उत्तर मुंबईत अनोळखी उमेदवारामुळे काँग्रेसचे पारंपरिक मतदारही संभ्रमात

"डिपॉझिट" वाचवण्यासाठी धडपड; प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेते चिंतेत

    11-May-2024
Total Views |

Bhushan patil
 
मुंबई : उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला. डोळे बंद करून कोणालाही तिकिट द्यावे, निवडून येण्याची खात्री हमखास. यंदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उमेदवार असल्यामुळे बळ दुपटीने वाढले. अशावेळी विरोधी पक्षांपैकी कोणीही येथून लढण्यास तयार नसताना, ठाकरेंनी मोठ्या शिताफीने ही जागा काँग्रेसच्या गळ्यात मारली आणि अंग काढून घेतले. अशावेळी मैदान सोडून पळाल्याचा संदेश बाहेर जाऊ नये, याच एकमेव उद्देशाने भूषण पाटील यांचे नाव घोषित करण्यात आले. मात्र, मालाड पश्चिमेपासून दहिसरपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात अनोळखी उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसचे पारंपरिक मतदारही संभ्रमात असून, 'डिपॉझिट' वाचवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.
 
सुरुवातीला ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर लढण्यास इच्छुक होते. त्यांनी ताकदीचा अंदाज घेण्यासाठी काही विभागांत चाचपणी देखील केली. ही संधी साधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी, उत्तर मुंबईच्या बदल्यात ठाकरे गटाने दक्षिण मध्य मतदारसंघ आपल्याला द्यावा, अशी आग्रही मागणी केली. परंतु, भाजपच्या गोयल यांच्यासमोर निभाव लागणार नसल्याची बाब हेरत ठाकरेंनी जागा बदलाचा प्रस्ताव धुडकावला. तिकडे घोसाळकरांनीही या मतदारसंघातील राजकीय गणिते लक्षात घेऊन उमेदवारीसाठी फारसा आग्रह धरला नाही.
 
दुसरीकडे, लाखभर मते मिळतील, इतकीही ताकद नसताना उत्तर मुंबईत उमेदवार कोण द्यावा, असा पेच प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांसमोर निर्माण झाला. या मतदारसंघातील एकमेव काँग्रेस आमदार (मालाड पश्चिम) अस्लम शेख यांचे नाव पहिल्या टप्प्यात चर्चेला आले. परंतु, त्यांनी साफ नकार दिला. त्यात संजय निरुपम यांची हकालपट्टी केल्यानंतर पर्यायी चेहराच काँग्रेससमोर उरला नाही. त्यामुळे सहानुभूतीचे कार्ड खेळण्याच्या उद्देशाने तेजस्वी घोसाळकर यांच्यासमोर काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु, त्यांनी फारसा रस दाखवला नाही. परिणामी, नाईलाजास्तव भूषण पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बोरीवली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. केवळ ३५ हजार मते मिळाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यामुळे काँग्रेसने अगदीच अनोळखी उमेदवार दिल्याने गोयल यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाल्याची चर्चा आहे.
 
विधानसभेतील पक्षीय बलाबल
मतदारसंघ उमेदवार मतदान (२०१९)
१) बोरीवली सुनील राणे (भाजप) १,२३,७१२
२) दहिसर मनिषा चौधरी (भाजप) ८७,६०७
३) चारकोप योगेश सागर (भाजप) १,०८,२०२
४) कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजप) ८५,१४२
५) मागाठाणे प्रकाश सुर्वे (शिवसेना) ९०,२०६
६) मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस) ७९,४९४
 
२०१९ मधील लोकसभेचे चित्र
पक्ष उमेदवार मते
भाजप - गोपाळ शेट्टी ७,०६,६७८
काँग्रेस - उर्मिला मातोंडकर २,४१,४३१