भटकणार्‍या आत्म्याची भटकंती!

    01-May-2024
Total Views |

sp
 
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे दोघंही एकमेकांचं अधूनमधून गुणगान गातात. तसंच प्रसंगानुरुप परस्परांवर तीव्र शब्दांत टीकादेखील करत असतात. आपण पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो, असं सांगायलादेखील मोदी विसरत नाहीत. परंतु, या खेपेला मात्र मोदींनी पवारांच्या संधीसाधू राजकारणाचा ४५ वर्षांचा हिशेबच थोडक्यात मांडला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणूक प्रचाराचा महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे. सोमवारी, दि. २९ एप्रिल रोजी ऐन तळपत्या उन्हाळ्यात त्यांनी सोलापूर, कराड आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या. लक्षावधी लोकांची या सभांना उपस्थिती दिसत होती. उपस्थित मतदारांशी-नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आपण केलेल्या कामांची आकडेवारी सांगत, त्याबाबतची ‘गॅरंटी’ त्यांच्याकडून वदवून घेत मोदींच्या या सभा सुरू आहेत. ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांच्याही इर्षेनं अशाच सभा सुरू आहेत - अर्थात, या नेत्यांच्या आणि त्यांच्या वारसदारांच्या दृष्टीनेही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे ८४ वर्षांच्या शरद पवार यांच्यापासून ते उद्धव ठाकरे व्हाया संजय राऊत अशा सर्व पातळ्यांवरच्या राजकारण्यांनी पंतप्रधानांवर तोंडसुख घेण्याची आलेली नामी संधी सोडली असती, तरच नवल! मोदी हे हुकूमशहा आहेत. लोकशाही-संविधान धोक्यात आहे, इथंपासून भविष्यात ते निवडणुकाच घेणार नाहीत, असे ज्याला जसे जमतील तेवढे, जमतील तसे आरोप मोदींवर करण्याची हौस ही मंडळी आवर्जून भागवून घेत आहेत. जोडीला डाव्या, अतिडाव्या, समाजवादी, वंचित, अतिवंचित, ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, अशी सर्वच तथाकथित पुरोगामी, विचारवंत, इतिहास संशोधक, वकील, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक (महाराष्ट्रात अशा निवडक शंभरांची यादी नेहमीच तयार असते, ती कुठल्याही निवेदनाला जोडता येते.) ही मंडळीदेखील ‘आपापली घराणी’ सांभाळून लोकशाही धोक्यात आल्याची ओरड करू लागली आहेतच. त्यांच्यासाठी हा ‘सीझन’ फार फार महत्त्वाचा आहे.
 
देशात-महाराष्ट्रात असा सार्वत्रिक निवडणूक धुरळा उडालेला असतानाच, सोमवारी रात्री पंतप्रधानांची एका खासगी वृत्तवाहिनीवर तिघांनी घेतलेली सुमारे तासाभराची मुलाखत प्रसारित झाली. त्यातला एक मराठी भाषक वृत्तनिवेदक होता. या तिघांनीही प्रश्न लिहून आणलेले होते आणि पंतप्रधान हाती कोणताही कागद न घेता, आवश्यक ते संदर्भ आणि आकडेवारीच्या तपशीलांसह सविस्तर माहिती देत होते.
 
त्या मुलाखतीमधलाच एक प्रश्न होता की, एवढ्या अवाढव्य देशाचा कारभार, प्रचारदौर्‍यांची धावपळ, विरोधकांकडून होत असलेली व्यक्तिगत कडवट टीका, फिटनेसबाबतची काळजी हे सर्व तुम्हाला कसं काय जमतं? त्यावर उत्तर देताना मोदींनी आध्यात्मिक मुद्दाच सांगितला. “हे सर्व परमेश्वर घडवत आहे, मी फक्त एक निमित्त आहे. त्या परमात्म्याच्याच मनात असेल की, हे सर्व देशकार्य माझ्या हातून घडावं...” वगैरे वगैरे. भारतीय/हिंदू (ज्याच्या-त्याच्या सोयीनुसार) संस्कृतीमध्ये ‘आत्मा-परमात्मा’ या संकल्पना प्राचीन काळापासून मानल्या जातात. त्यावर अनेक प्रकारच्या उलट-सुलट चर्चा आणि तत्त्वज्ञानही मांडलं जातं. त्यानुसार आत्मा हे एक अविनाशी तत्त्व आहे आणि ते विश्वव्यापी असल्याची समजूत आहे. ‘कठोपनिषदा’मध्ये म्हटलं आहे,
 
आत्मानं रथिनं विद्धि, शरीरं रथमेव तु,
बुद्धिं सारथी विद्वि, मन प्रग्रहमेवच॥
 
अर्थात, आपलं शरीर म्हणजे रथ आणि त्याचा लगाम म्हणजे संयमी मन, सारथी आहे, बुद्धी तर या रथाचा स्वामी म्हणजे आत्मा. याबाबत हिंदीमध्ये अशी माहिती देण्यात येते, ‘सभी आत्माएँ नही भटकती। जो पापी याने अपराधी स्तर की आत्माएँ होती हैं, वे अवश्य भटकती हैं। भटकती इसलिएँ हैं, की वह अपनी मुक्ती के लिए परेशान रहती हैं।’  आता हे सगळं आत्मा-परमात्म्याचं पुराण यासाठी की, मोदींनी पुण्यातील घोड्यांच्या शर्यतीचं जे ठिकाण आहे - म्हणजेच रेसकोर्स - तिथंच निवडणुकीतल्या अन् राजकारणातल्या घोडेबाजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या एका राष्ट्रीय नेत्याबाबत फार मोठं विधान केलं आहे. ते आध्यात्मिक पातळीवरून असल्यामुळे अनेकांना उशिरा समजू शकेल. पण, ज्या शेलक्या शब्दांत ते मोदींनी मांडलं आहे, त्यावरून त्या विधानाची तीव्रता संबंधित व्यक्तीचं नाव घेतलेलं नसतानाही लक्षात येऊ शकते.
 
मोदींनी आपल्या भाषणात देशाचे माजी कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं नाव न घेता (पण, काही वृत्तपत्रांनी पवार यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे) म्हटलं आहे की, “आपल्याकडे म्हणतात काही आत्मे अतृप्त असतात. त्यांची स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, तर ते दुसर्‍यांच्या स्वप्नांमध्येही आडवं येतात. अशाच इथल्या (महाराष्ट्रातल्या) एका बड्या नेत्याने महत्त्वाकांक्षेसाठी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण केली. घरातही अस्थिरता निर्माण केली. आता हा भटकता आत्मा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे.” मोदी पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात ४५ वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्याच्या महत्त्वाकांक्षेने या खेळाची सुरुवात झाली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरतेला प्रारंभ झाला. विरोधकांत राहूनही हा आत्मा काहीतरी करू पाहत आहे. तसेच आता ते, त्यांच्या परिवारातही असं करत आहेत. राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार १९९५ मध्ये आले, तेव्हाही त्यांनी अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. या भटकत्या आत्म्यामुळे काही मुख्यमंत्र्यांना त्यांचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. २०१९ मध्ये जनादेशाचा मोठा अपमान करत सत्ता स्थापन केली. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ सुरू आहे. भाजपा-एनडीए सरकार देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल.”
 
गंमत म्हणजे, या सभेनंतर अजितदादांना पंतप्रधानांच्या या वक्तव्यासंबंधी विचारलं असता, “पुढच्या सभेत पंतप्रधानांना ते कुणाविषयी हे बोलले? त्यांचा काय उद्देश होता? हे विचारून तुम्हाला सांगतो,” असं पत्रकारांना ते म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे दोघंही एकमेकांचं अधूनमधून गुणगान गातात. तसंच प्रसंगानुरूप परस्परांवर तीव्र शब्दांत टीकादेखील करत असतात. आपण पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, असं सांगायलादेखील मोदी विसरत नाहीत. परंतु, या खेपेला मात्र मोदींनी पवारांच्या संधीसाधू राजकारणाचा ४५ वर्षांचा हिशेबच थोडक्यात मांडला.
 
पुरोगामित्वाचा मुखवटा पांघरायचा आणि शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्राला जाती-पातीत, धार्मिक मतभेदांमध्ये कसं अडकवलं जातंय, याचा अनुभव इथल्या सर्वपक्षीय मंडळींनी वेळोवेळी घेतला आहे. विशेष म्हणजे, अशा स्वार्थानंतर बरबटलेल्या भ्रष्ट राजकारणाबाबतच्या भूमिकांना ‘स्ट्रॅटेजी’ म्हणून गौरवण्यातही काही ठेवलेले राजकीय विश्लेषक धन्यता मानत असतात. पण, याच समाजविघातक राजकारणाला त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच मार्गानं प्रतिकार सुरू झाला की, त्याला प्रतिगामी, सनातनी, धर्मांध, बहुजन समाजाच्या विरोधी असल्याची टीका करायची, जातीयवादी संघटनांना चिथावणी देऊन आंदोलनं उभी करायची आणि लोकांनी बहुसंख्येने निवडून दिल्यानंतरही सत्तेशिवाय आपलं दुकान चालणार नाही, हे लक्षात घेऊन फोडाफोडीच्या राजकारणाचे मतलबी, स्वार्थी फॉर्म्युले ठरवून राज्याची लूट कायम सुरू ठेवायची, हेही महाराष्ट्राने अनुभवले आहे.
 
वसंतदादांचं सत्तारूढ, स्थिर सरकार पाडून अगदी टोकाच्या विरोधी विचारसरणीच्या जनसंघाच्या मंडळींना सत्तेत येण्यासाठी बरोबर घेऊन ‘पुलोद’ची खेळी करणार्‍या पवारांच्या राजकारणाचा नेमका ४५ वर्षांपूर्वीचा उल्लेख करून राजकारणातील खंजीर खुपसण्याच्या प्रवृत्तीचा मोदींनी आपल्या भाषणात अचूक लक्ष्यवेध घेतल्याचे मानले जाते. आधी ‘पुलोद’, मग ‘एस. काँग्रेस’, त्यानंतर ‘राष्ट्रीय काँग्रेस’, पुन्हा पंतप्रधानपदासाठीची खेळी अयशस्वी ठरल्यानंतर नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद आणि राज्यातील सत्तेसाठी काँग्रेसबरोबर समझोता, २०१४ मध्ये शिवसेना सत्तेत येऊ नये, यासाठी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका, २०१९ मध्ये त्याच शिवसेनेला पुढं करून महाविकास आघाडीचा विचारधारा गुंडाळून ठेवणारा प्रयोग, त्याच दरम्यान सत्तेसाठी अनुयायांना भाजपबरोबर बोलणी सुरू ठेवण्याचा, पहाटे जाऊन शपथविधी करण्याचा दिलेला सल्ला, अशा क्रमाने शरद पवार यांचे राजकारण त्यांच्या दुर्दैवाने आता फक्त काही जिल्ह्यांपुरते मर्यादित झालेले दिसते. पक्ष, चिन्ह आणि भूमिका सत्तेसाठी वारंवार बदलणं, यात आपण आपल्या कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी द्रोह करतो आहोत, असं त्यांना कधीच वाटलं नाही, हे आणखी दुर्दैवं! या कारनाम्यांमुळे पक्षांत, माणसांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि आता कुटुंबातही फूट पडल्याचेही त्यांना पाहावे लागले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला, पुतण्याने आणि अन्य प्रमुख सहकार्‍यांनी मूळ पक्ष आणि चिन्ह हस्तगत केले. अखेर, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे, शरद पवार यांना ‘साडेतीन जिल्ह्यांपुरत्या मर्यादित राहिलेल्या पक्षाचे अध्यक्षपद भूषवत राहावं लागत आहे.’ आता तर अजित पवारांनी दिलेल्या आव्हानामुळे त्यांना खुद्द आपल्याच गावात, आपल्याच पारंपरिक मतदारसंघात, आपल्याच मुलीच्या राजकीय अस्तित्वासाठी ८४ व्या वर्षी संघर्ष करावा लागत आहे. ५०-५० वर्षे ज्या विरोधकांच्या गाठीभेटी घेतल्या नव्हत्या, अशा विरोधकांच्या घरी जाऊन त्यांना भेटावं लागत आहे. त्याच कार्यकर्त्यांना, त्याच मतदारांना पुन्हा पुन्हा विनंत्या कराव्या लागत आहेत. पवार साहेबांच्या फसलेल्या राजकारणाचेच हे वास्तव चित्र. विचारधारा, मूल्यनिष्ठा, देशभक्ती, समाजहित, गरिबांचा विकास हे आता भाषणातले गुळगुळीत मुद्दे राहिलेले नाहीत.
 
काही वर्षे जातीयवादी राजकारणाच्या खेळ्या यशस्वी होऊ शकतात, पण सदैव तोच मार्ग भरवशाचा असेलच असं नाही. महिला धोरणासह, महिलांसाठी केलेल्या कामांची यादी सांगतानाच, मुलीच्या उमेदवारीचे समर्थन करण्यासाठी ४० वर्षे घरात नांदणार्‍या सुनेला ‘बाहेरची’ म्हणून संबोधणं कसं चुकीचं आहे, हे समाज उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. यंदा वेळी-अवेळी-अवकाळी पडणार्‍या पावसात भिजत सभा घेण्याचा प्रयोग अजून झाला नाही म्हणून बरं, त्याही प्रयोगाबाबत लोकांनी आता सगळं ओळखलेलं आहे.
 
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे विकासकेंद्री-मूल्यनिष्ठ राजकारण या महाराष्ट्राने पाहिले आहे. स्वातंत्र्यसैनिक वसंतदादा पाटील तसंच वसंतराव नाईक यांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेले राजकारणही इथल्या लोकांनी अनुभवले आहे. अन्य मुख्यमंत्र्यांच्याही कारकिर्दी महाराष्ट्रातील नागरिकांनी अभ्यासल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं बुलंद नेतृत्व असताना मनोहर जोशींची कारकीर्द आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या विकासकेंद्री राजकारणाची झलक देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने महाराष्ट्राने अनुभवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने मुख्यमंत्रिपद म्हणजेच राज्याचं नेतृत्व कुणाकडं असू नये, याचा धडादेखील राज्याला मिळाला, तर धडाडी कशी असते, हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं. या पार्श्वभूमीवर चार वेळा मुख्यमंत्रिपद, केंद्रात अनेक वर्षे कॅबिनेट मत्रिपदं आणि कोणत्याही मार्गाने मिळवलेली सत्ता स्वतःच्या घरात ठेवूनही राजकीय नकाशावर अखेर ‘भटकता आत्मा’ हे गुरुस्थानी मानणार्‍या पंतप्रधानांकडूनच संबोधन ऐकून घ्यावं लागणं, ही त्यांच्या राजकारणाची अपरिहार्य शोकांतिकाच!

-प्रसन्न पुणेकर