अक्षय तृतीयेला प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'ची घोषणा; बाबासाहेब पुरंदरेंचे लिखाण येणार रुपेरी पडद्यावर

    10-May-2024
Total Views |
पॅनोरमा स्टुडिओज आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती
असलेला ‘फुलवंती’ चित्रपट लवकरच येणार असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची कलाकृती प्रेक्षकांसाठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.
 

prajakta  
 
मुंबई : अभिनय, उद्योजिका, सुत्रसंचालक अशा विविध जबाबदाऱ्या लिलया सांभाळणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. नुकतीच तिने तिची निर्मिती असलेल्या फुलवंती या चित्रपटाची अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घोषणा केली आहे. 'फुलवंती'.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती आता रुपेरी पडद्यावर येणार आहे.
 
पॅनोरमा स्टुडिओज आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मितीअसलेला ‘फुलवंती’ चित्रपट पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार असून अभिनेत्री प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे.
 prajakta  
 
आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता सांगते, ‘फुलवंती' सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्क्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. 'फुलवंती' चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन,असा विश्वास मला आहे. दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या सोबत आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.
 
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे. मंगेश पवार अँड कं आणि शिवोsहम क्रिएशन्स प्रा.लि.निर्मित ‘फुलवंती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. पखवाज आणि घुंगरांची रंगणारी जुगलबंदी रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे.