अनिल परबांनी आधी उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या घोटाळ्यांचा हिशोब मागावा : किरीट सोमय्या

01 May 2024 16:32:46

Kirit Somaiya 
 
मुंबई : अनिल परबांनी आधी उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या घोटाळ्यांचा हिशोब मागावा, असे प्रत्युत्तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महाराष्ट्रातील ४८ जागांवर प्रचार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यांनी बुधवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "अनिल परब यांनी कधीतरी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारावा आणि संजय राऊतांनाही हिशोब मागावा. मी महाराष्ट्रातील ४८ जागांवर साडेबारा कोटी जनतेत जाऊन महायूतीचा प्रचार करणार आणि नरेंद्र मोदींसाठी मत मागणार आहे. उद्धव ठाकरे घोटाळेबाजांचे सरदार असतील आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की, नंदकिशोर चतुर्वेदीकडून आलेले २०० कोटी कुठे गेलेत?" असा सवाल त्यांनी केला. 
 
हे वाचलंत का? -  "वारंवार बडबड करणाऱ्यांची जागा कुठे असते हे सांगण्याची गरज नाही!"
 
किरीट सोमय्या यांनी उबाठा गटाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामध्ये रवींद्र वायकरांचाही समावेश होता. दरम्यान, आता ते एकनाथ शिंदेसोबत गेले असून त्यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या वायकरांचा प्रचार करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी सर्व जागांवर प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे.
 
 
ते पुढे म्हणाले की, "नरेंद्र मोदींना देशाचं पंतप्रधान बनवणं आणि हिंदुस्तानाला पहिल्या क्रमाकांची महासत्ता बनवण्याला मी कधीही समझौता म्हणणार नाही. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. आज देश पंतप्रधान निवडतो आहे. त्या नकली सेनेच्या नेत्याला ३ महिन्यांसाठी पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यात आम्ही समझौता करुच शकत नाही. देशाला नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवे आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक मतदाराकडे जात हात जोडून अबकी बार चारसों पार असं सांगणार आहोत," असेही ते म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0