छत्तीसगढमध्ये १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

    10-May-2024
Total Views |
Cobra
 
नवी दिल्ली: छत्तीसगडमधील विजापूर येथील पीडिया जंगलात शुक्रवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे.
 
डीआरजी कोब्राच्या २१० बटालियन आणि सुकमा, विजापूर आणि दंतेवाडा येथील एसटीएफ जवानांकडून चकमकीनंतर शोधमोहिम राबवण्यात येत आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचे एक पथक गंगलूर पोलिस स्टेशन हद्दीतील पिडिया गावाजवळ नक्षलविरोधी मोहिमेवर होते. यावेळी जवळच्या जंगलात ही चकमक झाली. पोलीस पथक ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवत असून त्यानंतर ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. बस्तरचे डीआयजी कमलोचन कश्यप यांनी याला दुजोरा दिला आहे.
 
यापूर्वी १६ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील कांकेरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले होते. यावेळी एके-४७ सह मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली होती. या चकमकीत नक्षल कमांडर शंकर रावही मारला गेला होता. त्यानंतर ३० एप्रिल रोजी छत्तीसगढमध्येच नारायणपूर येथे अबुझमाडच्या जंगलातही सुरक्षादलांनी ३ महिलांसह १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.