कुलाब्यात शनिवारी तापुरता पाणी पुरवठा बंद

मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली

    10-May-2024
Total Views |

metro 3


मुंबई, दि.९ : प्रतिनिधी 
ए विभागात चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला गळती लागली. या जलवाहिनीची शनिवार, दि.११ मे रोजी आठ तासांच्या कालावधीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. याकारणाने, नौदलास रात्री होणारा पुरवठा हा दुरुस्तीनंतर विलंबाने पुरवण्यात येईल. या भागातील नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या ए विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून १५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीद्वारे पुढे १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीचा उपयोग केला जातो. या जलवाहिनीवरुन होणारा पुरवठा हा कमी दाबाने तसेच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर शोध घेण्यात आला. त्यावेळी, मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो ३ चे काम सुरू असताना या १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीस गळती झाल्‍याचे निदर्शनास आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या तातडीच्या दुरूस्‍ती विभागाने घटनास्‍थळी पाहणी केली. या जलवाहिनीची ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागणार आहे, अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोका देखील निर्माण होवू शकतो. मंत्रालय व मरीन ड्राइव्ह हा परिसर आत्यंतिक महत्त्वाचे असल्याने महानगरपालिकेने मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून या दुरुस्ती कामाचे प्राधान्य कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन होण्याच्या दृष्टिने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे.
मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांनी शनिवार, दि. ११ मे रोजी या जलवाहिनीच्‍या दुरूस्‍तीस परवानगी दिली आहे. त्यानुसार, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जलअभियंता खाते अंतर्गत तातडीच्या दुरूस्‍ती विभागाने (ईआरसी) शनिवार, दिनांक ११ मे रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या ८ तासांच्या कालावधीत दुरूस्‍ती कामे हाती घेण्‍याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सकाळी ९ वाजेपासून खोदकाम सुरु केले जाईल. तर जलवाहिनीतील पाणी उपसा करुन नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी ३.३० वाजेपासून केले जाईल. तोवर संबंधित भागातील सकाळ व दुपार सत्रातील पाणीपुरवठा दिला जाईल.
दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या ८ तासांच्या प्रत्यक्ष दुरुस्ती कालावधीत कुलाबा, कोळीवाडा अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी ६.३० ते सायंकाळी ६.४५ आणि नौदल अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा वेळ ६.५० ते सायंकाळी ७.०५ या परिसरांना होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे. तर नौदलास रात्री १०.३० ते पहाटे २.५० या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा हा दुरूस्‍ती काम पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिन्या भारीत (चार्जिंग) करुन त्यानंतर म्हणजेच नियमित पाणीपुरवठ्याच्या तुलनेत विलंबाने होईल, असे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍यावतीने कळविण्‍यात आले आहे.