पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करणार तिसरा कार्यकाळ – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नरेंद्र मोदी नव्हे तर अमित शाह होणार पंतप्रधान – अरविंद केजरीवाल

    11-May-2024
Total Views |
Amit Shah On Narendra Modi
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करणार असून त्यांच्या वयाची काळजी केजरीवाल आणि इंडी आघाडीने करू नये, असा टोला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी हैदराबाद येथे लगावला आहे. दिल्ली मद्य घोटाळ्यातील आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजुर केला. त्यानंतर शनिवारी केजरीवाल यांनी पत्रकारपरिषदेत मोदी सरकारवर आरोप केले. त्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या हैदराबाद दौऱ्यातील पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कंपनी व त्यांच्या इंडी आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार, यामुळे आनंदी होण्याची गरज नाही. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानपदी राहू नये, असे भाजपच्या घटनेमध्ये कोठेही नमूद केलेले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच २०१९ पर्यंत देशाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे केजरीवाल आणि इंडी आघाडीने कितीही अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील भाजप – रालोआ ४०० जागांचा टप्पा पार करणार असल्याचे त्यांना माहिती आहे. त्यामुळे इंडी आघाडीसाठी ही अजिबात आनंदाची बाब नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापुरताच जामीन मिळाल्याचे केजरीवाल यांनी विसरू नये, असा टोला केंद्रीय गृहमंत्र्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, केजरीवाल यांना २ जून रोजी पुन्हा यंत्रणांपुढे शरणागती पत्करायची आहे. केजरीवाल यांनी प्रथम सर्वोच्च न्यायालयात आपली अटक अयोग्य असल्याची याचिका दाखल केली होती, न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर जामीन याचिकादेखील फेटाळली होती. अखेरिस निवडणूक प्रचारासाठी जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल जर यास क्लीन चिट मानत असतील तर त्यांना कायद्याची माहिती नसल्याचे स्पष्ट होत असल्याचेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांचे शक्तीप्रदर्शन

निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी शनिवारी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी पत्रकारपरिषदेत केंद्र सरकार टिका केली. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी हे पुढील वर्षी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्त होतील आणि अमित शाह त्यांच्याजागी पंतप्रधान होतील, असाही दावा त्यांनी केला. केंद्र सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत असल्याचेही ते म्हणाले.