"एनडीमध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या वारंवार बैठका!"

    11-May-2024
Total Views |
 
Sharad Pawar
 
पुणे : यापूर्वी एनडीमध्ये येण्यासाठी शरद पवारांनी वारंवार बैठका घेतल्या, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत यावं, असं वक्तव्य केलं होतं. याविषयी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना बावनकुळेंनी शरद पवारांवर निशाणा साधला.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "शरद पवार साहेबांनी यापूर्वी वारंवार एनडीएमध्ये येण्याचे आश्वासन दिले. अजित पवारांनी ही सत्यता मांडली आहे. निवडणूकींनंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भूमिका शरद पवार घेत आहेत. पृथ्वीराज चव्हाणदेखील म्हणाले की, महाराष्ट्रातील दोन पक्ष कमी होतील. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेसमध्ये जातील. पण याआधी शरद पवारांनी वारंवार एनडीएमध्ये येण्यासाठी बैठका घेतल्याने मोदीजी पवारांना उपरोधिक बोलले आहेत आणि यात सत्यता आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उदयनराजे मैदानात!
 
मविआच्या ३० ते ३५ जागा निवडून येतील असा दावा शरद पवारांनी केला होता. यावर बावनकुळे म्हणाले की, "बारामतीमध्ये सुनेत्रा पवार निवडून येणार आहेत. त्यामुळे बारामतीच शरद पवारांकडे राहिली नसल्याने महाराष्ट्र कसा राहील हा प्रश्न आहे. ज्यावेळी निवडणूकीत हार दिसते त्यावेळी अशा प्रकारची वक्तव्ये करावी लागतात. त्यामुळे शरद पवारांची तुतारी वाजणार नाही, असं मला वाटतं," असेही ते म्हणाले
 
तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे बावचळले आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर अत्यंत वाईट परिस्थिती आली आहे. या निवडणूकीनंतर त्या दोघांनाही अज्ञातवासात जावं लागेल," असे ते म्हणाले. महाराष्ट्राचे जनमत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे आहे आणि पुण्यात १०० टक्के मुरलीधर मोहोळ हेच निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.