरपीट उडाली. सायंकाळापपर्यंत २५ मि. मीटर कोसळलेल्या या पावसात पत्रे उडाले. तर ४८ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांची मोडतोड झाली.
 
कल्याण डोंबिवलीत वीजपुरवठा बंद

कल्याण डोंबिवलीत सोसाट्याच्या वारा, ढगांचा गडगडाट होऊन मान्सूनपूर्व पाऊस बरसू लागला. त्यामुळे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून आला. रेल्वे उशीराने धावत असल्याने रेल्वे प्रवाश्यांची रेल्वे स्थानकात गर्दी पाहायला मिळाली. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील उल्हासनगरकडे जाणार्‍या रिक्षा स्टॅण्डसमोरील सखल भागात पाणी साचलेले दिसून आले.

ऐरोली, दिघ्यात वीजपुरवठा खंडीत

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात हायटेन्शन वीज वाहिनीच्या टॅावरवर स्पार्कींग होऊ आग लागल्याची घटना घडली. वादळी वार्‍यामुळे येथील टॅावरने पेट घेतला. त्यामुळे, ऐरोली व दिघा परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला.