हे कोटि कोटि भुजदंड, बनतील इथे ध्वजदंड!

    10-May-2024
Total Views |
Enmity between Britain and Russia
‘परक्यांचा होता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला, हे कोटि कोटि भुजदंड, बनतील इथे ध्वजदंड, छातीची करूनि ढाल, लाल या संगिनीस भिडवू’ या कवितेतला क्षात्रतेजाचा स्फुल्लिंग फक्त कवितेपुरता न राहता, तो समाजात प्रत्यक्ष प्रकटलेला दिसू लागला. भारताच्या हितशत्रूंना चिंता वाटावी, असे ते दृश्य होते. अरे, या हिंदूंंना अहिंसा, शांती, विश्वप्रेम, अलिप्तता वगैरे नामर्द बनवणार्‍या गेल्या १९२१ सालापासून चारतोय. पण, एक लढाई काय झाली अन् हे त्यांच्या मूळ सिंह स्वभावाप्रमाणे गर्जना करीत उठले की!

ब्रिटन आणि रशिया यांचे फार जुने हाडवैर आहे. रशियातली राजेशाही व्यवस्था उलथवून तिथे लेनिन- स्टॅलिनचे साम्यवादी सरकार आले, तरी हे हाडवैर चालूच राहिले. उलट त्याची धार आणखीच वाढली. स्टॅलिनच्या साम्यवादी प्रचारकांनी युरोपमधल्या सगळ्याच देशांतल्या, त्यातही विशेषत: ब्रिटनमधल्या विद्यापीठांतल्या युवकांमध्ये साम्यवादाच्या आंतरराष्ट्रीय एकतेचा जोरदार प्रचार केला. म्हणजे काय? म्हणजे असे की, सरकारे ही राजेशाही असोत वा लोकशाही असोत, शेवटी ती श्रमिकवर्गाचे शोषण करणारीच असणार. तेव्हा, अशा दोन सरकारांमध्ये, समजा उद्या युद्ध झाले, तर युवकांनी त्यात उतरूच नये. कारण, कुणीही जिंकले तरी ते विजेते सरकार किंवा तो देश साम्यवादाचा शत्रूच असणार आणि जेव्हा साम्यवादी सरकारची या लोकशाही सरकारांशी लढाई जुंपेल, तेव्हा तिथल्या युवकांनी देशभक्तीच्या भ्रामक घोषणांना भुलून न जाता, साम्यवादी विचाराच्या मागे उभे राहावे.
थोडक्यात, सोव्हिएत रशिया जेव्हा तुमच्या देशावर आक्रमण करेल, तेव्हा हे युवकांनो, तुमच्या देशाच्या सैन्यात भरती न होता, उलट गनिमी सैन्यात भरती व्हा आणि सोव्हिएत रशिया विजयी होऊन तुमच्या देशात साम्यवादी सरकार येईल, असे पाहा. म्हणजे, ‘साम्यवाद’ या मोहक तत्त्वज्ञानाच्या नावाखाली सोव्हिएत प्रचारक देशोदेशींच्या तरुणांना आपापल्या स्वदेशाशी बेईमानी करण्याचे आवाहन करीत होते.प्रत्यक्ष दुसर्‍या महायुद्धाला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा असा अनुभव जगभरच्या सगळ्याच देशांना आला की, बुद्धिमंतवर्गाने काही प्रमाणात देशद्रोह करून आपल्या देशाची लष्करी वा औद्योगिक गुपिते सोव्हिएत रशियाला पुरवली. पण, शेतकरी आणि कामगार हा जो श्रमिकवर्ग, ज्यांना साम्यवादी खास आपलाच वर्ग मानत होते, त्या कष्टकरी वर्गाने आपली नेहमीची कामे बाजूला ठेवून जोरदार सैन्यभरती केली. रणांगणावरही हाच वर्ग तिखटपणे झुंजला, ‘माझ्या मातृभूमीवर कुणीतरी परका आक्रमण करू पाहतो आहे आणि ते मी सहन करणार नाही,’ ही प्रखर देशभक्तीची भावना ’आंतरराष्ट्रीय श्रमिकांचे राज्य’ या संकल्पनेपेक्षा प्रभावी ठरली.
 
स्वतः स्टॅलिनने स्वतःच्याच देशात या प्रखर देशभक्तीचा अनुभव घेतला. आशियासह पश्चिम युरोपीय देशांमध्ये आपल्या देशाला ’मातृभूमी-मदरलँड’ म्हटले जाते. पण, जर्मनीपासून पूर्वेकडच्या सर्व देशांमध्ये ’पितृभूमी-फादरलँड’ ही संकल्पना प्रचलित आहे. रशियामध्येसुद्धा हा देश म्हणजे आमची पितृभूमी असून सम्राट झार हा आमचा पिता, आमचा प्रतिपाळ करणारा राजा आहे, अशीच जनतेची शतकानुशतके धारणा होती. साम्यवाद्यांनी या सगळ्या संकल्पना जुनाट, कालबाह्य, शोषक राज्यकर्त्यांच्या संकल्पना म्हणून मोडीत काढल्या. आपल्याकडच्या साम्यवाद्यांचा आणि समाजवाद्यांचा लाडका, ठेवणीतला शब्द म्हणजे ’बुरसटलेल्या संकल्पना’ हा होय. जसा हिंदी चित्रपटात नायक किंवा नायिका यांच्या तोंडी एकदा तरी, ’मैं तुम्हारे बिना जी नही सकता किंवा सकती’ हा डायलॉग आलाच पाहिजे, तसे हाडाचा साम्यवादी किंवा समाजवादी यांच्या भाषणात, लेखनात हिंदू समाजाला उद्देशून ‘प्रतिगामी’ आणि ‘बुरसटलेला’ हे शब्द आलेच पाहिजेत.
 
असो. तर झाले असे की, हिटलरने शांततेचा करार मोडून आकस्मिकपणे सोव्हिएत रशियावर अत्यंत कजाखी हल्ला चढवला. कसलीही तयारी नसलेल्या सोव्हिएत फौजांना मागे रेटत जर्मन सेना वेगाने राजधानी मॉस्कोकडे दौड मारू लागल्या. हताश झालेल्या सोव्हिएत सैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात श्रमिकांचे राज्य, कष्टकर्‍यांचे राज्य, समतेचे शासन, महान नेता लेनिनचे स्मरण वगैरे पोपटपंची साफ अपयशी ठरली. मग आता?स्टॅलिन काही मूर्ख नव्हता, उलट धूर्तपणाचा मूर्तिमंत अर्क होता. त्याने हुकुमाचा पत्ता काढला. ’लोक हो, आपल्या पवित्र रशियन पितृभूमीवरून घाणेरड्या नाझी आक्रमकांना पिटाळून लावा,’ ही हाक रशियन सैन्याला आणि त्याहीपेक्षा जनतेला अचूक पोहोचली. त्यांच्या हृदयापर्यंत पोहोेचली आणि मग जगाने एक अभूतपूर्व रणसंग्राम अनुभवला. रशियन जनता सोव्हिएत राज्य व्यवस्थेसाठी नव्हे, तर आपल्या पवित्र पितृभूमीसाठी जीव खाऊन लढली, बेभान होऊन लढली आणि महायुद्धाचे पारडेच फिरले.
 
आपल्या भारताचा अनुभव तर ‘लै भारी’ आहे. आपल्या देशाचे सगळेच ‘लै भारी’ असते. १९२१ सालापासून म्हणजे लोकमान्य टिळकांचे निधन होऊन स्वातंत्र्य आंदोलनाची सूत्रे महात्मा गांधींच्या हाती गेल्यापासून, हातात शस्त्र घेऊन शत्रूशी लढणे, हे जणू पाप समजले जाऊ लागले. १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे ‘बिना खड्ग, बिना ढाल’ मिळाले आहे, असा जनतेचा मुद्दाम समज करून देण्यात आला. १९५२, १९५७, १९६२ या लागोपाठच्या तीन सार्वत्रिक निवडणुका पंडित नेहरूंनी प्रचंड बहुमताने जिंकल्या. हे यश त्यांच्या विश्वशांती, प्रेम, अहिंसा, अलिप्तता इत्यादी धोरणांमुळे मिळाले, असा पद्धतशीर गवगवा करण्यात येत होता. पंडित नेहरूंचे उजवे हात असलेले साम्यवादी संरक्षणमंत्री कृष्ण मेनन म्हणू लागले की, लष्कर हे एक कसलेही उत्पादन न करणारे क्षेत्र आहे. एवढ्या मोठ्या मनुष्यबळाला अनुत्पादक स्थितीत पोसत राहणे भारतासारख्या गरीब देशाला परवडणारे नाही. मेनन साहेबांनी, भारतीय लष्कराने कॉफीचे उत्पादन करावे, असा घाट घातला.
लक्षात घ्या, रामाच्या, कृष्णाच्या, हनुमंताच्या, अर्जुनाच्या, शिवछत्रपतींच्या या भारत देशाचे क्षात्रतेज जेवढे म्हणून दाबून टाकता येईल, तितके दाबण्याचा प्रयत्न खुद्द त्या देशाचे राज्यकर्तेच करत होते आणि तरीही १९६२च्या मे महिन्यातली तिसरी सार्वत्रिक निवडणूक पंडित नेहरू आरामात जिंकले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विलक्षण मोहक आणि भ्रामक मोहिनीतून जनता बाहेरच पडत नव्हती.आणि अशा गुळगुळीत, गोड, गुलाबी, गुलकंदी अवस्थेत ऑक्टोबर १९६२ मध्ये चीनने भारतावर अचानक, आकस्मिक आक्रमण केले. तत्कालीन ‘नेफा’ म्हणजे आताच्या अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरून चिनी सेना वेगाने पुढे घुसल्या. त्या तशाच पुढे घुसत राहिल्या असत्या, तर संपूर्ण आसाम हां-हां म्हणता पादाक्रांत करून त्या बंगालपर्यंत सहज आल्या असत्या.
सरहद्दीवरून पराभवाच्या बातम्या वेगाने देशभर पसरू लागल्या. जनता प्रथम चकित, मग दु:खी आणि मग अत्यंत संतप्त झाली. ज्या आमच्या सेनेने इंग्रजांसाठी दोन जागतिक महायुद्धे यशस्वीपणे लढली, ज्या सेनेने देश स्वतंत्र झाल्या-झाल्या पाकिस्तानने पुकारलेल्या आक्रमणाचा खंबीर प्रतिकार केला, तीच आमची ही अजेय सेना या पिवळ्या चिन्यांसमोर पराभूत झाली? का? कशी? कुणामुळे?
 
मग तपशीलवार बातम्या येऊ लागल्या. अनुभवी सेनापतींनी पुन:पुन्हा इशारे दिले, संबंधित कागदपत्रे, नकाशे समोर मांडले, संख्या आणि सामग्रीची वाढ करा म्हणून तळमळून मागणी केली, तरी संरक्षणमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. इथपर्यंत की, हिमालयात १५ हजार-२० हजार फूट उंचीवरच्या लष्करी ठाण्यांमधल्या जवानांना ना धड गरम कपडे दिले, ना पुरेसे अन्न दिले. त्यांच्या बंदुका एका मापाच्या, तर त्यात भरण्यासाठी दिलेल्या गोळ्या भलत्याच मापाच्या, अत्याधुनिक अ‍ॅसॉल्ट रायफल्स घेऊन लढणार्‍या चिनी सैनिकांशी आमच्या सैनिकांनी लढावे तरी कसे? भाले-तलवारी घेऊन की लाथाबुक्क्यांनी? आणि अशा संरक्षणमंत्र्यांना पाठीशी घालणारे कोण, तर आमचे लाडके पंतप्रधान! जनता भयंकरच संतापली. त्या संतापाची धग नुकत्याच प्रचंड बहुमताने सरकार बनवलेल्या नेहरूंच्या सिंहासनाला जाणवू लागली. हा झाला राजकीय भाग. सामाजिक पातळीवर जनतेमध्ये एक अपूर्व युद्ध उत्साह, जोश, हिंमत प्रकटली. ‘परक्यांचा होता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला, हे कोटि कोटि भुजदंड, बनतील इथे ध्वजदंड, छातीची करूनि ढाल, लाल या संगिनीस भिडवू’ या कवितेतला क्षात्रतेजाचा स्फुल्लिंग फक्त कवितेपुरता न राहता, तो समाजात प्रत्यक्ष प्रकटलेला दिसू लागला.
भारताच्या हितशत्रूंना चिंता वाटावी, असे ते दृश्य होते. अरे, या हिंदूंंना अहिंसा, शांती, विश्वप्रेम, अलिप्तता वगैरे नामर्द बनवणार्‍या गेल्या १९२१ सालापासून चारतोय. पण, एक लढाई काय झाली अन् हे त्यांच्या मूळ सिंह स्वभावाप्रमाणे गर्जना करीत उठले की!इस्रायल हा देश लढत-लढतच जन्माला आला. त्यामुळे तिथल्या मुला-मुलींना जन्मतःच हत्यारे चालवता येतात, असे म्हणायला हरकत नाही. १९४८ साली इस्रायलच्या पहिल्या स्वतंत्र सरकारने १८ वर्षे वयाच्या सर्व तरुण-तरुणींना किमान तीन वर्षांनी लष्करी सेवा सक्तीचीच करून टाकली. सध्या ही मर्यादा तरुणांसाठी पावणेतीन वर्षे, तर तरुणींसाठी दोन वर्षे अशी किंचित खाली आणण्यात आली आहे. त्या मुदतीनंतर ती तरुण व्यक्ती हवी असल्यास नागरी पेशातील अन्य व्यवसाय-नोकरी करू शकते. तरीही वयाच्या ४५ वर्षापर्यंत, गरज पडल्यास लष्कर कुणालाही पाचारण करू शकते.दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझा भागात ‘हमास’च्या अतिरेक्यांनी इस्रायली नागरिकांवर हल्ला चढवून पार जबरदस्त कत्तल केली. अपहरण आणि बलात्कार व खून यांचा कहर केला. ही बातमी कळताक्षणी अनेक नागरिक ताबडतोब आपल्या सैन्य तुकडीच्या मुख्यालयाकडे वेगाने निघाले. वास्तविक, आता ते नागरी पेशातले व्यवसाय, नोेकरी करत होते. त्यांची लष्करी सेवेची मुदत संपली होती. कित्येकांनी तर वयाची ४५ वर्षेदेखील पार केली होती. तरीही सैनिकी मुख्यालयाकडून येणार्‍या ‘इमर्जन्सी कॉल’ची वाट न पाहता, ते स्वतःच तिकडे जाऊन पोहोचले.
अशा या तीव्र राष्ट्रीय भावनेच्या इस्रायली समाजात यावेळी प्रथमच एक विसंवाद दिसून आला. ‘ऑर्थोडॉक्स’ म्हणजे सनातनी, ‘अल्ट्रा ऑर्थोडॉक्स’ म्हणजे जादा सनातनी, तर या ‘अल्ट्रा ऑर्थोडॉक्स’ नावाच्या ज्यू पंथाच्या अनुयायांचे असे म्हणणे आहे, की आमचे काम ज्यू धर्मग्रंथाचे अध्ययन नि अध्यायन करणे, हे आहे. आम्ही सक्तीची लष्करी सेवा करणार नाही. तातडीची गरज म्हणून लढायलाही जाणार नाही. या कायद्यातून आम्हाला सूट द्या. हे म्हणजे फारच झाले. पण, नेतान्याहू सरकार ज्या विविध पक्षांच्या युतीवर उभे आहे, त्यात या ‘अल्ट्रा ऑर्थोडॉक्स’ पक्षाचाही महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पंतप्रधान नेतान्याहू त्यांच्या मागणीकडे दुर्लक्षही करू शकत नाहीत. यानिमित्ताने ‘वर्ल्ड वॅल्यूज सर्व्हे’ ऊर्फ ‘डब्ल्यू. व्ही. एस.’ या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थेने देशोदेशींच्या तरुणांना प्रश्न विचारले की, तुम्ही तुमच्या देशासाठी लढायला तयार आहात का?’ सर्वाधिक टक्केवारी म्हणजे, ७५ ते ७८ टक्के भारतीय तरुणांनी याला ‘होय’ असे उत्तर दिले आहे.

 
मल्हार कृष्ण गोखले