करीना कपूरच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ पुस्तकावरुन गुन्हा दाखल करण्याची मागणी

    11-May-2024
Total Views |

kareena  
 
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खानच्या (Kareena Kapoor) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या काळात एक पुस्तक लिहिले होते. ज्याच्या नावावरुन वाद झाला होता. आता हा वाद थेट मध्य प्रदेश हायकोर्टापर्यंत पोहोचला असून क्रिस्टोफर अँथनी या वकिलाने अभिनेत्रीविरोधात याचिका दाखल केली आहे. शिवाय तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत करिनाला नोटीस बजावत उत्तर देखील मागितले आहे.
 
दरम्यान, या प्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गुरपाल सिंग अहलुवालिया यांनी ९ मे २०२४ रोजी करीनाला नोटीस बजावली आहे. वकिल अँथनी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत थेट मध्यप्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाने करिना विरोधात गुन्हा दाखल करणारी याचिका फेटाळली होती.
 
काय आहे प्रकरण?
 
तर झालं असं की, करीनाने तिच्या पुस्तकाचे टायटल 'करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल' (Kareena Kapoor Khan Pregnency Bible) असे लिहिले आहे. या टायटलमध्ये, 'बायबल' हा शब्द वापरल्यामुळे प्रामुख्याने एका समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे करीनाविरोधात एफआयआर दाखल करावी आणि करिना व्यतिरिक्त, Amazon Online Shopping आणि Juggernaut Books या बुक पब्लिशरवरही एफआयआर दाखल करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.