बीएमसी नव्याने मालमत्ता कराची देयके तयार करणार

कर निर्धारण व संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांचे निर्देश

    11-May-2024
Total Views |

bmc


मुंबई, दि.११ : प्रतिनिधी 
मुंबईत प्रत्येक वर्षी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवले जात असले तरी प्रत्यक्षात त्याची वसुली होती नाही तसेच मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांकडूनही वसुली होत नाही. या पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्तांनी कर निर्धारण व संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत मुंबईतील प्रत्येक मालमत्तांची तपासणी करून त्या जागेचा प्रत्यक्षातील वापर आणि त्यांचे क्षेत्रफळ यांची माहिती घेऊन नव्याने मालमत्ता कराची देयके तयार केली जावीत, असे सांगितले. तसेच मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांकडून तात्काळ वसुली करतानाच ज्यांना नोटीस पाठवल्या आहेत, आणि त्यांच्या मालमत्तेची जप्ती अथवा अटकावणी केली आहे, त्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जावा अशाप्रकारचेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले गेले आहेत.

मुंबईतील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे विविध नागरी सेवा-सुविधांच्या अनुषंगाने ‘मालमत्ता कर’ हा आकारला जातो. हा ‘मालमत्ता कर’ नागरिकांनी वेळेत महानगरपालिकेकडे जमा करावा, यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व संकलन खात्यामार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दि. २५ मे आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी कर भरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही करावी. वर्षोनुवर्ष कर थकीत ठेवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना या पूर्वी जप्‍ती व अटकावणीची नोटीस दिलेल्‍या मालमत्‍तेवर महानगरपालिका तरतुदी अन्‍वये कलम २०५ नुसार जप्‍ती व अटकावणी करावी. मालमत्‍ताकराची वसूली न झाल्‍यास जप्‍त केलेल्‍या वस्तुंचा जाहीर लिलाव करण्‍याच्‍या प्रक्रियेस वेग द्यावा, त्‍यानंतर सदर मालमत्‍तेची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्‍याची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. दरम्‍यान, करवाढीचा नवीन स्रोत शोधण्‍याकरीता २४ विभागातील मालमत्तांचे स्‍थळनिरीक्षण करून त्‍यातील बदलानुसार करनिर्धारणात सुधारणा करावी, असे निर्देश देखील आयुक्तांनी दिले आहेत.