ठाणे पूर्वकडील उड्डाणपुलासाठी १५ ऑगस्टची डेडलाईन

07 Apr 2024 20:20:45
Thane municipal Corporation


ठाणे  :    ठाणे पूर्व भागातील वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या, स्टेशन परिसर विकास सुधारणा योजने अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी शनिवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली.
 
स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प असून एकूण २.२१ किमी अंतराच्या या उड्डाणपुलाचा कन्हैयानगर ते सिद्धार्थनगर हा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यापुढील काम तसेच, कोपरी येथे रेल्वे मार्गावरील काम शिल्लक असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. भुयारी मार्ग ते सेवा रस्ता हा भाग अंतिम टप्प्यात आहे.


हे वाचलंत का? -  ठाण्यात प्रभु श्रीरामाची भव्य रांगोळी
 

आयुक्त राव यांनी कन्हयानगर येथे या संपूर्ण प्रकल्पाचे आरेखन समजून घेतले. त्यातील, रेल्वे मार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती घेतली. त्यानंतर, उड्डाणपुलाच्या तयार झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच, स्टेशन परिसरातील बांधकामाच्या स्थितीचाही उड्डाणपुलावरून आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यात, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, उद्यान, अंफी थिएटर यांना भेट दिली.तसेच, नवीन ठाणे रेल्वे स्थानक, सभोवतालचा परिसर येथील बांधकामाच्या स्थितीचीही पाहणी केली. या कामातील अडचणी, रेल्वेकडून अपेक्षित कामे, प्रकल्पबाधित कुटुंबाचे स्थलांतर यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.




Powered By Sangraha 9.0