इराणच्या ताब्यातील इस्रायली जहाजातील भारतीयांची सुटका!

भारताचे मोठे राजनैतिक यश

    10-May-2024
Total Views |
 Indian sailors

नवी दिल्ली:  इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावरील पाच भारतीय खलाशांना गुरुवारी सोडण्यात आले. इराणमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. यामुळे भारताने मोठा कुटनितीक विजय मिळवला आहे. भारताला एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. इराणने अलीकडेच ताब्यात घेतलेल्या इस्रायलच्या जहाजाच्या क्रू सदस्यांपैकी पाच भारतीय खलाशांना सोडले आहे. पाच भारतीय खलाशी शुक्रवारी सायंकाळपर्यंत इराणहून भारतासाठी रवाना होतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सुटका करण्यात आलेल्या भारतीय खलाशांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि खलाशांच्या सुटकेबद्दल इराण सरकारचे आभार मानले आहेत.
 
इराणने १३ एप्रिल रोजी इस्रायलचे एक मालवाहू जहाज ताब्यात घेतले होते. या जहाजाच्या चालक दलात १७ भारतीय नागरिकांचा समावेश होता. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्रायलच्या मालकीचे एमएसएसी एरीज हे जहाज ताब्यात घेतले. हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दुबईच्या दिशेने जात होते. हे जहाज त्यांच्या हद्दीतून परवानगीशिवाय जात असल्याचा आरोप इराणने केला आहे. जहाजावरील भारतीय क्रूमध्ये केरळमधील महिला खलाशी, ॲन टेसा जोसेफचाही समावेश होता, ज्यांना इराण सरकारने आधीच सोडले होते. जेव्हा इराणने जहाज ताब्यात घेतले तेव्हा जहाजावर 25 क्रू सदस्य होते ज्यात 17 भारतीय आणि दोन पाकिस्तानी होते.