मालाडमधील नमो यात्रेला कोळी बांधवांचा उस्फुर्त प्रतिसाद

मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्याचे पीयूष गोयल यांचे आवाहन

    12-May-2024
Total Views |
 PIUSH GOYAL
 
मुंबई : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांविषयी कणव असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील या घटकाचा विचार करून मत्स्य संपदा योजनेसह अनेक योजना राबविल्या. येत्या काळात अशा अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पीयूष गोयल यांनी दिली.
 
उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांच्या नमो यात्रेला आज मालाड येथील जरीमरी मंदिर येथून प्रारंभ झाला. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात जन आशीर्वाद रथासह ही रॅली पटेलवाडी, शंकरवाडी, आयएनएस हमलामार्गे आक्सा गावात पोहोचली.
 
यावेळी गावकऱ्यांनी पीयूष गोयल यांचे जोरदार स्वागत करून त्यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहिर केले. यावेळी पीयूष गोयल यांना कोळी टोपी घालण्यात आली. भाटी कोळीवाडा येथे पीयूष गोयल यांनी कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी लागू केलेल्या मत्स्य योजनेचा लाभ घेण्यास सांगितले. यावेळी सुनील कोळी उपस्थित होते.
 
मढ येथील भाजी मार्केट येथे त्यांनी फेरीवाल्यांशीही संवाद साधला. त्यानंतर दर्यादिप सोसायटीतील पदाधिकाऱ्यांशी पीयूष गोयल यांनी चर्चा केली. वेनिला तलाव येथे प्रचार फेरीची सांगता झाली. फेरीत खासदार गोपाळ शेट्टी सहभागी झाले होते.