ममता, मुल्ला, मदरसा अन् माफिया...

    12-May-2024
Total Views |
 West Benga
 
कोणे एकेकाळी बंगालच्या अस्मितेला गोंजारून एकहाती सत्ता मिळवणार्या, ममता बॅनर्जी यांनी आता मुस्लीम तुष्टीकरणावर भर दिला आहे. यासाठी हिंदूचे मानसिक खच्चीकरण करतात, आणि दुसरीकडे बांगलादेशातील मुस्लिमांचे स्वागत करतात, सीएए, राम मंदिराला असणारा विरोध हा मुस्लिमांची मते हातची जाऊ नयेत, यासाठीच त्यांचे प्रयत्न आहेत.
 
तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचे धोरण बदलले असून, त्या ‘माँ माटी मानुष’, ऐवजी ‘मुल्ला मदरसा माफिया’चे राजकारण करत असल्याचा घणाघात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ममता यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमधील मुल्लांना प्रोत्साहन दिले जात आहे, मदरसे जनतेचा सर्व पैसा मिळवत असून, माफिया जनतेची लूट करत आहेत, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
 
बांगलादेशातून बंगालमध्ये सर्वाधिक घुसखोरी झाल्यामुळे, तेथील जनतेलाच त्याचा फटका बसला आहे. अमित शाह यांनी नेमकेपणाने त्यावर बोट ठेवत, सीएएचा मुद्दा अधोरेखित केला. बांगलादेशातून भारतात आलेल्या अत्याचारित अल्पसंख्यांकांना, भारताचे नागरिकत्व देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ममता बॅनर्जी यांनीच सीएएला सर्वात जास्त विरोध केला अस्ल्याने, अमित शाह यांनी तेथेच हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात मांडत, त्यांची राजकीय कोंडी केली आहेे.
 
संदेशखलीतील महिलांचे शोषण करणार्या शाहजहान शेख, याला पाठीशी घालणार्या ममता याच होत्या. त्यांनीच शाहजहान शेख याची अटक टाळण्याचा, आटोकाट प्रयत्न केला. अखेर न्यायसंस्थांनी कठोर शब्दांत त्यांना समज देत, केंद्रीय यंत्रणांना तपास करण्याचे आदेश दिले, तसेच शाहजहान शेखचा ताबाही देण्याचे आदेश दिले. त्यानंतरच, शाहजहान शेखचा ताबा केंद्रीय तपास यंत्रणांना मिळाला. अमित शाह यांनी त्यांच्या बदललेल्या राजकारणावर नेमकेपणाने बोट ठेवत, त्यांची राजकीय अधोगती दाखविली आहे. कोलकाता विद्यापीठातून कायदा आणि कला या विषयांची पदवी मिळविलेल्या, ममता यांनी काँग्रेसमधूनच राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
 
सामान्यांसाठी काम करणार्या ममता यांना ‘दीदी’ अशी ओळख याच सामान्यांनी मिळवून दिली. त्यांची साधी राहणी आणि आईच्या घरातील वास्तव्य, सामान्यांच्या मनात ‘ममत्व’ निर्माण करणारे ठरले. १९९९ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत ‘तृणमूल काँग्रेसची‘ स्थापना केली. तृणमूलची स्थापनाही जनसामान्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठीच होती. त्यांनी त्यांचे प्रश्नच प्राधान्याने हाती घेतले. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिले होते. या काळात त्यांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय असेच होते. पण त्याहीवेळी अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वाधिक त्रास देणार्याही त्याच होत्या.
 
२०११ मध्ये त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या ‘महिला मुख्यमंत्री’ झाल्या. विकास, महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याण कार्यक्रमांवर त्यांनी लक्ष दिले होते. पण त्यानंतर त्यांनी तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केले. ममता यांनी मुस्लिमांचे तुष्टीकरण, हाच एककलमी कार्यक्रम हाती घेतला. बांगलादेशातून येणारे घुसखोर, ही त्यांची हक्काची एकगठ्ठा मते आहेत. म्हणूनच त्या त्यांचे स्वागत करतात. मुस्लिमांचा ‘सीएए’ला विरोध आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जीही त्याला प्राणपणाने विरोध करतात. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला त्या उपस्थित राहिल्या नाहीत, कारण मुस्लिमांची मते. मुस्लिमांचे तुष्टीकरणासहित ‘भ्रष्टाचार’ही त्यांच्या राजकारणाचा पाया आहे.
 
तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांनी करोडो रुपयांचा केलेला भ्रष्टाचार, उघड झाला आहे. ममता यांच्या सत्ताकाळात, पश्चिम बंगालमध्ये शिधापत्रिकेवरच्या धान्य वाटपात भ्रष्टाचार झाला, महापालिका नोकरभरती, शिक्षकभरती यातही भ्रष्टाचार झाला. गायी आणि गोवंश तस्करीलाही त्यांनीच चालना दिली. चौकशी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय यंत्रणांना राज्यात रोखण्याचे धोरण त्यांनी अवलंबिले.
 
‘सीबीआय’ तसेच ‘ईडी’ यांना रोखण्यासाठी, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये असलेल्या सत्तेचा दुरुपयोग केला. केंद्रीय यंत्रणांच्या पथकावर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत तृणमूलच्या गुंडांची मजल गेली. तेथील पोलीस यंत्रणा ही, राज्य सरकारच्या दावणीला बांधलेली असल्याने, त्यांना असे प्रकार दिसलेच नाहीत. ममता यांनी सत्तेचा वापर, तृणमूलच्या गुंडांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठीच केला. ‘अनुब्रत मंडल’ हा आणखी एक गुंड. त्याला वाचविण्यासाठीही ममता यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. समाज कल्याणाच्या योजना राबविण्याऐवजी, त्यांनी गुंडांना मोठे करण्याचे धोरण अवलंबिले. म्हणूनच, तेथे रोजगारांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. राज्याचा विकास खुंटला. परिणामी तेथील युवा वर्गाला रोजगारासाठी अन्य राज्यात जाणे भाग पडले.
 
संदेशखालीतील महिलांचे झालेले शोषण, ही खरे तर ममता यांच्यासाठी लाजीरवाणी बाब होती. एक महिला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना, शाहजहान शेख संपूर्ण गावातील महिलांना वेठीला धरून त्यांचे शोषण करतो, ही एकच बाब ममता यांचे तुष्टीकरणाचे धोरण ठळकपणे दर्शविते. केवळ शाहजहान शेखच नव्हे, तर तृणमूलचे कार्यकर्तेही या शोषणात सहभागी झाले. संदेशखालीतील गुन्हेगारांना भाजप उलटे टांगून त्यांना सरळ करेल, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला आहे. भाजपने या प्रकरणी राजकारण केले, असा कांगावा करणार्या ममता बॅनर्जी यांना, ही चपराकच आहे.
 
ममता यांच्या कार्यकाळात शेकडो महिलांचे झालेले शोषण हे कधीही समर्थनीय ठरू शकत नाही. मात्र, ममता यांनी तुष्टीकरणासाठी तेही केले. मुस्लिमांची एकगठ्ठा मते हातातून जाऊ नयेत, यासाठी त्यांनी संदेशखलीतील शोषणाला पाठिंबा देत, ‘मुल्ला मदरसा माफिया’ हेच आपले धोरण असल्याचे दाखवून दिले. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला म्हणूनच त्यांनी विरोध केला आहे. ‘इंडी’ आघाडी सत्तेवर आली, तर संसदेत नवा कायदा आणून सीएए रद्द केला जाईल, असे आश्वासन ममता यांनी दिले आहेच, ते याच तुष्टीकरणाच्या मानसिकतेतून. बांगलादेशातून आलेले मुस्लीम यांना चालतात, मात्र हिंदू, शीख यांना नागरिकत्व देण्यास त्यांचा विरोध असतो,यावर टीकाकरून अमित शाह यांनी ममता यांच्या मर्मावरच बोट ठेवले आहे.