स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये विदेशी भाषा प्रशिक्षणास सुरुवात

    10-May-2024
Total Views |
english
 
मुंबई: महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रेरणेने स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये विदेशी भाषा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आली. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून ७ मार्च २०२४ रोजी विद्या विहार येथे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. परदेशातील उपलब्ध रोजगार आणि त्यासाठी आवश्यक भाषा कौशल्य युवकांना मिळावे यासाठी या प्रबोधिनीमध्ये जपानी, हिब्रू, जर्मन आणि फ्रेंच या ४ भाषांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आज जर्मन भाषा शिकण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. तसेच येत्या महिन्याभरात या ठिकाणी जपानी भाषा प्रशिक्षण देखील सुरु करण्यात येणार आहे.
 
स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये जर्मन भाषा प्रशिक्षणाची सुरुवात अतिशय योग्य वेळी झाली असून, कुशल मनुष्यबळासाठी जर्मनीमध्ये सद्यस्थितीत ७ लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत. २०३५ सालापर्यंत ७० लाख कुशल मनुष्यबळाची गरज जर्मनीला भासणार आहे. जपान देशात सुद्धा कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे. सदर विदेशी भाषा प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून जर्मनी, जपान किंवा इतर देशातील कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 
सर्वसमावेशक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून A१ म्हणजे अगदीच मूलभूत पातळीपासून ते C२ पातळी म्हणजेच जर्मन भाषेत पारंगत होईपर्यंत शिक्षण दिले जाईल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी सक्षम शिक्षक सुद्धा उपलब्ध असणार आहेत.
 
परदेशात आदरातिथ्य क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र यासह होम केयरसारख्या अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक सर्व प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी आणि महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येते. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधिनी, मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या महाराष्ट्र इंटरनॅशनल या रोजगार केंद्राशी देखील जोडलेली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीसह तेथे राहण्याची व्यवस्था, आवश्यक गोष्टींचे प्रशिक्षण, इंटरव्यूसाठीचे प्रशिक्षण, कौन्सिलिंग इत्यादी सुविधा देखील पुरवल्या जातात.