लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधानांचीच आघाडी!

आतापर्यंत १०५ जाहिर सभांना संबोधन, राहुल गांधींच्या केवळ ३९ सभा

    10-May-2024
Total Views |
Narendra Modi News

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी १०५ जाहिर सभांना संबोधित केले आहे. त्या तुलनेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आतापर्यंत केवळ ३९ सभांनाच संबोधित केले आहे.लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांचे मतदान आतापर्यंत झाले असून निवडणुकीचा अर्धा टप्पा पार पडला आहे. त्यानंतर अद्याप चार टप्प्यांचे मतदान बाकी आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसतर्फे राहुल गांधी हे आपापल्या पक्षाची धुरा सांभाळत आहेत. विजयासाठी दोघेही नेते जोरदार प्रयत्न करत आहेत. जाहिर सभा, मुलाखती, रोड शो याद्वारे अतिशय आक्रमक प्रचारही दोघा नेत्यांतर्फे करण्यात येत आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून ९ मे पर्यंत पंतप्रधान मोदींनी १०५ सभा घेतल्या आहेत. त्यापैकी मार्चमध्ये ९, एप्रिलमध्ये ६८ आणि मे महिन्यात २६ सभांचा समावेश आहे. दिवसाला सरासरी तीन सभांना संबोधित करून पंतप्रधान मोदींनी मार्चपासून प्रादेशिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांपर्यंत विविध वाहिन्या, वर्तमानपत्रे आणि मासिकांना २४ मुलाखती दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर या काळात त्यांनी २१ रोड शोही केले आहेत. याशिवाय शेकडो मंदिरे आणि गुरुद्वारांना भेटी दिल्या. प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांची भेट घेतली आहे.

त्याचवेळी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत १७ मार्चपर्यंत भारत जोडो न्याय यात्रेमध्ये होते. त्यानंतर १८ मार्च ते ८ मे पर्यंत राहुल यांनी ३९ जाहीर सभांना संबोधित केले. यामध्ये मार्चमधील एक, एप्रिलमधील २९ आणि मेमधील १० सभांचा. विशेष म्हणजे यापैकी अनेक सभा अशा ठिकाणी झाल्या, ज्यामुळे काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. उदाहरणार्थ, सातव्या टप्प्यातील ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस रिंगणातही नाही, तेथे तिसऱ्या टप्प्यात राहुल गांधी प्रचार करताना दिसले. याशिवाय आघाडीच्या साथीदारांसोबत काही पत्रकार परिषदा झाल्या आहेत. मात्र, मुख्य प्रवाहातील माध्यमांना कोणतीही मुलाखत त्यांनी दिलेली नाही.

पंतप्रधानांकडून सर्व आरोपांना उत्तरे

आतापर्यंतच्या २४ मुलाखतींमध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधकांकडून त्यांच्याविरोधात उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामध्ये इलेक्टोरल बॉण्ड्सपासून ते रालोआ सहयोगी जेडीएस उमेदवार प्रज्वल रेवन्नापर्यंतच्या प्रश्नांचा समावेश आहे. काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याच्या आरोपांनाही पंतप्रधानांनी प्रत्युत्तर दिले आहे. ईडी-सीबीआयसाच्या गैरवापराच्या आरोपांनाही उत्तर दिले आहे. संविधान बदलून आरक्षण संपविणे, हुकूमशाही आदींनाही प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांनी भाजपच्या कोणत्याही आरोपांना उत्तर दिलेले नाही.