शर्यतीची चर्चा

    12-May-2024
Total Views |
modi-gandhi
 
 
देशात लोकसभेच्या निवडणुका मध्यावर आल्या आहेत. एकूण सातपैकी तीन टप्पे या निवडणुकीचे पूर्ण झाले असून, आज चौथ्या टप्प्याचे मतदान देशात होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या कल्पना राबवत, विरोधकांवर शरसंधान साधत आहेच. यात एक नवीन कल्पना पुढे आली आहे, ती म्हणजे ‘सार्वजनिक चर्चासत्र’. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार राहुल गांधी यांना एकाच व्यासपीठावर आणून, त्यांच्यात निवडणुकीविषयी चर्चा घडवून आणण्याची ही संकल्पना आहे. सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश अॅड. मदन लोकुर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. पी. शाह आणि प्रसिद्ध पत्रकार एन. राम या त्रयीने याबाबतचे आमंत्रण दोघांना दिले आहे. राहुल गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून, पंतप्रधान मोदींना चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.
 
प्रत्येक देशाची एक विशिष्ट अशी निवडणूक शैली असते. भारतात निवडणुकीमध्ये रॅली, जनसभा यांच्यामाध्यमातून प्रचार केला जातो. तर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार अशा सार्वजनिक चर्चांमधून जनतेला मत देण्यासाठी आवाहन करत असतात. अॅड. मदन लोकुर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. पी. शाह आणि प्रसिद्ध पत्रकार एन. राम यांना सुचलेली कल्पना ही, अमेरिकेच्या पद्धतीप्रमाणेच आहे, हे इथे स्पष्ट दिसून येते. पण, दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे, अमेरिकेत होणार्या चर्चा या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये होत असतात. भाजप आणि मित्रपक्ष पंतप्रधान मोदी यांच्या चेहर्यावरच निवडणूक लढत आहे. मात्र, ‘इंडी’ आघाडीला अद्यापही पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करता आलेला नाही. त्याबाबत त्यांच्यातच अंतर्गत स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आता या चर्चेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे किंवा स्वत: राहुल गांधी चर्चेला येणार असल्याचे सांगून, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. आता जर प्रत्यक्षात ही चर्चा झालीच, तर आकडेवारी, राजकीय इतिहास, देशाची संस्कृती याबाबत हे दोघेही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी स्पर्धा करू शकतील का? हा प्रश्न आहेच. पण तरीही, या चर्चेच्या निमित्ताने का होईना, ‘इंडी’ आघाडीत पंतप्रधानपद काँग्रेसकडून कोणाकडेही जाणार नाही, असा सूचक संदेश काँग्रेसने दिल्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
काँग्रेसचा कोडगेपणा
काँग्रेसचे नेते आणि बहरामपूरचे उमेदवार अधीररंजन चौधरी यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. आजवरचा इतिहास बघता, अधीररंजन चौधरी यांच्या अनेक वक्तव्यांनी काँग्रेसला कायमच अडचणींचा सामना करावा लागल्याचा इतिहास आहेच. यावेळी, प्रचाराचा भाग म्हणून एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, भारतीय उद्योजकांनी काँग्रेसला निधी न दिल्यामुळेच, काँग्रेसने त्यांच्याविरोधात आवाज उठविला असल्याचे सांगितले. या मुलाखतीमध्ये अधीररंजन चौधरी म्हणाले की, “त्यांनी आम्हाला पैसे न दिल्यामुळेच आम्ही त्यांच्याविरोधात आवाज उठविला, जर बॅगा आल्या असत्या, तर आम्ही आवाज उठविला नसता.” यावरून काँग्रेसचा कोडगेपणा आता जगजाहीर झाला आहे. या देशात असणारे उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर हातभार लावत असतात. आज परदेशात पाहिले तर, उद्योजकांनी गुंतवणूक करावी यासाठी पायघड्या घातल्या जातात. पण, आमच्या देशात काँग्रेस देशातील उद्योजकांच्या विरोधात कटकारस्थान करताना दिसत आहे. उद्योजकांच्या शक्तीचा उपयोग करून देशाचे भले करता येऊ शकते, हा विचारच काँग्रेसच्या ध्यानी नाही, हेच सत्य अधीररंजन चौधरी यांच्या अनेक वक्तव्यांने अधोरेखित केले आहे.
 
 
सत्ता हे साध्य आहे की साधन, हेच देशातील सर्वात जुना पक्ष असणार्या काँग्रेसला उमजेनासे झाले आहे. याउलट भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी मोठा हातभार लावल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या देशातल्या उद्योगपतींविषयी सामान्य भारतीयांच्या मनात विष कालवायचे आणि मागच्या बाजूने त्यांच्याकडून पैसे मागायचे, असे प्रकार काँग्रेस कायमच करत आली आहे. पण, उद्योगपतींवर होणारी टीका ही सत्याच्या आधारावर नसून, निधी संकलनासाठीचे ते दबावतंत्र असते. आणि याच काँग्रेसच्या षड्यंत्राचा ढळढळीत पुरावा अधीररंजन चौधरी यांनी मोठ्या अधीरतेने देऊन टाकला. अंबानी, अदानी किंवा टाटा यांसारख्या सर्वच उद्योगपतींनी कायमच या देशासाठी योगदान दिले आहे. पण, अशा उद्योजकांच्या विरोधात स्वार्थासाठी आरोप करून, त्यांचे आणि पर्यायाने देशाचे नाव खराब करण्याचा कोडगेपणा काँग्रेसच करू शकते हे निश्चित.
 
कौस्तुभ वीरकर