पुणे : काँग्रेस पक्ष नेहमीच आंबेडकर परिवारावर अन्याय करतो, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही भाष्य केले. त्यांनी रविवारी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काँग्रेस पक्ष हा नेहमी आंबेडकर विरोधी राहिलेला आहे. भंडारा आणि मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्याचं पाप काँग्रेसने केलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांना राजकारणात स्थैर्यता येऊ नये यासाठी काँग्रेसचा नेहमी प्रयत्न राहतो. प्रकाश आंबेडकरांना माननारा एक वर्ग आहे. त्यामुळे ते मोठे झाले तर तो वर्ग आमच्यापासून दूर जाईल, असं काँग्रेसला वाटतं. त्यामुळे काँग्रेस पक्ष नेहमीच आंबेडकर परिवारावर अन्याय करतो," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मागच्याच जाहीरनाम्यांची कार्बन कॉपी!"
ते पुढे म्हणाले की, "आमची केंद्रिय समिती पक्षप्रवेशाबद्दल विचार करते. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचा विचार राज्य आणि केंद्रिय समिती करेल. एकनाथ खडसेंची इच्छा असेल तर विकसित भारताच्या संकल्पासाठी आम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. कारण मोदीजींच्या नेतृत्त्वातील भारताकरिता येणाऱ्या लोकांचं स्वागतच आहे. देवेंद्र फडणवीस कधीही खडसे साहेबांच्या विरोधात नाहीत. उलट देवेंद्रजींनी खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान दिलं आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांच्या मनातलं खडसे साहेबांचं स्थान कमी झालेलं नाही. पक्ष बदलत राहतात, लोकं जात-येत राहतात पण देवेंद्रजींचे व्यक्तिगत संबंध कुणाशीही वाईट नाहीत," असे ते म्हणाले. तसेच महायूतीच्या जागावाटबाबत अर्धा तासाच्या बैठकीत निर्णय होईल एवढीच चर्चा शिल्लक आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.