मुंबई: उद्या गुढीपाडव्याच्या सणासुदीच्या दिवशी सोने खरेदीचा बेत असेल तर सावधान! गेल्या एक महिन्यापासून सोन्या चांदीच्या किंमती नव्या उच्चांकावर जात असताना आज सोने चांदी भावाने शिखर गाठले आहे. एमसीएक्स (Multi Commodity Exchange) वरील सोने निर्देशांकात ०.४३ टक्क्याने व चांदीच्या निर्देशांकात ०.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसातील हा नवा उच्चांक आहे.
भारतातील सर्व महत्वाच्या शहरात ही दरवाढ झाली आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १ तोळा (१० ग्रॅम) किंमत ३०० रुपयांनी वाढत ६५६४९ रुपयावर पोहोचली आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात तब्बल ३३० रूपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम किंमत २४० रूपयांनी वाढली आहे. पुण्यातही २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम किंमत ३०० रूपयांनी तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम किंमत ३३० रूपयांनी वाढली आहे.
चांदीही महागली -
मुंबईत व देशात चांदीच्या किंमतीत वाढ झाल्या आहेत.गेल्या १० दिवसात चांदीच्या दरात प्रति किलो १००० रूपयांनी वाढ झाली आहे. आज मुंबईत व पुण्यात चांदीचे दर १ किलोला १००० रूपयांनी वाढले आहेत.