अखेर मणिशंकर अय्यरही मैदानात, पाकप्रेम दाखवून काँग्रेसला आणले अडचणीत

    10-May-2024
Total Views |
Congress leader Mani Shankar Aiyar's remarks on Pakistan


नवी दिल्ली
: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने भारताने त्यांच्यासोबत सन्मानानेच वागावे, असे वक्तव्य करून मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला अडचणीत आणले आहे.काँग्रेसला अडचणीत आणण्याचा विडा उचललेल्या नेत्यांपैकी अतिशय दिग्गज नेते मणिशंकर अय्यर अखेर मैदानात उतरले आहेत. मैदानात उतरताच त्यांनी पहिल्याच झटक्यात पाकप्रेम दाखवून काँग्रेस पक्षाला चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यामुळे सॅम पित्रोडा यांच्या धक्क्यातून सावरण्याचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला पुन्हा एकदा दणका बसला आहे.
 
समाजमाध्यमांवर अय्यर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अय्यर यांनी पाकिस्तानशी चर्चेचे समर्थन करत सरकारला आवाहन केले की, पाकिस्तान हा एक सार्वभौम देश असून त्यांच्याशी सन्मानानेच वागले पाहिजे. पाककडे अणुबॉम्ब आहे आणि तेथे कोणी माथेफिरू सत्तेत आले आणि लाहोर स्टेशनवर अणुबॉम्बचा स्फोट झाला तर अवघ्या काही सेकंदात त्याचा परिणाम अमृतसरवर होईल. अशा परिस्थितीत चर्चेतून बॉम्बचा वापर थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्याशी बोलून त्यांचा आदर करण्याचा प्रयत्न केला, तरच ते बॉम्बचा वापर करणार नाही. भारताला विश्वगुरू व्हायचे असल्यास पाकसोबत चर्चा करणे गरजेचे, असेही अय्यर यांनी म्हटले आहे.
 
काँग्रेसने पक्षाचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यापासून हात झटकले आहेत. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर लिहिले की, अय्यर यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका नसून काँग्रेस त्या वक्तव्याशी असहमत आहे.

नवा भारत घाबरत नाही – राजीव चंद्रशेखर, केंद्रीय मंत्री

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यास केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मणिशंकर अय्यर असोत वा सॅम पित्रोदा, यातून काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि धोरणांचा अंदाज येतो. अय्यर पाकिस्तानचे जनसंपर्क अधिकारी असल्यासारखे वागत आहेत. राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष पाकिस्तानची माफी मागणारा पक्ष आहे. मात्र, हा नवा भारत असून तो कोणासही घाबरत नाही, असे केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.