मुंबई : जगात सगळ्यात तरुण देश भारत आहे. त्यामुळे पुढच्या ५ वर्षांचा विचार करता, या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. हे ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर केली.
मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात तरुण देश असला, तरी या तरुणांना चांगले शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने कृतिशील प्रयत्न केले पाहिजेत. कारण पुढच्या १० वर्षांनंतर पुन्हा आपण वयस्कांचा देश होणार आहोत. जपानमध्येही असा काळ आला होता, तेव्हा त्यांच्याकडे मुबलक व्यवसाय आणि व्यवसायिक उभे राहिले. तशीच प्रगती या देशाने केली पाहिजे.
पण जर का तसे घडले नाही, तर या देशात अराजक येईल. त्या पार्श्वभूमीवर या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज असल्यामुळे फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा राज यांनी केली. त्याचवेळी मनसैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना त्यांनी केली. आपण महाराष्ट्रभर मनसैनिकांच्या भेटीसाठी लवकरच येत आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या वर्ष-दीड वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अनेकदा चर्चेसाठी आले. पण, मी त्यांना म्हटले की, मला वाटाघाटी करायच्या नाहीत. मला राज्यसभा, विधानपरिषद नको. या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता मोदींना पाठिंबा देत आहे. पण, उद्या जर का अपेक्षेनुसार बदल घडले नाहीत, तर तोंड उघडायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही राज यांनी दिला.
महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेला आहे. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत, तेच कळत नाही. त्यामुळे यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपण योग्य मार्ग महाराष्ट्राला दाखवू. माझी महाराष्ट्रातील मतदारांकडून अपेक्षा आहे, की कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्याप्रकारे राज्यात राजकारण सुरू आहे, त्याला राजमान्यता दिली, तर पुढची स्थिती भयंकर येईल, असेही राज ठाकरे म्हणाले.