लोकशाही धोक्यात नसून त्यांचे पक्ष धोक्यात - रामदास आठवले यांची इंडी आघाडीवर टीका

नरेंद्र मोदी संविधानाला मानणारे नेते

    11-May-2024
Total Views |
ramdas athavle
 
ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भीमशक्ती शिवशक्तीचा गड आहे. तरीही जाणीवपूर्वक समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सातत्याने संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात असल्याचे बोलले जाते. खरे तर लोकशाही धोक्यात नसून त्यांचे पक्ष धोक्यात आल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान पवित्र आहे, आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला मानणारे नेते आहेत.त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही. असेही ना.आठवले म्हणाले.
 
ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत रामदास आठवले सहभागी झाले होते. यावेळी माजी खा.डॉ.संजीव नाईक,मा.आ. रविंद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, स्लम सेलचे कृष्णा भुजबळ आदीसह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांच्या महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
जय भिम आहे आमच्या गाठिशी, मग आम्ही का उभे राहणार नाही म्हस्के यांच्या पाठिशी,' अशी मिश्किल कविता करत रामदास आठवले म्हणाले की, विरोधकांकडे आता दुसरा कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान पवित्र आहे. देशाचा विचार केला तर संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे. नरेंद्र मोदी हे संविधानाला मानणारे नेते असल्यानेच त्यांनी संविधानावर माथा टेकवून शपथ घेतली. तसेच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर पाळण्याचे आदेश दिले. बाबासाहेबांची अनेक कामे मोदींनी पूर्ण केलेली आहेत जी काँग्रेसच्या काळात झाली नव्हती. त्यामुळे, संविधान बदलण्याचा विषयच येत नाही. जाणीवपूर्वक समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सातत्याने संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. खरे तर लोकशाही धोक्यात नसून त्यांचे पक्षच धोक्यात आल्याची टीका आठवले यांनी केली.