मातीतून माणसं घडविणारा श्रेयस

    12-May-2024   
Total Views |
 Shreyas Garge
 
पिढीजात चालत आलेला वारसा पुढे नेण्यासाठी अतिशय कष्टप्रत साधना करणार्या नाशिक येथील श्रेयस गर्गे याच्याविषयी...
 
नाशिकच्या कुशीतील गोष्ट आहे, १०० वर्षांपूर्वीची. गजानन नारायण गर्गे नावाचा एक कलाकार युवक, श्रीगणेशाच्या मूर्ती साकारत असे. या मूर्तींचे वैशिष्ट्य असे की, लोकांना ‘आर्टिस्ट’ची म्हणजेच, ग. ना. गर्गे यांचीच मूर्ती हवी असायची. मूर्तींना पंचक्रोशीतून मागणी येऊ लागली. त्यांनी नाशिकमध्येच एक कारखाना सुरू केला. मागणी इतकी असे की, त्यांनी मूर्ती सोडून इतर कोणत्या कलाकृती साकारल्याच नाहीत. पुढे, त्यांचे पुत्र मदन गर्गे याच व्यवसायात आले.
 
परंतु, वडिलांचे निधन फार लवकर झाल्याने, त्यांच्या वडिलांची केवळ काही छायाचित्रेच कारखान्यात शिल्लक होती. मदन गर्गे शिक्षणासाठी मुंबईतील सर जे. जे. कलामहाविद्यालयात आले, आणि शिकून झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या गावी जाऊन कलाराधना करणेच पसंत केले. पण तेही लवकर स्वर्गवासी झाले. परंतु, त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नीने कारखाना सांभाळला, आणि नावारुपास आणला. ‘गर्गे आर्ट स्टुडिओ’ नावाने आज तिसरी पिढी १०० वे वर्ष साजरे करत आहे. अरुण ताईंच्या नंतर त्यांचा कनिष्ठ पुत्र, तिसर्या पिढीतील गर्गेंचावारस, याच स्टुडिओत शिल्पे तयार करू लागला. तोच श्रेयस! ही गोष्ट आहे श्रेयसचीच.
 
शाळेत चित्रकलेचा तास सुरू होता. चित्रकलेच्या बाई सगळ्यांची चित्रे पाहात होत्या. अचानक एक कागद दोन्ही हातात घेऊन त्या थांबल्या. एक क्षण त्यांनी चित्रातून नजर बाजूला घेऊन, समोरच्या छोट्या श्रेयसकडे पाहिले. त्यांनी आपल्या हातातला चित्राचा कागद टराटरा फाडला. तो समोरचा चित्रकार केवळ १२ वर्षांचा होता. हाच मुलगा आज ‘गर्गे आर्ट स्टुडिओ’ १०० व्या वर्षात पदार्पण करताना, संपूर्ण स्टुडिओ एकहाती चालवितो आहे. कला ही विद्या आहे की प्रतिभा? माणूस ती जन्मजात घेऊन येतो, की तिला साधनेने साध्य करता येते? श्रेयसला चित्र काढण्यात फारसा उत्साह नव्हताच.
 
दहावी नंतर काय करायचे हेसुद्धा त्याचे ठरले नव्हते. वडिलोपार्जित शिल्पकारी करायची आहे, हे सुद्धा ठरले नव्हते. आईने एकदा सांगितले थोडे काम करायला. माती हातात घेतली. आकार देणे सुरू झाले, आणि आईचे प्रशस्तीपत्र मिळाले. तू करू शकशील. झाले! श्रेयस आता आईच्या हाताखाली शिकू लागला. सोपे असते मातीला आकार देणे. फक्त संवेदनशील नजर लागते त्यासाठी. मातीशी आपली नाळ बालपणापासूनच जुळलेली असते. तिचा पोत समजून घेतला, तिची रचना समजून घेतली की उरते ते काय? आपले माडगूळकर म्हणून गेलेत ना, ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, माती पाणी उजेड वारा तूच मिसळाशी सर्व पसारा.’ मातीला आकार देऊन जो विश्व निर्माण करू शकतो, तो या विश्वकर्म्याच्या बरोबरीचा!
 
श्रेयसची गोष्ट इतर मूर्तिकारांसारखी नाही. शिल्पकला त्याने वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी शिकून घेतलीय. घरातून असलेला वारसा आहेच, घराची पारंपरिक शैली आता बोटात बसली आहे. आईने त्यांना स्केचबुक घेऊन भविष्यात विचार करत असलेल्या शिल्पाची, मनात उमटलेली चित्रे काढायला सांगितली. जेवढी चित्रे जास्त, तेवढे शिल्प उत्तम जमणार. चित्रकला यायला हवी. शिल्प चांगले व्हावे, यासाठी प्रयत्नशील असलेला श्रेयस तासंतास चित्रे रेखाटू लागला. मनाजोगती प्रतिमा मिळाली की, मगच शिल्पाला हात घालू लागला. श्रेयसची गोष्ट वेगळी का आहे माहीत आहे? श्रेयसचा काळ वेगळा आहे. करियरला सुरुवात करून, आपली शैली वर्षानुवर्षे कायम ठेवणारे चित्रकार अनेक असतात.
 
पण, श्रेयसच्या काळात बाहेरचे जग आमूलाग्र बदलले. जागतिकीकरण झाले, डिजिटल क्रांती झाली. कोरोनाची तीन वर्षे डोकावून गेली. हाताहातात मोबाईल आले आणि त्यावर फेसबूक, इंस्टाग्राम यासारखीअॅप्स आली. या इंटरनेट क्रांतीची लाट नाशिकमधील श्रेयसच्या स्टुडिओतसुद्धा पोहोचली. मोकळ्या वेळात इंस्टाग्राम चाळताना त्याने शिल्पकलेबाबत लोक काय करतात, भारताबाहेरचे कलाकार काय करतात्, याबद्दल जाणून घेण्याची स्वाभाविक उत्सुकता, श्रेयसलासुद्धा जाणवत होती. युरोपातील कलाकार आपल्याकडील पारंपरिक पद्धत सोडून, नवे काही करत आहेेत. लहान लहान १२-१३ वर्षांची मुले, विषयांच्या बंधनातही अडकून पडत नाहीत.
 
केवळ शैलीच नाही, तर विषयसुद्धा वेगळे. या कलाकारांच्या सफाईदार हातांची त्याला भुरळ पडली. त्या बोटांतून शेवटचा फिरणारा फिनिशिंगचा हात पाहून, त्यानेही शिकायचे ठरविले. ही कला हळूहळू भारतातसुद्धा पाय रोवू लागली होती. पण, अजून नाशिकपर्यंत तिचे कात पोहोचले नव्हते. पुण्यात एक तरुण या कलेचे प्रशिक्षण देतो, हे कळल्यानंतर त्याच्या पुणे वार्या सुरू झाल्या. रविवारी पुण्यात जाऊन, दोन दिवस त्याच्याच घरी राहून गुरुशिष्य परंपरेतील शिक्षण घेणे आणि दोन दिवसांनी नवे ज्ञान मिळवून परत येणे; हे नेहमीचे झाले आहे.
 
या पद्धतीने काम करण्यास त्याने सुरुवात केली आहे. पण, अजूनही कारागिरी शिकून घेणे सुरू आहे, असे तो म्हणतो. कारागिरी पूर्ण समजली, की मग सुरू होईल, तो अभिव्यक्तीचा खेळ. शोध, कलेचा आणि तिच्या अभिव्यक्तीचा. या कलासाधनेच्या प्रवासात श्रेयसला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!
 
 

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.