श्रीगुरू संत निवृत्तीनाथांचा ‘श्रीराम’ निवृत्ती साचार रामनामी दृढ।

    06-Apr-2024
Total Views |
sant nivruttinath maharaj ramnam


पारमार्थिक समतेचा संदेश देणारे १३व्या शतकातील संत निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरू आणि सकल वारकरी संतांचे परात्पर श्रीगुरू मानले जातात. मध्ययुगीन भक्ती आंदोलनातील वारकरी संतसाहित्याचा आरंभ निवृत्तीनाथांपासून होतो. त्यांचे सुमारे ५५० अभंग असून, त्यामध्ये सकल संतांच्या साहित्यातून प्रतित होणार्‍या भक्ती विचारांची प्रकृती, प्रवृत्ती आणि प्रेरणा यांचे बीजरूप दर्शन घडते. निवृत्तीनाथांचे ५०-५५ अभंग राम आणि रामनामाचे महत्त्व सांगणारे आहेत. त्यातून ‘निवृत्ती परम निरंतर राम। सर्वाघटी राम बिंबलासे।’ असे रामाच्या स्वरुपाचे निर्गुण दर्शन घडते.

तो सर्वोपकारी समर्थु। सद्गुरू श्री निवृत्तीनाथु।
राहाटतसे मजही आंतु। रिघोनिया॥
संत ज्ञानदेवांनी आपले गुरू, आपले ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथांचा (शके ११९५ ते १२१९) वरील शब्दात गुणगौरव केलेला आहे. निवृत्तीनाथ हे केवळ ज्ञानदेवादी भावंडांसह अवघ्या संतमंडळींचे ‘परात्पर गुरू’ आहेत. त्यामुळे त्यांची सकल संतांनी स्तुती केलेली आहे. संत ज्ञानदेवांनी आपल्या सर्व कार्याचे श्रेय, कर्तेपण हे श्रीगुरू निवृत्तीनाथांनाच दिलेले आहे. ‘सदाशिवाचा अवतार। स्वामी निवृत्ती दातार॥’ असा संत जनाबाई यांनी निवृत्तीनाथांचा गौरव केला आहे.

मध्ययुगीन भक्ती आंदोलनातील संतांच्या (वारकरी) साहित्य परंपरेचा आरंभ, संत निवृत्तीनाथांच्या अभंगांपासून होतो. अखंड ७०० वर्षे सशक्तपणे प्रवाहित झाल्याने, या भक्ती परंपरेला ‘महाराष्ट्राची सत्त्वधारा’ म्हणतात. खरं तर ही भक्ती परंपरा विठ्ठल उपासनेची एकविध भक्ती परंपरा आहे. कृष्णरूप विठ्ठल-पांडुरंग ही वारकरी भक्ती परंपरेची इष्ट देवता असली, तरी या संप्रदायाचा नाम मंत्र ‘राम कृष्ण हरी’ असा आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांना जेवढा विठ्ठल प्रिय आहे, तेवढेच राम, कृष्ण आणि हरि हे अवतार वंदनीय आहेत.

संत निवृत्तीनाथ यांचे जुने व नवोपलब्ध असे मिळून एकूण ५५० अभंग विविध अभंग गाथेतून मिळतात. या अभंगाचे ढोबळमानाने सगुण-निर्गुण व स्वरूप वर्णनाचे १३४ अभंग तसेच पंढरी माहात्म्यपर ३३ अभंग, ज्ञानवर्णनपर ३०, उपदेशात्मक ४१ अभंग, समाधीबोधाचे ३०, निवृत्ती-ज्ञानदेव संवादत्मक २६ अभंग असे वर्गीकरण दिसून येते.

रामनामाचा महिमा

निवृत्तीनाथांच्या ‘नामभक्तीपर’ अभंगामध्ये सुमारे ५५ अभंग हे रामनामाचा महिमा, रामभक्तीचे महत्त्व विशद करणारे आहेत.
सर्वाभूती भजन करावे सर्वथा।
रामनाम कथा आरंभाव्या ॥२॥
निवृत्तीचे जाप्य आनु नाही चित्ती।
रामनामे तृप्ती सदा असे ॥४॥
संत निवृत्तीनाथांच्या उपरोक्त अभंगातील ‘रामनाम कथा आरंभाव्या’ हा चरण (ओळ) आणि ‘रामनामे तृप्ती सदा असे।’ हा आणखी एक चरण लक्षवेधी आहे. एकविध विठ्ठल-कृष्ण भक्ताने गायलेली ही रामनाम महती खरोखरीच विशेष आहे. संत निवृत्तीनाथ आणि संत परंपरेच्या दृष्टीने श्री विठ्ठल-कृष्ण-राम-शिव यामध्ये कोणताही भेद नाही, एकाच परब्रह्म तत्त्वाची ही वेगवेगळी नामरुपे आहेत.
निवृत्ती स्मरतु रामनाम भाव।
सर्व देव एक चाड आम्हा॥४॥
‘भेदाभेद भ्रम अमंगळ।’ मानत समतेची, समत्वाची व्यापक दृष्टी गुरू निवृत्तीनाथांनी संत ज्ञानदेवांद्वारे सकल संतपरंपरेला दिली आहे. त्यामुळेच या संतांच्या साहित्यात विठ्ठल, शिव, राम या देवतांवरून वा त्यांच्या नामरुपावरून कोणताही भेदाभेद-वाद-संदेह दिसत नाही. त्यांना विठ्ठल जेवढा प्रिय-पूज्य तेवढाच रामही प्रिय व पूज्य आहे.

रामनाम ः बीजमंत्र, महामंत्र

रामनाम हे सर्व नामांचे सार असून, हे मना तू सत्वर रामनाम घे. रामनाम हा आचार होऊ दे. तू सार्‍या इतर असार साधनाच्या मागे लागून वेळ वाया घालवू नको. रामनाम हा सिद्ध मंत्र आहे.

वेगु करी मना धरावे पै सार। नामचि आचार रामनामे।
सार तेचि धरी असार ते निवडी। वैकुंठ जढोवढी रामनामे।
निवृत्ती म्हणे सिद्ध असता पै मंत्रु। रामनामे शत्रु नासतील॥
रामनाम हा ‘सिद्ध मंत्र’ आहे, तसाच राम नाम हा ‘बीजमंत्र’ ‘मूलमंत्र’ आहे, असे निवृत्तीनाथ सांगतात. बीजमंत्र, सिद्धमंत्र यांचे मंत्रशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

जपे नाम वाचे रामनाम पाठे। जाशील वैकुंठे हरि म्हणता॥
न पाहे पै दृष्टी कळिकाळ तुज। रामनाम बीजमंत्र सार॥
न लगे मंत्रसार न लगति तपे। रामनाम सोहपे मूळमंत्र॥
प्रत्येक देवतेचे मंत्र वेगवेगळे आहेत. बर्‍याच बीजमंत्राचे गूढ अर्थ समजण्यास गुरू मार्गदर्शनाची गरज असते. कारण, मंत्राला सहा अर्थ असतात. वाच्यार्थ, भावार्थ, लौकिकार्थ, संप्रदायार्थ, रहस्यार्थ-गूढार्थ, तत्त्वार्थ. हे सारे अर्थ गुरुगम्य आहेत. ‘रामनाम’ मंत्र हा सर्वात सोपा, सहज, असा बीजमंत्र, सिद्धमंत्र, मंत्रसार आहे असे निवृत्तीनाथ म्हणतात. ‘निवृत्ती म्हणे सार रामनाम मंत्रु।’
निवृत्तीनाथ रामनामाचे महत्त्व सांगून रामनाम घ्या म्हणतात. तसेच भक्तभाविकांना विश्वास वाटावा म्हणून रामनामाने तरलेल्या प्रल्हाद, परिक्षिती, ध्रुव, व्यास, वाल्मिकी, शुकादिक मुनीजन यांची यादीच देतात.

हरिवीण चित्ती न धरि विपरित। तरताती पतित रामनामे॥१॥
विचारूनी पहा ग्रंथ हे अवघे। जेथे तेथे सांगे रामनाम॥२॥
व्यासादिक भले रामनाम पाठी। नित्यता वैकुंठी तया घर॥३॥
शुकादिक मुनी विरक्ती संसारी। रामनाम निर्धारी उच्चारिले॥४॥
या उपरोक्त अभंगातही निवृत्तीनाथांनी हरी आणि राम या दोन नामाचा समन्वय साधला आहे. राम सर्वा घटी भरलेला असून, रामा विना रिता ठावच नाही. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी राम व्यापलेला आहे. हे सारे चराचर राम तत्त्वाने भरलेले आहे. ‘पृथ्वी श्रीराम आकाश हे धाम। आपण विश्राम स्थूलरुपे॥’ ‘सूक्ष्म स्थूल राम साधक परम। रामनाम सर्वोत्तम सर्वारुपी॥’ संत निवृत्तीनाथ हे पंढरीच्या विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त आहेत. त्यांना विठ्ठल हाच राम आहे. म्हणूनच ते एका अभंगात म्हणतात, पंढरीत श्रीरामच विठ्ठल रुपात विश्रामलेले आहेत.

निवृत्ती सप्रेम जोडती सर्वकाळ।
पंढरी ये राम विश्रामले॥

विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
(पुढील अंकात ः संत ज्ञानदेवांच्या साहित्यातील रामदर्शन )