ताज महाल की राझ महाल?

    11-May-2024
Total Views |
Taj Mahal or Raj Mahal


1950च्या दशकात मराठी माणसाला ताज महालाबद्दलचे एक भावगीत खूप आवडत असे- ‘बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल, यमुनाकाठी ताज महाल.’ कवी अनिल भारती यांच्या शब्दांना प्रसिद्ध भावगीत गायक गजाननराव वाटवे यांनी स्वत:च चाल लावली होती आणि त्यांच्या कार्यक्रमात ते मंचावरुन हे गाणे सादरही करीत असत.
शाळा-कॉलेजात इतिहासात हा विषय अगदी साखरेच्या पाकात घोळवून मांडलेला असायचाच. शहाजहान बादशहाने आपल्या अत्यंत आवडत्या बेगमचे स्मारक म्हणून एक अप्रतिम सुंदर इमारत बांधली. तिलाच ‘ताज महाल’ म्हटले जाते. पांढर्‍या शुभ्र आरस्पानी संगमवरी दगडांत बांधलेली ही इमारत पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात फारच सुंदर दिसते, इत्यादी आम्हा भारतीय विद्यार्थ्यांच्या गेल्या किमान पाच पिढ्या बादशहा आणि बेगम यांच्या अमर प्रीतीची ही भंपक कहाणी वाचत-ऐकत वाढल्या. ही कहाणी भंपक आहे आणि जो मनुष्य आपल्या बायकोवर इतके आटोकाट प्रेम करतो, तो तिच्यावर 19 वर्षांत 14 बाळंतपणे लादेल का, हा प्रश्न ठणकावून विचारणारा माणूस महाराष्ट्रातूनच निघाला त्यांचे नाव पु. ना. ओक!

शहाजहानच्या अधिकृत चरित्राच्या म्हणजे ‘बादशहानामा’ या फारसी भाषेतील पुस्तकाच्या भाषांरातून काही महत्त्वाच्या ओळी साफ गाळून टाकण्यात आलेल्या आहेत, हे दाखवून देणारा दुसरा माणूसही महाराष्ट्रातूनच निघाला, त्यांचे नाव वासुदेव गोडबोले. शहाजहान दख्खनच्या मोहिमेवर निघालेला असताना वाटेत बुर्‍हाणपूर मुक्कामी, अर्जुमंद बानू बेगम ही त्यांची बायको, चौदाव्या बाळंतपणात अति रक्तस्रावाने मरण पावली. प्रथम तिला बुर्‍हाणपूरमध्येच दफन करण्यात आले.सहा महिन्यांनंतर तिचा देह तिथून हलवून आग्रा येथे आणण्यात आला. तिथे यमुनेच्या काठी जयपूर नरेश राजा जयसिंग याच्या मालकीची एक इमारत खरेदी करून तिच्यात तो देह पुन्हा दफन करण्यात आला. हा ‘बादशाहनाम्या’तला भाग भाषांतरात नेमका वगळून टाकलेला आहे.

सर हेन्री मायर्स इलियट हा अतिशय विद्वान मनुष्य गव्हर्नर जनरल हार्डिंज आणि लॉर्ड डलहौसी यांच्या सचिव होता. भारतावरील अरबांची पहिली स्वारी ते मुघल सल्तनतीचा अंत या कालखंडातील भारतातील मुसलमानी राजवटींचा इतिहास लिहायला त्याने सुरुवात केली. त्याच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिलेले ते काम प्रोफ्रेसर जॉन डॉसन याने पूर्ण केले. आम्ही आज जो भारताचा इतिहास म्हणून शिकतो, तो मुख्यत: या इलियट आणि डॉसनच्या आठ खंडी कामावर आधारित आहे. त्यात चुकाही आहेत नि अनेक गोष्टी गाळलेल्या पण आहेत.म्हणजेच ताज महालसह अनेक ऐतिहासिक इमारतींची निर्मिती, हा एक रहस्यमय मामला आहे. म्हणूनच नील नेथन या अमेरिकेत वॉशिंग्टन मुक्कामी राहणार्‍या लेखकाच्या पुरस्कृत रहस्यकथेचे नाव आहे- ‘राझ महाल.’ इथे राझ म्हणजे रहस्य.

माहिती अधिकाराच्या कायद्याखाली भारतीय पुरातत्त्व खात्याकडे एक निनावी याचिका दाखल करण्यात येते. ताज महाल हा शहाजहानने बांधला, यासंदर्भात पुरातत्त्व खात्याकडे काय पुरावे आहेत, अशी विचारणा या याचिकेत करण्यात आलेली असते. ताज महाल ही मुळात एखादी धार्मिक वास्तू होती किंवा काय, याबाबत याचिकाकर्त्याला काहीही स्वारस्य नसून, त्या वास्तूच्या प्राचीनत्वाबद्दल जाणून घेणे, हे त्याचे उद्दिष्ट असल्याचे याचिकेत स्पष्टपणे नमूद करण्यात असते. पुरातत्त्व खात्याचे प्रमुख डॉ. नायक आणि आग्रा विभागाचे प्रमुख राकेश चोप्रा हे दोघे जण या याचिकेला उत्तर देण्याची जबाबदारी नवा विभागप्रमुख विजयकुमार याच्यावर सोपवतात.

विजयकुमार या प्रकरणाचा अभ्यास करू लागतो आणि प्रकरण दिल्ली नि लंडनपर्यंत पोहोचते. ताज महाल या वास्तूच्या प्राचीनत्वाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ डॉ. रॉय हे त्या संदर्भात काही एका ठाम निष्कर्षावर पोहोचले होते. पण, एका रात्री त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. त्यांच्या कागदपत्रांमध्ये संबंधित फाईल नव्हती. पण, मृत्यू घडवण्यापूर्वी डॉ. रॉय बरेच तास पंतप्रधान कार्यालयात खुद्द पंतप्रधानांसोबत एकटेच बोलत होते. एवढेच नव्हे तर नंतर ते गुलाबाचे फुल कोटावर लावणारे पंतप्रधान डॉ. रॉयना आपल्या गाडीतून राष्ट्रीय ग्रंथालयात घेऊन गेले होते. तिथे दोघांनी ‘बादशहानामा’ हा ग्रंथ मागवला होता. पण, आता ग्रंथालयातल्या त्या पुस्तकातही विशिष्ट दोन पाने पुस्तकातून गायब झालेली आहेत, असा सगळा रहस्यमय मामला विजयकुमारला गवसतो. मग, तो ताजला प्रत्यक्ष भेट देतो. तिथे एक मौलवी त्याला ताजच्या तळघरात जाण्यापासून रोखू पाहतो. विजय त्याला चकवून तळघरात उतरतोच, त्याला आढळते की ताजपासून काही अंतरावरच्या लाल किल्ल्यापर्यंत गुप्त भुयारी मार्ग आहे.

त्याचबरोबर विजयच्या हेही लक्षात येते की, खुद्द आपल्या पुरातत्त्व खात्यातही काही अशी मंडळी आहेत की, ज्यांना ताजचे राझ हे राझच राहायला हवे आहे. त्याला हे देखील समजते की, ताजच्या दरवाजाचा एक तुकडा डॉ. रॉय यांनी आपला लंडनस्थित मित्र जी. एस. विश्वनाथ याच्याकडे काळनिश्चितीची परीक्षा कार्बन-4 टेस्ट करण्यासाठी पाठवला होता. विजय लंडन गाठतो. विश्वनाथ यांचा रहस्यमय मृत्यू होतो. रहस्य आणखीच गडद होते.ताजच्या तळघरात शिरून पाहणी करणार्‍या विजयच्या लक्षात येते की, ताजचा विजय फक्त पुरातत्त्वीय नाही. इथे अमानवी, अतींद्रीय शक्तींचेही वास्तव्य आहे. त्या शक्ती त्या ताजचे तळघर ते लाल किल्ला ते यमुनेच्या तीराकडे जाणारे चोर दरवाजेही दाखवतात. रहस्य आता राजकीय कारस्थानाच्या पातळीवरून गूढ अमानुष पातळीवर पोहोचते.

आणि त्याच टप्प्यावर एक विलक्षण घटना घडते. विषय स्वत:च अदृश्य होतो. व्यावहारिक पातळीवर एवढेच घडते की, ताज महाल या वास्तूचे नव्याने आणि सर्वंकष शास्त्रीय सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय पुरातत्त्व खात्याला देते. यामुळे याचिकाकर्त्याचा मूळ उद्देश सफल होतो.भारताचा इतिहास, इंग्रज आणि मार्क्सवाद्यांनी केलेली भारतीय इतिहासाची मोडतोड आणि स्वतंत्र भारताच्या नव्या शासनकर्त्यांनी अल्पसंख्याकांना खूश ठेवण्यासाठी केलेले नसते उद्योग, या सगळ्याची छानशी वीण गुंफून लेखक नील मेथन यांनी मूळ इंग्रजीत एक चांगलीच रहस्यकथा उभी केली आहे. भारताच्या खर्‍या इतिहासाकडे वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी असे ललित प्रयत्नही व्हायलाच हवेत. गौरी देशपांडे यांनी वाचनीय अनुवाद केला आहे. एक वाचनीय रहस्य कादंबरी गायब झालेल्या विषयाचे पुढे काय होते, हे लेखकाने बहुधा पुढच्या भागासाठी राखून ठेवले असावे. त्या पुढच्या भागाची वाचकाला नक्कीच उत्कंठा आहे.

मुखपृष्ठ, मांडणी, मुद्रण इत्यादी मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक.
कादंबरीचे नाव : राझ महाल
मूळ लेखक : नील नेथन
मराठी अनुवाद : गौरी देशपांडे
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या : 198
मूल्य : 450 रु.

मल्हार कृष्ण गोखले