"काँग्रेस बुडती नाव, शरद पवारांनी अजितदादांसोबत आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेसेनेसोबत जावे"

देवेंद्र फडणवीसांचा पवार-ठाकरेंना सल्ला

    11-May-2024
Total Views |
fadanvis pawar
 
भोसरी : "बारामतीच्या सभेनंतर शरद पवारांच्या लक्षात आले आहे, की आता हवा अजितदादांची आहे. म्हणून ४ जूननंतर छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, असे वक्तव्य त्यांनी केले. काँग्रेस बुडती नाव आहे, त्यात बुडण्यापेक्षा शरद पवारांनी अजितदादांसोबत आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेसेनेसोबत जावे", असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.
 
महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार, दि. ११ मे रोजी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपचे राज्य सचिव अमित गोरखे, शिवसेना नेते इरफान सय्यद, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर राहुल जाधव, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती मंगलदास बांदल, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष गणेश कवडे, राम गावडे, बाळासाहेब गव्हाणे यांच्यासह महायुतीच्या विविध घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते,
 
फडणवीस पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड म्हणजे छोटा महाराष्ट्र आहे. सर्व राज्यातील लोक इथे राहतात. आमदार लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी विकासातून या भागाचा कायापालट केला आहे. रेड झोन बंदी उठवणे, आंद्र प्रकल्पाचे पाणी आणणे, पीएम आवासची २० हजार घरे देणे, शास्तीकर रद्द करणे, कचरा प्रक्रीया प्रकल्प उभा करणे, असे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे सर्व साध्य करण्याकरिता मोदींना पाठबळ देण्यासाठी आढळरावांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. कोल्हेंचा सिनेमा, नाटक सर्व फ्लॉप झाले आहे, म्हणून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. ते केवळ नाटकच करतात आणि जनतेला विसरुन जातात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
 
मावळच्या विकासासाठी कटिबद्ध
रेड झोन बंदी उठवणे, इंद्रायणी नदी स्वच्छ करणे, पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो जोडणे आमच्या प्राधान्यक्रमावर आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ३ मजली रस्त्याचा डीपीआर तयार झाला आहे. तुमचे शहर आधुनिक शहर करायचे आहे आणि हा विकास करणारी केवळ महायुतीच आहे. हे ध्यानात घेऊन आढळराव यांना मताधिक्याने निवडून द्या. काँग्रेस डुबती नाव आहे, ती तुम्हालाही डुबवणार, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.