मुर्खोत्तमाचा निषेध!

09 Apr 2024 21:37:54
purushottam-khedekar-criticized-the-youth-and-ashwasak-saheb
 

"आजचे शिवाजी साहेब झालेत, आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ,” असे ‘अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब’ या कार्यक्रमात पुरुषोत्तम खेडेकर नुकताच म्हणाला. ‘शिवाजी’ या एकेरी नावाने ज्यांचा उल्लेख केला गेला, ते म्हणजे अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘साहेब’ म्हणून ज्यांची जी हुजूरी करण्यात आली ते कोण तर शरद पवार! यावर लोक म्हणत आहेत की, छत्रपतींचा अपमान करणार्‍याला ‘पुरूषोत्तम’ नाही, तर ‘मुर्खोत्तम’ हेच नाव शोभते! परक्या मुस्लीम आक्रांतांना पराजित करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या हिंदुस्थानचे दैवत. कुठे आमचे दैवत आणि कुठे पवार? दोघांची तुलना करणे हेच पाप. जरा तरी लाज वाटायला हवी होती पुरूषोत्तमला! (वयोवृद्धांना अरे-तुरे करू नये, पण छत्रपतींचाा एकेरी उल्लेख करणार्‍याला कसला मान-सन्मान द्यायचा?) पुरूषोत्तमच्या अंगाअंगात जातीयवाद भिनलेला. ‘हा ब्राह्मण, तो मराठा’ असे म्हटल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. त्यामुळेच समर्थ रामदास काय किंवा लोकमान्य टिळक काय, यांच्याबद्दल हा पुरूषोत्तम गरळ ओकतो. का तर ते जन्माने ब्राह्मण होते म्हणून! याने मागे लिहिले होते, ”संत नामदेव, ज्ञानेश्वर, चोखामेळा, जनाबाई, सोयराबाई, रवीदास, मीराबाई, कबीर, एकनाथ, तुकाराम या सर्व संतांचे मृत्यू अनैसर्गिक झाले असून, त्यांना ब्राह्मणांनी ठार मारले.” बरं, त्याने हे असे बोलण्याआधी काही मोठे संशोधन केले का? हे सत्य आहे का? तर नाही. आयुष्यभर मराठा समाजाचे नाव घेत स्वतःचे विकृत विचार समाजावर लादण्याचा प्रयत्न खेडेकरने कायमच केला. तो काही वर्षांपूर्वी म्हणाला होता, “संभाजी ब्रिगेडचे राज्य येईल,तेव्हा आम्ही शरद पवारांना ‘भारतरत्न’ देऊ. त्यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी संभाजी ब्रिगेड पाठिंबा देईल.” वा वा! खेडेकर याला वाटते की, संभाजी ब्रिगेडच्या पाठिंब्याने पवार पंतप्रधान होतील. त्याला पवारांबद्दल जे काही वाटते, ते त्याचे वैयक्तिक मत आहे. मात्र, त्याने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. ‘शरद पवार हे आजचे छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. अशा या छत्रपतींचा अपमान करणार्‍या या मुर्खोत्तमाचा निषेध!

दरोडेखोरांचे सर्वेक्षण

या देशात संविधान आहे आणि त्यानुसार कायदेशीररित्या संपत्ती कमावण्याचा आणि संवर्धित करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण, संविधानाचे हे म्हणणे राहुल गांधी यांना मान्य नसावे, असे दिसते. कारण, नुकतेच ते तेलंगणमध्ये म्हणाले की, “काँग्रेस सत्तेत आली, तर देशातीलसंपत्तीवर अधिकाधिक नियंत्रण कुणाकडे आहे, हे पाहण्यासाठी आर्थिक सर्वेक्षण करेल. आर्थिक संपत्तीचे सर्वेक्षण करणार, असे म्हणून त्यांनी संभ्रम निर्माण केला की, असे सर्वेक्षण करून ज्याच्याकडे संपत्ती जास्त आहे, त्याची संपत्ती गरिबांमध्ये काँग्रेस वाटणार आहे. गरिबी हटवण्यासाठी राहुल गांधी आश्वासनांवर आश्वासने देत आहेत.उदाहरणार्थ, गरीब महिलांना एक लाख रुपये देणार, शेतकरी, कामगार यांनाही अशाच प्रकारे पैसे किंवा सवलती स्वरूपात पैसे वाटप करण्याचे राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने जाहीर केले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला २०१४ सालापासून गरीब-गरिबी याबद्दल फारच पुळका. पुळका शब्द यासाठी की, २०१४ पूर्वी अगदी २०१३ साली गरिबीबद्दल राहुल गांधी यांचे मत अगदीच भलतेच होते. २०१३ साली गोविंद वल्लभ पंत संस्थेने सात मागासवर्गीय जातींचे प्रतिनिधी आणि राहुल गांधी यांचा संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी राहुल गांधी गरीब आणि गरिबीबद्दल बोलले होते की, अन्न आणि पैसे देऊन गरिबी कधीच दूर होऊ शकत नाही. कारण, गरिबी नसतेच. गरिबी ही मनाची अवस्था आहे. २०१३ साली गरिबी नसतेच, असे म्हणणारे राहुल गांधी २०१४ ते २०१९ आणि २०२४ साली गरीब-गरिबी म्हणून गळा काढत आहेत. असो. राहुल गांधींचे जिंकल्यावर आर्थिक सर्वेक्षण करणार, हे विधान ऐकून सहज एक आठवले. जगभरात दरोडा पडण्याच्या किंवा कुणाला तरी ब्लॅकमेलिंग करण्याच्या घटना घडत असतात. गुन्हेगार काय लगेच कुठेही जाऊन दरोडा घालतात का? कुणालाही ब्लॅकमेल करतात का तर तसे नसते. कुणाकडे संपत्ती अधिक आहे, कुणाला ब्लॅकमेल केले की पैसे मिळतील, यासाठी आधी हे गुन्हेगार त्यांच्यापरीने सर्वेक्षणकरतात. आता काही राहुलद्वेष्टे लोक लगेचच दरोडेखोरीचा आणि राहुल गांधींच्या म्हणण्यातील त्या आर्थिक सर्वेक्षणाचा संबंध लावतील!मी तर केवळ दरोडेखोरांच्या सर्वेक्षणाबद्दल बोलत आहे.

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0