माता रमाबाई आंबेडकरनगर झोपू प्रकल्पाला वेग

पहिल्या टप्प्यातील प्रारूप याद्या जाहीर; हरकती सादर करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी

    10-May-2024
Total Views |

ramabai ambedkar nagar


मुंबई,दि.९:
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या एक हजार ६९४ झोपड्यांतील रहिवाशांची पात्रता प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्यांची प्रारूप यादी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर अन्य झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. आता त्यांचीही प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 'एसआरए'कडून येत्या काही महिन्यांत ही प्रारूप यादी जाहीर केली जाईल.

हरकती सादर करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने या प्रकल्पासाठी झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून कागदपत्रे पडताळणी सुरु आहे. या पडताळणीअंती पात्र झोपडपट्टीधारकांची प्रारूप यादी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) प्रसिद्ध केली आहे. पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पासाठी या झोपडपट्टीतील एक हजार ६९४ झोपड्या बाधित होणार आहेत. 'एसआरए'ने पहिल्या टप्प्यात पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या या एक हजार ६९४ झोपड्यांची प्रारूप यादी जाहीर केली आहे. आता यावर हरकती सादर करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.'एसआरए'कडून अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे, तर उर्वरित झोपड्यांची प्रारूप यादीही टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहे.

प्रकल्प नेमका काय?

रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १६ हजार ५७५ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून छेडा नगर ते ठाणे या ईस्टर्न फ्रीवेच्या विस्तारासाठी एमएमआरडीएला मोकळी जमीन मिळणार आहे. एमएमआरडीएद्वारे बांधण्यात येणाऱ्या ईस्टर्न फ्रीवेच्या विस्तारामुळे बाधित होणाऱ्या १,६९४ झोपडपट्ट्यांना प्राधान्य दिले जाईल. एमएमआरडीएने ईस्टर्न फ्रीवेचा ठाणेपर्यंत १४ किमी विस्तार करण्याची आणि चार ठिकाणी एंट्री आणि एक्झिट रॅम्प बसवण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे ऑरेंज गेट आणि ठाणे दरम्यान सिग्नल रहित वाहतूक सुरू होईल. या प्रकल्पामुळे, एमएमआरडीए विविध चालू प्रकल्पांमधून प्रकल्पग्रस्तांसाठी आणखी ५,००० घरे देखील अधिग्रहित करेल.