डोअरकिपर ते संगीतकार...

    10-May-2024
Total Views |
 Vicky Adsule

नाट्यगृहाचा ‘डोअरकिपर’ ते ‘संगीतकार’ अशी झेप घेतलेल्या विकी अडसुळे या हरहुन्नरी युवकाचा युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरलेल्या संगीतमय प्रवासाची ही कहाणी...

जिद्द आणि चिकाटी असली की, यशाचे शिखर गाठता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे, विकी गिरीश अडसुळे. ठाण्यातील सफाई कामगारांची वस्ती असलेल्या खारटन रोड येथे दि. २८ सप्टेंबर १९८९ रोजी जन्मलेल्या विकीचे बालपण ठाण्यातच गेले. वडील ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ‘डोअरकिपर’चे काम करीत, त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच. त्याही परिस्थितीत विकीने आजोबांकडे वास्तव्य करून प्राथमिक ते उच्चशिक्षण पूर्ण केले. आजोबांनीच विकीचा सांभाळ केला. खिशात दमडी नव्हती, तरी विकी, पायपीट करीत वडील नोकरी करीत असलेल्या नाट्यगृहात जाऊन नाटके, संगीत कार्यक्रमांचा आस्वाद घेई. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने २००१ साली वडिलांनी विकीला गडकरी रंगायतनमध्ये ‘डोअरकिपर’च्या नोकरीला चिकटवले. मुळातच संगीत क्षेत्राची आवड असल्याने ‘डोअरकिपर’चं काम करत असताना रंगायतनमधील नाटके व गाण्यांचे कार्यक्रम पाहून विकीमध्ये संगीतामधील रूची वाढली. त्यामुळे संगीत क्षेत्रातच करिअर करायचे त्याने मनोमन ठरवले.

ठाण्यात गेल्या तीन दशकांपासून वास्तव्य करणार्‍या विकीच्या घरी आईवडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार असला तरी, याआधी संगीत क्षेत्राचा गंधही कुणाला नव्हता. विकीने मात्र जिद्दीने या क्षेत्रात पाय रोवत संगीत प्रवास सुरू केला. ‘डोअरकिपर’चं काम करता करता अनेक प्रख्यात कलावंत, दिग्गज गायक पाहायला व ऐकायला मिळाले. त्यांच्याकडे बघून खूप काही प्रेरणा मिळाली. कलाकारांच्या ओळखीतून नवीन मित्र लाभले, त्यातीलच काही परिचितांद्वारे सुरुवातीला पथनाट्यामध्ये काम मिळाले. पथनाट्यामध्ये सादरीकरणापूर्वी प्रेक्षक गोळा करण्यासाठी आधी गाणी गाऊन माहोल बनवावा लागत असे. ही जबाबदारी त्याच्यावर असायची. त्यातून मग गाण्याची ओढ निर्माण झाली.जुन्या आठवणींना उजाळा देत विकी सांगतो, “तेव्हा ‘गडकरी रंगायतन’मध्ये काम करीत असताना, मोहन जोशी यांच्या माध्यमातून अनिरुद्ध जोशी जे माझे गुरु आहेत त्यांची ओळख झाली. त्यांनी सर्वंकष मदत करून खूप आधार दिला. पैसे देऊन गाणं शिकण्याची त्यावेळी ऐपत नव्हती. ‘गडकरी रंगायतन’ हीच विकीची कर्मभूमी ठरली.” तेथूनच कलाविश्वातील सर्व गोष्टी अनुभवायला आणि शिकायला मिळाल्यामुळे अडसुळे घराण्यात पहिला संगीतकार-गायक घडला आणि एका नव्या कारकिर्दीला प्रारंभ झाल्याचे विकी सांगतो.

गायनाव्यतिरिक्त विकीला देवस्थाने तसेच नवनवीन ठिकाणी फिरायला आवडते. क्रिकेट खेळायला आवडते. प्रवास करत असताना वेगवेगळ्या ठिकाणचे स्पेशल पदार्थ खायला आवडतात. याशिवाय चित्रे काढणे, नवनवीन गाणी आणि अनेक वेगवेगळे संगीत ऐकण्याचा छंदही त्याला आहे. संगीत क्षेत्रात छोटे-मोठे कार्यक्रम करीत मोठे शो देखील तो करू लागला. विकीचा नावलौकिक सर्वत्र वाढू लागला. संगीत क्षेत्रातील या कामगिरीबद्दल २०१८ साली ठाण्यातील संकल्प विद्यालयाच्या माध्यमातून विकीला ‘संगीतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय, विकीने संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांना उत्कृष्ट संगीत पुरस्कार लाभले. तसेच, गायनाच्या विविध स्पर्धांमध्येही पुरस्कार मिळाल्याचे विकी सांगतो.सध्या स्टेज सादरीकरणाबरोबरच विकी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सर्वदूर पोहोचवत आहे. त्याचे स्वतःचे युट्यूब चॅनलदेखील आहे. त्यावर त्याने स्वतः गायलेली, संगीतबद्ध केलेली गाणी आहेत. आतापर्यंत विकीने अनेक गीतांना संगीत दिले असून रवींद्र साठे, कुणाल गांजावाला, स्वप्निल बांदोडकर, आदर्श शिंदे आदी दिग्गज गायकांसोबत तसेच आघाडीचे गायक हर्षवर्धन वावरे, आर्या आंबेकर, आनंदी जोशी, ऋषिकेश रानडे यांच्यासोबत संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. व्हिडिओ पॅलेस, सागरिका अशा अनेक म्युझिक कंपन्यांंसमवेत त्याने संगीतकार म्हणून काम केले आहे. भविष्यात त्याला संगीतकार व्हायचे आहे आणि सध्या तो त्यावरच लक्ष केंद्रित करून वाटचाल करीत आहे.
 
तळागाळातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या विकीला समाजसेवा तसेच संस्थात्मक कामातही रुची आहे. संगीत क्षेत्रात काम करत असताना, अनेक सामाजिक संस्थांसोबत काम करण्याचा योग आला. अंध, गतिमंद, दिव्यांग मुलांसाठी गाण्यांचा कार्यक्रम, तसेच मदतनिधीसाठी शो अशा अनेक समाजसेवी उपक्रमांमध्ये विकी कुठलीही अपेक्षा न ठेवता आवर्जून सहभाग घेतो. नवीन पिढीला संदेश देण्याऐवजी मित्रत्वाचा सल्ला देताना विकी सांगतो की, “क्षेत्र कुठलेही असो, आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहायला हवे. कुठल्याही क्षेत्रात तन्मयतेने, एकाग्रतेने काम केलं पाहिजे. संगीत ही अशी गोष्ट आहे, जी कितीही शिकली तरी कमीच आहे.” तेव्हा, सतत शिकत राहिले पाहिजे. श्रवण करून त्याचा रियाज करीत संगीत साधना कायम ठेवणे गरजेचे असल्याचे तो सांगतो. अशा या ‘डोअरकिपर ते संगीतकार’ म्हणून नावारूपाला आलेल्या या होतकरू कलाकाराला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

-दीपक शेलार