बाळासाहेबांव्यतिरिक्त कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही!

09 Apr 2024 22:06:10
Raj Thackeray MNS Melava



मुंबई :     बाळासाहेबांव्यतिरिक्त कोणाच्याही हाताखाली मी काम करणार नाही. तरीही एकाला (उद्धव ठाकरे) संधी दिली होती. पण त्याला समजलेच नाही. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार. कारण हे अपत्य मी जन्माला घातले आहे. आज १८ वर्षे झाली, फोडाफोडीची गोष्ट कधीही मनाला शिवली नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार, अशा बातम्याही चालवण्यात आल्या. अरे मुर्खांनो मला व्हायचे असते, तर तेव्हाच झालो नसतो का? जवळपास ३२ आमदार ६-७ खासदार माझ्याकडे आले होते. आपण एकत्र बाहेर पडू, असे त्यांचे म्हणणे होते.

जगात सगळ्यात तरुण देश भारत आहे. त्यामुळे पुढच्या ५ वर्षांचा विचार करता, या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. हे ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर केली. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात तरुण देश असला, तरी या तरुणांना चांगले शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने कृतिशील प्रयत्न केले पाहिजे.


हे वाचलंत का? -   पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनसेचा बिनशर्त पाठिंबा!


दरम्यान, अमित शहा यांच्या भेटीनंतर माध्यमांमध्ये अतिरंजित बातम्या दाखविण्यात आल्या. १२ तास ताटकळत ठेवले, अमूक प्रस्ताव दिला... वैगरे. वास्तविक भेट दुसऱ्या दिवशीची ठरली होती, मी आदल्या रात्री दिल्लीत गेलो होतो. दुसरे म्हणजे, या भेटीदरम्यान शहा आणि मी, दोघेच दालनात होतो. त्याच्या बातम्या माध्यमांना कशा काय मिळणार? अरे बाबांनो, एखादी गोष्ट ठरली, तर मी स्पष्टपणे माध्यमांना सांगेन. पत्रकार परिषद घेईन, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी माध्यमांमधील अतिरंजित पत्रकारितेचा समाचार घेतला.

राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेला आहे. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत, तेच कळत नाही. त्यामुळे यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपण योग्य मार्ग महाराष्ट्राला दाखवू. माझी महाराष्ट्रातील मतदारांकडून अपेक्षा आहे, की कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्याप्रकारे राज्यात राजकारण सुरू आहे, त्याला राजमान्यता दिली, तर पुढची स्थिती भयंकर येईल, असेही राज ठाकरे म्हणाले.


 
Powered By Sangraha 9.0