शिवरायांविषयी संभ्रमनिर्मितीचा ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’चा ‘ध्रुव'

    11-May-2024
Total Views |
dhruv rathee video

युट्यूबर ध्रुव राठी याने नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक व्हिडिओ तयार केला. महाराज कसे मुस्लीमधार्जिणे होते, हे सिद्ध करण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी सांगण्यापासून इतिहासात नवीन पात्र जन्माला घालण्यापर्यंतच्या कसरती ध्रुव राठीने त्या व्हिडिओत केल्या आहेत. त्याचा तो व्हिडिओ बघून मला नवीन काही वाटले नाही. कदाचित, ध्रुवला त्या व्हिडिओची ‘स्क्रिप्ट’ एखाद्या ‘ब्रिगेडी’ अथवा ‘बामसेफी’ माणसाने लिहून दिली असावी. कारण, हाच खोटा इतिहास हे लोक महाराष्ट्राच्या कानीकपाळी ओरडून सांगत असतात.

ध्रुव राठी नावाचा एक प्रसिद्ध युट्यूबर. विविध विषयांवर व्हिडिओ तयार करुन लोकांना भ्रमित करणे, हा त्याचा मुख्य उद्देश. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ’अस्थिर’ ध्रुव राठीचे व्हिडिओ बघून भारतातील समस्त गुलाम मानसिकतेला आनंदाचे जणू भरते आले आहे. हिंदुत्व, संघ आणि मोदी यांना शिव्या घालणारा कोणीही असला तरी त्याला गुलामवर्ग डोक्यावर घेऊन नाचतो. मग त्याला हा ध्रुव राठी तरी अपवाद कसा ठरणार? ध्रुव राठी याने नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक व्हिडिओ तयार केला. ते कसे मुस्लीमधार्जिणे होते, हे सिद्ध करण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी सांगण्यापासून इतिहासात नवीन पात्र जन्माला घालण्यापर्यंतच्या कसरती ध्रुव राठीने केल्या आहेत. त्याचा तो व्हिडिओ बघून मला नवीन काही वाटले नाही. कदाचित, ध्रुवला त्या व्हिडिओची ‘स्क्रिप्ट’ एखाद्या ‘ब्रिगेडी’ अथवा ‘बामसेफी’ माणसाने लिहून दिली असावी. कारण, हाच खोटा इतिहास हे लोक महाराष्ट्राच्या कानीकपाळी ओरडून सांगत असतात. ध्रुव राठी याने अनेकदा आपल्या व्हिडिओत ‘व्हॉट्सअ‍ॅप माफिया’ असा शब्द वापरला आहे. पण, हा व्हिडिओ बघितला की, तो स्वतःच ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीचा टॉप विद्यार्थी’ असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. तो या व्हिडिओत अनेकदा ‘ब्रेन वॉश’ हा शब्द वापरतो, पण त्याचाच मुळी ‘ब्रेन वॉश’ झाल्याचे स्पष्ट दिसते.
 
ध्रुव राठीने उपस्थित केलेले मुद्दे बघता, त्याचे शिवचरित्राविषयीचे अज्ञानच उघड होते. तो म्हणतो की, छत्रपती शिवाजी महाराज हे केळशीच्या याकूतबाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी नेहमी जात असत. वास्तविक, या गोष्टीला एकही समकालीन प्राथमिक पुरावा उपलब्ध नाही. याकूतबाबाचा उल्लेख असलेली 91 कलमी बखर उत्तरकालीन आहे आणि ती विश्वासार्ह नाही. ही बखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर सुमारे 70 वर्षांनी लिहिलेली आहे. कुठल्या तरी मुस्लीम सरदाराच्या सुनेची अशीच थाप ध्रुव राठीने मारली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शिवरायांच्या विरोधात लेखन केले, असेही ध्रुव या व्हिडिओमध्ये बरळतो. पण, हा दावादेखील अत्यंत खोडसाळपणा केलेला आहे. मुळात सावरकरांच्या जीवनकार्याची प्रेरणाच छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात 700 पठाण सामील झाल्याचा उल्लेख ध्रुव राठी करतो. त्याचादेखील अस्सल समकालीन संदर्भ सापडत नाही. याचा परामर्श इतिहास अभ्यासक नागेश सावंत यांनी घेतला होता. ते लिहितात, “उत्तरकालीन चिटणीस बखरीत एक उल्लेख सापडतो, ही उत्तरकालीन असून लेखनकाळ 1810 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 130 वर्षांनी लिहिलेली आहे. सदर बखरीतील नोंद पाहता, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली, त्या सुमारास विजापूर दरबारातील 700 पठाण नोकरीस आले.”

छत्रपती शिवाजी महाराजांचा मुसलमानांवर भरवसा नाही, असे खुद्द बखरकार सांगत आहे. अशावेळी गोमाजी नाईक यांनी मध्यस्थी करून राज्यवाढीसाठी सैन्याची गरज लागणार, त्यामुळे त्यांना ठेवून घ्यावे, असा सल्ला दिला. त्यामुळे महाराजांनी त्यांना ठेवून घेतले, परंतु त्यांना विशेष लष्करी पद न देता त्यांना सरदार राघो बल्ल्हाळ अत्रे यांच्या देखरेखीखाली ठेवले. सदर 700 पठाणांची शिवदिग्विजय बखरीतील नोंद पुढीलप्रमाणे - “700 पठाण स्वार दौलताबादकरांकडील दिल्लीहून बेरोजगार सर्व देश फिरोन, महाराजांचा प्रतापोदय ऐकून महाराजांच्या आश्रयास आले. गोमाजी नाईक यांच्या सल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी चाकरीस ठेविले.” सदर बखर ही उत्तरकालीन असून लेखनकाळ 1818 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 138 वर्षांनी लिहिलेली बखर. सदर बखरीतील नोंद पाहता, 700 पठाण हे सर्व देश फिरून बेरोजगार असल्याने कामासाठी ते शिवाजी महाराजांच्या आश्रयास आले. त्यांना स्वराज्याशी काही घेणेदेणे नव्हते.
 
अफजलखान वधाच्यावेळी रुस्तमेजमान हा शिवरायांचा ‘बॉडीगार्ड’ असल्याचा अफलातून शोध ध्रुव राठीने लावला आहे. अशाच प्रकारे मौलाना हैदर अली नावाचे नवीन पात्रच जन्माला घातले आहे. या नावाची कोणी व्यक्ती खरंच अस्तित्वात होती का? याचीही माहिती ध्रुव राठीने घेतलेली नाही. अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर याचा उल्लेख ’कृष्णमूर्ती भास्कर कुळकर्णी’ असा केला आहे, ज्याला शिवचरित्रातील व्यक्तींची नावेही नीट माहिती नाहीत, अशा ध्रुव राठीला ‘काँग्रेस अ‍ॅण्ड पार्टी’ डोक्यावर घेऊन नाचत आहे. राठी आपल्या व्हिडिओत असेही म्हणतो की, भारतात गोदी मीडिया समाजात मुस्लीम समाजाविषयी द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे. ध्रुव राठी भारतात राहत नसल्याने त्याला हे माहिती नसावे किंवा त्याला ‘स्क्रीप्ट’ लिहून देणार्‍यांनी त्याला सांगितले नसावे की, औरंगाबाद शहराला औरंगजेबाचे नाव कायम ठेवावे, यासाठी 2 लाख 73 हजार लोकांनी अर्ज लिहिले होते. मग समाजात यांच्याविषयी द्वेष निर्माण होणार नाही का? हे लोक काय पाकिस्तानातून आले होते का? याकूब मेमनच्या जनाजात हजारो लोक सहभागी का झाले? तो काय क्रांतिकारक होता का? अर्ज करणार्‍यांविरोधात आणि दहशतवाद्याच्या जनाजात जाणार्‍याविरोधात मुस्लीम समाज रस्त्यावर का उतरला नाही? मग अशा वागण्याने तुमच्याविषयी प्रेम निर्माण की द्वेष? त्याला ध्रुव राठीच्या कल्पनेतील गोदी मीडिया कारणीभूत आहे की विशिष्ट समाजाचे वर्तन? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

ध्रुव राठी थोर इतिहासकार म्हणून इरफान हबीब यांचाही व्हिडिओत उल्लेख करतो. हबीब यांनाही औरंगजेबाने मंदिरे तोडल्याचे मान्य असल्याचे ध्रुव म्हणतो. खरेतर, औरंगजेबाच्या दरबारातील हजारो पुरावे हे सांगतात की, त्याने मंदिरे पाडली होती, मग यासाठी इरफान हबीबच्या साक्षीची काय गरज आहे? जिझिया कराबाबत छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिल्याच ध्रुव राठी म्हणतो. वास्तविक, हे पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलेच नसल्याचे ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी साधार सिद्ध केले आहे, एवढेच नाही त्याचे लाडके इरफान हबीब यांचेही असेच मत आहे. अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यातील युद्धाची गोष्टदेखील ध्रुवने सांगितली आहे. महाराणा प्रताप यांचा सेनापती हकीम खान होता आणि अकबराचा सेनापती मानसिंह होता, याकडे लक्ष वेधत ध्रुवने हा धार्मिक संघर्ष नसल्याचे भासवले आहे.ध्रुव राठी जसा भारतविरोधी गँगच्या पदरी आहे, तसे त्याकाळीही अनेक हिंदू-मुस्लीम बादशहांच्या पदरी होते. जालियनवाला बागमध्ये गोळीबाराचा आदेश देणारे इंग्रज असले तरी गोळ्या चालवणारे भारतीयचं होते ना? मग त्याकडे कसे पाहणार? मुघलांच्या पदरी हिंदू असले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा मुघली दृष्टिकोन काय होता? हे पाहण्यासारखे आहे. याबाबत इतिहास अभ्यासक सत्येन वेलणकर यांनी समकालीन उदाहरण देऊन हे स्पष्ट केले होते.
 
हलदीघाटीच्या लढाईत महाराणा प्रतापांच्या सैन्यातही राजपूत होते आणि त्यांच्याशी लढणार्‍या मुघल सैन्यातदेखील राजपूत होते. त्यावेळी रणांगणावर लढणार्‍या बदायुनीला आपल्या पक्षातले राजपूत आणि राणा प्रतापाच्या सैन्यातले राजपूत ओळखायचे कसे, हा प्रश्न पडला होता. त्याने आसफखानाला विचारले, “यावेळी मित्र आणि परके राजपूत वेगळे कसे ओळखायचे?” यावर आसफखान म्हणाला, “जो असेल तो असेल, त्याला बाण सूं सूं करत गाठेल. कोणत्याही बाजूचा राजपूत मेला तरी फायदा इस्लामचाच आहे.” बदायूनी शेवटी सांगतो की, “मला धर्मयुद्धाचे पुण्य मिळाले!” (संदर्भ - मुन्तखब-उत- तवारीख, फार्सी, खंड 2, पृ.231) यावरून हा धर्माचा संघर्ष होता की राजकीय होता, हे स्पष्ट आहे. बाकी ‘गंगा-जमुनी तहजीब’ची अनेक उदाहरणे ध्रुव राठी सांगतो, हा त्याचा बाळबोधपणा आहे. अल्लाशिवाय कोणीही उपास्य नाही, हे पाच वेळा जाहीर सांगितले जाते, तेव्हा या ‘तहजीब’ला काहीही अर्थ उरत नाही. बाकी ध्रुव राठीला लिहून दिलेली ‘स्क्रीप्ट’ उत्तमपणे सादर करण्याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला आहे, मात्र त्यात सत्याचा लवलेशही नाही.

ध्रुव राठी म्हणतो तसे छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम होते का?
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी किती मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती? त्यांच्या पदरी 1657 सालापर्यंत चार-पाच मुसलमान होते. 1658 सालापासून शिवरायांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनी आदिलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याची पहिली घटना 1658ची आहे. त्यापूर्वी ते त्यांच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून जहागिरीचा कारभार पाहत होते. त्यावेळी जे अधिकारी होते, त्यात सिद्दी अंबर बगदादी हा पुण्याचा हवालदार होता. जैनाखान पिरजादे हा सरहवालदार होता. बेहेलिमखान हा बारामतीचा हवालदार होता. 1658 साली शिवरायांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर शिवरायांचा एकही मुलकी आधिकारी मुसलमान नाही. एक नूरखान बेग होता, हा पायदळाचा सेनापती होता. तो दि. 10 मार्च 1657च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर येसाजी कंक हे पायदळाचे सेनापती आहेत, नूरखान बेग नव्हे! एक होता सिद्दी हिलाल, जो महाराजांकडे येऊन राहिला होता. पूर्वी तो आदिलशाहीत होता. तो होता खेळोजी राजांचा क्रीतपुत्र. म्हणजे विकत घेतलेला गुलाम. मग त्याला हिंदू का केले नाही? तर अडचण अशी होती की, त्याकाळी जन्माने हिंदू नाही, त्याला हिंदू करता येत नसे.

शिवरायांच्या नौदलाचे दोन अधिकारी होते. दौलतखान आणि दर्यासारंग. त्या दर्यासारंगला महाराजांनीच 1679 साली अटक केली. आता दौलतखान का होता? त्यावेळेला आपल्याकडे अनुभवी लोक नव्हते, म्हणून हा दौलतखान होता. आपला भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला, त्यानंतर दहा वर्षं भारतीय नौदल आणि हवाई दल यांचे प्रमुख ब्रिटिश होते. कारण, आपल्याकडे त्या क्षेत्रातील अनुभवी लोक नव्हते. मात्र, दौलतखानानंतर आंग्रे आणि धुळप यांनी मराठी आरमाराचे नेतृत्व केले. अफजलखानाचा वध केला, त्यावेळी शिवरायांचे अंगरक्षक होते, त्यापैकी सिद्दी इब्राहीम हा एक होता. त्याचीही स्थिती सिद्दी हिलालसारखी होती. याव्यतिरिक्त बाकी परत शिवरायांच्या सैन्यात कोणीही मुसलमान नव्हता.राहिला मदारी मेहतरचा, तर हे नाव खोटे आहे. त्याला कागदपत्राचा आधार नाही. शिवरायांकडे एक फारसी कारकून होता त्याचे नाव काझी हैदर. तो नंतर 1682 साली औरंगजेबाला जाऊन मिळाला. शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना जे पत्र लिहिले आहे. त्यात ‘मी तुर्कांना मारतो आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत, तर तुझा विजय कसा होईल?’ असे स्पष्ट लिहिले आहे. आजही तंजावरी मराठीत मुसलमाना ‘तुरुक’ म्हणतात. याविषयी ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी सविस्तर आणि साधार मांडणी केली आहे.

हजरत शुनीदे फर्मुदन्द के दर मजहब मुसलमाने बुतखाने रा दीदन हम खूब नीस्त औरंगजेबाने (हजरत) ऐकून घेऊन फर्मावले की, मुसलमान धर्मात देवळाकडे पाहाणे देखील चांगले नसते. मग असा हा औरंगजेब हिंदू मंदिरांना देणग्या देत होता, असा साक्षात्कार ध्रुव राठीला कसा झाला असावा?


रवींद्र सासमकर
(लेखक इतिहास अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी
महाराज चरित्र साधने समितीचे विशेष निमंत्रित सदस्य आहेत.)