रालोआ होणार ४०० पार, तर काँग्रेसला शहजाद्याच्या वयापेक्षाही कमी जागा मिळणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    11-May-2024
Total Views |
BJP MODI
 
नवी दिल्ली : भाजपप्रणित रालोआ ४ जून रोजी ४०० पार होणार तर काँग्रेसला त्यांच्या शहजाद्याच्या वयापेक्षाही कमी जागा मिळतील, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लगावला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा आणि झारखंड येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, देशातील अनेक भागात तीन टप्प्यात मतदान झाले. त्यामुळे आज आपण मोठ्या जबाबदारीने, मोठ्या आत्मविश्वासाने आणि जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर भाजप-रालोआ 4 जून रोजी ४०० जागांचा टप्पा पार करेल, असे आपल्याला अतिशय स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षही बनू शकणार नाही. काँग्रेसला त्यांच्या शहजाद्याच्या वयापेक्षाही कमी जागा मिळणार आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
काँग्रेसने देशातील वनवासी समुदायाचा अपमान केल्याचा घणाघात पंतप्रधानांनी केला. ते पुढे म्हणाले, देशाच्या राष्ट्रपती आणि वनवासी समुदायाच्या कन्या द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच अयोध्येत श्रीरामललाचे दर्शन घेतले. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने श्रीराम मंदिर गंगाजलाने धुवून शुद्ध करणार असल्याची घोषणा केली. हा देशाचा, आदिवासी समुदायाचा आणि माता भगिनींचा अपमान आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
 
'पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे' या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे. काँग्रेस वारंवार आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते. भारताने सावध राहण्याची गरज आहे, कारण पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असे काँग्रेसचे नेते म्हणतात. मात्र, आज पाकिस्तानची अवस्था अशी आहे की आता तो बॉम्ब विकण्याच्या टप्प्यावर आला आहे, पण त्यालाही खरेदीदार मिळत नसल्याची स्थिती असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.