संग्रहालये धुंडाळताना

    11-May-2024   
Total Views |

sangrahalaye 
 
पुस्तक विकत घेताना त्यांच्या विषयांचा अभ्यास करतो का आपण? मुळात पुस्तके वाचण्यासाठी आज वाचनालये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना सुद्धा काही पुस्तके आपण संग्रही ठेवण्यासाठी घेतोच. तसेच संग्रही असावे असे हे लहानसे पुस्तक. डॉ. सुधाकर आगरकर यांनी लिहिलेले हे पुस्तक मुंबईच्या महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाने प्रकाशित केले आहे. खरेतर त्यांचा हा प्रवास केवळ संग्रहालये पाहण्यासाठी नव्हता तर नवनवे प्रांत, विविध देश पाहताना तेथील संग्रहालये शोधून आपल्या कामातून वेळ काढून ते त्या स्थानांना भेटी देत. तिथल्या लोकांशी बोलत. बोलून झ्याल्यावर तिथे संग्रही असलेल्या प्रत्येक वस्तूचे निरीक्षण करत. आणि त्याच्या नोंदी लिहून ठेवत. पुन्हा मायदेशी परतल्यावर त्या अनुभवांवर आधारित लेखन करत. या पर्यटनातून टिपून घेतलेल्या संवेदनांवर हे पुस्तक बेतलेलं आहे.
 
पुस्तकाचे मुखपृष्ठ पुस्तक वाचायला मार्गदर्शक ठरावे असे सोप्पे आहे. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर संपूर्ण जगाचा नकाशा काढून त्यावर संग्रहालयांची ठिकाणी नेमकी कोणत्या प्रांतात आहेत हे लाल ठिपक्याने अधोरेखित करून त्या त्या शहराची नवे दिलेली आहेत. लेखकाने पुस्तक संग्रहालयांचे अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना समर्पित केले आहे. विद्यार्थ्यांबद्दलची त्यांची भावना पाहून मला छान वाटले. विद्यार्थी म्हणजे खरे ज्ञान साधक. पाठ्यपुस्तकाबाहेरचे ज्ञान ज्यांना मिळवावेसे वाटते त्यांच्यासाठी अशा जाणत्यांनी ज्ञानाचा साठा तत्परतेने उपलब्ध करून द्यायला हवा. विद्यार्थीदशेत त्यांचे वय लहान असते, जगाचा माणसांचा अनुभव गाठीस नसतो आणि आर्थिक स्वातंत्र्यही नसते. असतो तो केवळ ज्ञानलालसा पुरी करण्याचा हव्यास. साहजिकच हातात वेळ फार असूनही त्यांच्यावर बंधने फार येतात. आजच्या इंटरनेटच्या सुलभीकरणाने त्यांची ही घुसमट कित्येक अंशी कमी झाली असली, तरीही आजवर ही अशी पुस्तकेच त्यांना आधार देत राहिली.
 
आपल्याकडे शिक्षण म्हणजे संपूर्ण सामाजिक राष्ट्रीय सांस्कृतिक जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. तसंच, हे सार्वत्रिक आणि सार्वकालिक सत्यही आहे. 2020 साली भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जारी केलं. आजही न्यू एज्युकेशन पॉलिसी टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रमामध्ये परावर्तित होत आहे. या धर्तीवर विद्यार्थ्यांना जगाशी जोडण्याचं, आणि जगातलं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कसब शिक्षकांसोबत ही अशी ज्ञानवंत पुस्तके सुद्धा प्रामाणिकपणे बजावत आहेत. हे पुस्तक शिक्षक, पालक, शासकीय यंत्रणा, शैक्षणिक कार्यकर्ते, शिक्षण संस्था, उद्योग विश्व, इत्यादी अनेकांसाठी उपयुक्त असे आहे. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात अनेक गोष्टी कार्य करत असतात. घर, शैक्षणिक संस्था आणि समाज हे तीन त्यातले प्रमुख घटक आहेत. सोबतच आजूबाजूला असलेल्या सुविधा, उद्बोधनाच्या संधी, समाजात आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा या बाबी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आपण शालाबाह्य या गोष्टींकडे कितपत लक्ष देतो? विद्यार्थ्यांना या गोष्टींची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण माहितीतून पुढे त्यांना अभ्यास करावासा वाटेल आणि त्यानंतर विद्यार्थी ज्ञानाभिमुख होतील. विद्यार्थ्यांच संपन्न होणं पुढे जाऊन भारताच्या हितासाठीच कारणीभूत ठरेल. आजचे विद्यार्थी ही उद्याच्या भारताची संपन्न पिढी असेल. तेव्हा या पुस्तक लिहिण्यामागे असलेल्या लेखकाच्या आणि प्रकाशकांनी घेतलेल्या दखल व मेहनतीचे कौतुक करावेच लागेल.
 
या पुस्तकात एकूण 18 संग्रहालयांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यात सिंगापूर मधील दोन संग्रहालये आहेत. एक आहे न्यू वॉटर केंद्र तर दुसरे समृद्ध ग्रंथ संपदा. त्यानंतर थायलंडचे राष्ट्रीय संग्रहालय, व्हिएतनाम येथील कुची टनेल, हॉंगकॉंग जवळचे पाणथळ उद्यान, तसंच तेथीलच मध्यवर्ती वाचनालय, चीनमधील प्राचीन संस्कृती दर्शन आणि थ्री गॉर्जेस म्युझियम, मलेशियातील पुरातत्व संग्रहालय, ब्रिटन मधील ब्रिटिश म्युझियम आणि डार्विनचे निवासस्थान - राष्ट्रीय स्मारक, डेन्मार्क येथील जहाज संग्रहालय आणि राष्ट्रीय संग्रहालय तर, रशिया येथील मूषक संग्रहालय आणि मुलांचे वाचनालय, ऑस्ट्रेलियाचे सायन्स वर्क्स तर, ब्राझील मधील गोंडवाना संग्रहालय आणि राष्ट्रीय संग्रहालय, इतकी संग्रहालय या पुस्तकात दिलेली आहेत. यात वाचनालयांचा सहभाग आहे, तसेच विज्ञान केंद्र, मानव संग्रहालय पर्यटन स्थळे सुद्धा आहेत. विद्यार्थ्यांसोबत सर्व जिज्ञासू वाचकांच्या संग्रही असावे असे हे पुस्तक.
 
पुस्तकाचे नाव - संग्रहालयांची दुनिया
लेखकाचे नाव - डॉ. सुधाकर आगरकर
प्रकाशक - महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ, मुंबई
पृष्ठ संख्या - 81
मूल्य - १२०/-

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.