कॅनव्हासला ‘जिंदगी’ देणारा कलाकार : प्रा. मल्लिकार्जुन सिंदगी

    10-May-2024
Total Views |
 Mallikarjun Sindagi


ज्येष्ठ कलाध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, दृश्यकला लेखक मल्लिकार्जुन सिंदगी यांचे ‘होरायझन’ हे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन, काळा घोडा, मुंबई येथे दि. १४ मे ते दि. २० मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलारसिकांसाठी विनामूल्य खुले आहे. त्यानिमित्ताने कॅनव्हासला ‘जिंदगी’ देणार्‍या प्रा. मल्लिकार्जुन सिंदगी या कलाकाराच्या कलाशैलीविषयी...

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे।‘ ही उक्ती तंतोतंत लागू होते, ती ज्येष्ठ कलाध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मल्लिकार्जुन सिंदगी यांना! ’निसर्ग हाच माझा गुरु’ असं मानणारा चित्रकार सिंदगी म्हणजे उत्साहाचा मूर्तिमंत कलोपासकच! कुठलाही कलाकार कधीही निवृत्त होत नसतो. उलट, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार्‍या ‘कलाध्यापकांना’ मार्गदर्शक ठरावे, असे हे व्यक्तिमत्त्व... मागच्या सप्ताहात चित्रकार सिंदगी सरांच्या बंगल्यावर जिथे त्यांचा स्टुडिओ आहे, तिथे जाण्याचा योग आला. कारणही म्हणा तसंच होतं. येत्या १४ मे रोजी मुंबईतील जहांगीर कलादालनात त्यांच्या कलाकृतीचे एकल प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचे औचित्य साधून खरं तर त्यांच्या स्टुडिओला भेट दिली.दि. १ जून १९५४ रोजी सोलापूरजवळील आहेरवाडी येथे जन्मलेले चित्रकार सिंदगी सर फक्त ७० वर्षांचे आहेत. ‘अजून जीवनात खूप काही करायचे आहे,’ असा ध्यास घेतलेल्या सिंदगी सरांचा उत्साह पाहता, त्यांचे वय ‘फक्त ७०’ म्हणावे वाटते. नोकरीच्या काळात कलाध्यापनाव्यतिरिक्त संघटनेच्या कामात व्यस्त राहणार्‍या मल्लिकार्जुन सिंदगी यांना सेवानिवृत्तीनंतर, स्वत:साठी काम करताना पाहून, त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांना आनंद झाला.

झपाटलेपणाचं दुसरं नाव ‘मल्लिकार्जुन’ आणि ‘ध्यासा’चं दुसरं नाव ‘सिंदगी’ असं ज्याचं वर्णन करता येेेईल, अशा या कलोपासकाने ‘लॉकडाऊन’पासूनच्या काळात ‘स्केचिंग’ सुरु केले, ते आज दिनांकापर्यंत अव्याहृतपणे सुरु आहे. तब्बल ६५ हजार स्केचेस त्यांनी चितारले आहेत. या स्केचेसमधून त्यांच्या नजरेला जे भावतील, अशा निवडक स्केचेसमधून त्यांनी पेंटिंग्ज निर्माण केले आहेत. सुमारे ३६५ ते ४०० पेंटिंग्ज त्यांनी बनवलेले आहेत. या पेंटिंग्जमधील निवडक पेंटिंग्जचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात दि. १४ मे पासून सुरू होणार्‍या सप्ताहात आहे.निसर्गाला गुरु मानणार्‍या सिंदगी सरांनी, निसर्गाच्या निरीक्षणांतून मिळणार्‍या, सौंदर्यपूर्ण दृश्यांना, त्यांच्या कलाकृतींचे विषय बनवले. निरीक्षणातून कल्पनाशक्ती जन्माला येते. कल्पनाशक्ती ही त्या कलाकाराच्या सृजनशक्तीचं अदृश्य रूप असतं. सृजनाला व्यक्त करण्यासाठी कलाकार ‘गती’ घेतो. गतीमुळे काम वाढत गेले.

कामाचं स्वरुप हे शीघ्र रेखाटने अथवा ‘रॅपिड स्केचेस’ असतं. ही स्केचेस पेंटिंग्ज स्वरुपात जेव्हा येतात, तेव्हा तिथे एक अथांग असे क्षितिज असते. त्या क्षितिजावर निसर्गातील आकारांना सिंदगींच्या प्रतिभेनं बद्ध केलेलं असतं. ही सारी पेंटिंग्ज म्हणजे एक ‘स्वयंभू’ प्रकटीकरणाचं मूर्तिमंत दृश्य सत्य असतं. ते अद्भुत रंग योजनांचा परिपाक असतं आणि म्हणूनच सच्च्या कलारसिकाच्या मनाचा ठाव ते घेत असतं. अत्यंत खडतर लहानपणातून ठामपणे उभे राहिलेल्या चित्रकार सिंदगी सरांच्या घराण्यात, दृश्यकलेचे कुणीही जाणकार नव्हते. सर्वजण समकालीन व्यवसायात गुंतलेले होते. व्यवसायातील सत्य-असत्य शब्दफेकींचा लपंडाव, लहान मल्लिकार्जुनना झेपेना. त्यांनी पुणे गाठले आणि तेथूनच त्यांचा कलाप्रवासाच्या दिशा निश्चित झाल्या. ‘धावे त्याला मार्ग सापडे!’
 
१९७०च्या दशकात पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात कलाशिक्षणाचे धडे सुरू झाले. शैक्षणिक वर्षाच्या नियोजनानुसार तेही उत्तमपणे पूर्ण करून कलाध्यापनास सुरुवात केली. ‘जे शिकलो ते स्वत:च्या अनुभवांची जोड देऊन शिकवायचे’ या तत्त्वामुळे ते विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक झाले. विद्यार्थ्यांना कलाध्यापन करतानाच आठ ते दहा पुस्तके प्रकाशित करून एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. भाषा-अध्यापन शास्त्राचे पुस्तक तर फारच ठसा उमटविणारे ठरले. अनेक खासगी वाहिन्या तसेच आकाशवाणीसह अनेक कार्यक्रमांतून त्यांची कलाविषयक व्याख्याने सुरू असतात.‘मला कुणी कमी म्हणता कामा नये’ हा त्यांचा नियमित ध्यास त्यांच्या यशाचं गमक आहे. त्यातूनच त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, प्रेम, जिव्हाळा आणि पाठपुराव्यातील सातत्य या गुणाचं अभिव्यक्तीकरण त्यांच्या कलासृजनातून दिसून येते. त्यांच्या कलाकृतींमधील ‘स्ट्रोक्स’ हे कुठल्याही धारदार शस्त्रापेक्षा कमी नाहीत. त्यांच्या ‘स्ट्रोक्स’मधील लयदारपणा हा कुठल्याही नृत्यांगनेच्या पदन्यासाच्या लयीपेक्षा कमी नाही, तर त्यांच्या पेंटिंग्जमधील आशयगर्भता ही कुठल्याही ध्यानस्त योग्यापेक्षा भिन्न नाही. असं साधारण त्यांच्या प्रत्येक कलाकृतीचं वर्णन करता येईल.

एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, “प्रदर्शित होणार्‍या कलाकृतींची शैली साधताना आठ-नऊ वर्षे रोज नित्य रियाज केल्यानंतरचा आनंद मिळालेला आहे.” म्हणून त्यांच्या कलाकृती, कलारसिकाला आनंदित करतात. त्यांच्या अमूर्त शैलीतील कलाकृतीदेखील कलारसिकांशी सुसंवाद साधतात.कॅनव्हासवरील आकार, रंगछटा आदी घटकांची मांडणी, रचना आणि ले-आऊट या प्रत्येकाला महत्त्व असते, असे ते नेहमी सांगतात. त्यांच्यासमोर अगदी साधा कागदाचा तुकडा असला तरी चित्रकार सिंदगी त्याला ‘जिंदगी’चा भाग बनवतात. सिंदगी सरांचा स्वभाव बोलका असल्याने त्यांचे रंगही बोलतात, कॅनव्हासही बोलू लागतो. जीवनाकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहायला हवे, असे सांगत असतानाच ते म्हणाले की, “या प्रदर्शनाच्या रुपाने मी केलेला हा सारा रियाज पाहून, ज्यांना कलेतील थोडंफार कळतं, त्यांना या रियाजाचं महत्त्व कळेल, या हेतूनेच हे प्रदर्शन आयोजित केले आहे.”
 
या प्रदर्शनातील कलाकृती, विविध हॉटेल्समधील अन्नाची रुची वाढविण्यास मदत करणार्‍या ठरतील, तर विविध रुग्णालयांमधील रुग्णांना वेदनांपासून आराम देतील, अशाच आहेत. शिवाय, विविध कार्यालयांमधील तणावपूर्ण वातावरणाला हलकंफुलकं आणि तणावहरित करण्यास भाग पाडतील, तर संग्राहकांना एक ठेव किंवा डिपॉझिट म्हणून ‘संपत्ती’ ठरतील, अशी खात्री वाटते.सुमारे ३५-४० वर्षांची कलासाधना काहीसे शब्दांमध्ये शब्दबद्ध करणं केवळ अशक्य आहे. परंतु, सिंदगी सरांचे काम पाहून, कलाकृतीतील सौंदर्य पाहून पाहणार्‍याला निश्चित थक्क व्हायला होईल, यात संदेह नाही. त्यांच्या दीर्घायू-निरोगी-सुदृढतेला अधिक बळ मिळो, हीच शुभेच्छा!


- डॉ. गजानन शेपाळ