काही लोकं बडबड करत सुटले तर...; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

    11-May-2024
Total Views |

Thackeray & Fadanvis
 
पुणे : काही लोकं बडबड करत सुटले तर ते सिरियस झाले आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे असं समजावं, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवरही निशाणा साधला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र म्हणाले की, "एखादा व्यक्ती एखादी गोष्ट सिरीयस बोलला तर ती मनावर घ्यायची असते. पण काही लोकं बडबड करत सुटले तर ते सिरियस झाले आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे असं समजलं पाहिजे. त्यामुळे उद्धवजींची मानसिक स्थिती अशी आहे की, त्यांना आता मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या पक्षातील लोकांनी कुठल्यातरी चांगल्या मानसोपचारांशी त्यांची भेट करुन द्यावी आणि त्यांच्या मनावरचं दडपण दूर करावं," असा सल्ला त्यांनी दिला.
 
हे वाचलंत का? -  "पक्ष कमजोर झाला की, पवार काँग्रेसमध्ये जातात!"
 
ते पुढे म्हणाले की, "विरोधी पक्ष संपवण्याची रणनिती कोणीही अवलंबत नाही. राजकारणात कुणीही कुणाला संपवू शकत नाही. काँग्रेस आपल्या कर्माने खाली गेली आहे. आपल्या नेत्यामध्ये क्षमता नाही हे माहित असतानाही काँग्रेसने त्याच नेत्याला १७ वेळा पुढे केलं. प्रत्येकवेळी त्यांना अपयश आलं. देशात योग्य विरोधी पक्षनेता असायला हवा, असं आमचं मत आहे. राजकारणात कमी जास्त होत असतं. पण आज विरोधी पक्ष परिपक्वता दाखवायलाच तयार नाही. समाजाकरिता भूमिका घ्यावी लागते पण त्यांची मोदींना शिव्या देणं ही एकच भूमिका आहे. पाकिस्तानची भाषा जर आमचे विरोधी पक्षनेते बोलत असतील तर त्यांनी अजूनही आपली भूमिका स्विकारली नाही, असा त्याचा अर्थ होतो," असे ते म्हणाले.
 
"नरेटिव्हने निवडणूका जिंकता येत नाही तर केवळ एक वातावरण तयार करता येतं. मी माझ्या भाषणात ९० टक्के काय केलं आहे आणि काय करायचं आहे यावर बोलतो तर १० टक्के राजकारणावर बोलतो. पण आमच्या विरोधकांच्या भाषणामध्ये एक टक्काही विकासावर बोललं जात नाही. शेवटी निवडणूक गद्दार आणि खुद्दार यावर नाही तर ती तुमचं लोकांकरिता काय व्हिजन आहे यावर आहे. ज्यावेळी ते आमच्याशी विकासाची स्पर्धा करायला जातात त्यावेळी ते एकही प्रकल्प दाखवू शकत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक विकासावर आणि मोदीजींवर गेली तर आपल्याला अडचण होईल, हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते अशाप्रकारचे कथानक तयार करतात. पण आमच्या सरकारने काय केलं याची लोकांना कल्पना आहे," असेही ते म्हणाले.