वनवासी समुदायाच्या विकासाला भाजपचे प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

08 Apr 2024 17:54:02
Narendra Modi news

नवी दिल्ली
: देशातील वनवासी समुदाय हा नेहमीच भाजपच्या प्राधान्यक्रमावर असतो. भाजपनेच वनवासी समुदायाच्या मुलीस देशाचे राष्ट्रपती बनवले, त्याचवेळी काँग्रेसने नेहमीच वनवासी समुदायाचा द्वेष केला आहे; असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगढमधील बस्तर येथील जाहिर सभेत सोमवारी केला.
 
वनवासी समाजाला भाजपचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. काँग्रेसने ज्या वनवासी समाजाचा नेहमीच तिरस्कार केला, त्याच ववासी समाजाची मुलगी आज देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान आहे. भाजपनेच छत्तीसगढला पहिला वनवासी मुख्यमंत्री दिला आहे. भाजपनेच आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय आणि अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र तरतूद केली आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके काँग्रेसच्या सरकारांनी गरिबांच्या आणि वनवासी समुदायाच्या गरजांकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसने गरिबांची, वनवासी समुदायाची कधी पर्वा केली नाही, त्यांच्या समस्याही समजून घेतल्या नाहीत. काँग्रेसच्या शाही कुटुंबास सर्वसामान्यांच्या समस्या कधीही समजल्या नाहीत. मात्र, भाजपने नेहमीच अत्योदयाच्या विचारावर काम केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
देश लुटण्याचे काँग्रेसचे लायसन्स मोदी सरकारने रद्द केल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला. ते पुढे म्हणाले, मोदी सरकारन घोटाळेबाजांच्या मध्यस्थांचे उत्पन्न बंद केल्याने ते लोक संतप्त झाले असून ते आता धमक्या देत आहेत. मात्र, त्यांच्या धमक्यांना मोदी घाबरत नाही. माझ्यासाठी भारत हेच माझे कुटुंब असून कुटुंबाला लुटीपासून वाचविण्यासाठी आपण सज्ज असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले आहे.

 
Powered By Sangraha 9.0